बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा लवकरच लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहेत. २४ सप्टेंबरला या दोघांचा शाही लग्नसोहळा पार पडणार आहे. लग्नापूर्वीचे दिल्लीतील विधी आटोपून परिणीती आणि राघव चड्ढा (Raghav Parineeti Wedding) आज सकाळी कुटुंबियांबरोबर उदयपूरला पोहोचले. उदयपूरच्या विमानतळावरील दोघांचे व्हिडीओ आणि फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. या शाही लग्नसोहळ्याला बॉलीवूड आणि राजकारणातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची नाव आमंत्रित केलेल्या पाहुण्यांच्या यादीमध्ये आहेत. तसेच परिणीतीकडून देखील बॉलीवूडचे सेलिब्रिटी लग्नाला हजर राहणार आहेत. बहीण प्रियांका चोप्रा देखील अमेरिकेहून लग्नाच्या दिवशी येणार आहे. हेही वाचा - तीन महिन्यांनंतर दीपिका कक्कर-शोएब इब्राहिमच्या मुलाची पहिली झलक; पाहा व्हिडीओ 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार, अभिनेत्री प्रियांका चोप्रा मुलगी मालतीबरोबर परिणीतीच्या लग्नाला हजर राहणार आहे. पण पती निक जोनस तिच्याबरोबर नसणार आहे. कारण तो सध्या जोनस बद्रर्सच्या टूरवर व्यस्त आहे. त्यामुळे उद्या प्रियांका मुलीबरोबर बहिणीच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे. परिणीतीच्या आयुष्यातील या खास क्षणासाठी प्रियांका खूप उत्सुक आहे. हेही वाचा – Video: परिणीती चोप्रा-राघव चड्ढा कुटुंबियांसह पोहोचले उदयपूरला, विमानतळावर झालं खास स्वागत उदयपूरमधील ताज पॅलेसमध्ये परिणीती आणि राघव यांचा शाही लग्नसोहळा असणार आहे. या लग्नसोहळ्याची सुरुवात दिल्लीत सूफी नाइट्स आणि अरदासपासून सुरू झाली. आता उद्या, २३ सप्टेंबरला संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या लग्नसोहळ्यात आलेल्या पाहुण्यांना फोन वापरण्यास मनाई केली आहे. हेही वाचा – ‘जवान’नंतर दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा बॉलीवूडमध्ये करणार नाही काम; दिग्दर्शक अॅटलीवर आहे नाराज दरम्यान, परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ती लवकरच 'मिशन रानीगंज'मध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्याबरोबर पुन्हा एकदा अक्षय कुमार पाहायला मिळणार आहे. तसेच कुमुद मिश्रा आणि रवि किशन देखील महत्त्वाचा भूमिकेत आहेत. जयवंत सिंह गिल यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. ६ ऑक्टोबर 'मिशन रानीगंज' प्रदर्शित होणार आहे.