Actress Priyanka Chopra : बॉलीवूडसह हॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘देसी गर्ल’ म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा. आजवर अनेक सिनेमांमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. बॉलीवूडच्या सध्याच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचं नाव अग्रस्थानी आहे. प्रियांकानं कमावलेल्या या यशात तिच्या कुटुंबाचाही तितकाच वाटा आहे. मात्र, प्रियांकाच्या यशाची किंमत तिच्या भावाला मोजावी लागली असल्याचं अभिनेत्रीच्या आईनं म्हटलं होतं.

‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकल्यानंतर प्रियांका चोप्राकडे चित्रपटांच्या अनेक ऑफर्स आल्या. मात्र, तेव्हा प्रियांका फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी फारशी उत्सुक नव्हती. प्रियांकाच्या आई मधू चोप्रा यांनी याबाबत सांगितले होते की, अभ्यासात हुशार असलेली प्रियांका सुरुवातीला अभिनयक्षेत्रात येण्यास तयार नव्हती.

प्रियांकाच्या अभिनय कारकिर्दीसाठी मधू चोप्रा यांना १८ वर्षांच्या प्रियांकाबरोबर सतत प्रवास करावा लागला. त्याचा परिणाम तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्रावर झाला. तो अनेकदा घरी एकटाच राहिला आणि स्वतःहूनच मोठा झाला. वडील डॉ. अशोक चोप्रा डॉक्टर असल्याने ते त्यांच्या कामात व्यग्र होते. त्यामुळे सिद्धार्थला वडील आणि माझा पुरेसा वेळ मिळाला नाही, याची खंत मधू चोप्रा यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

‘समथिंग बिगर शो’मध्ये बोलताना मधू चोप्रा म्हणालेल्या, “प्रियांकाच्या यशाची किंमत सिद्धार्थला मोजावी लागली. वडील कामात व्यग्र होते. मी प्रियांकाबरोबर असायचे. तेव्हा सिद्धार्थ स्वत:च त्याचा त्याचा मोठा झाला. त्याला मला वेळ देता आला नाही. या सगळ्यात माझ्यासाठी तोच खरा बळी ठरला.” सिद्धार्थविषयी बोलताना त्या भावूक झाल्या. “हे सगळं आठवलं की, काही गोष्टी मनाला लागतात,” असेही त्यांनी सांगितले.

सिद्धार्थ अजूनही रोज संघर्ष करीत असल्याचे मधू चोप्रा म्हणाल्या. “मी त्याला रोज संघर्ष करताना पाहतेय. मला दोन छान मुलं आहेत, जी माझ्यावर प्रेम करतात आणि माझी काळजी घेतात,” असे त्यांनी सांगितले. यापूर्वी डॉ. स्तुती खरे शुक्ला यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना मधू चोप्रा यांनी सांगितले होते की, मुलं लहान असताना त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. प्रियांकाचं सुरुवातीचं करिअर, स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय आणि घर. त्या जेव्हा मुलांबरोबर असायचे, तेव्हा तो वेळ पूर्णपणे त्यांचाच असायचा. त्यामुळे मेहनत, शिस्त आणि कुटुंबासाठी वेळ कसा काढायचा हे त्या शिकल्या, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, प्रियांकाचा भाऊ सिद्धार्थ पत्नी नीलमबरोबर भारतात राहतो; तर प्रियांका पती निक जोनास आणि मुलगी मालतीसह अमेरिकेत राहते. तिच्या आगामी कामाबद्दल सांगायचं झाल्यास, ती लवकरच एस. एस. राजामौली यांच्याबरोबरच्या ‘वाराणसी’ चित्रपटात झळकणार आहे. ‘वाराणसी’ चित्रपटात महेश बाबू आणि पृथ्वीराज सुकुमारनदेखील मुख्य भूमिकांत आहेत. पुढच्या वर्षी हा सिनेमा रिलीज होणार आहे.