Priyanka Chopra’s mother dr Madhu Chopra on hair growth mask: आपली जीवनशैली जशी असते, जसा आपला आहार असतो त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. जर योग्य आहार, योग्य झोप, पुरेसे पाणी आणि व्यायाम केला, तर त्याचा चांगला परिणाम शरीरावर होतो. पण, मोठ्या प्रमाणात जंक फूड खाल्ले, व्यायाम केला नाही, झोपेची वेळ ठरलेली नसेल किंवा पुरेसे पाणी प्यायले नाही तर त्याचा वाईट परिणामही शरीरावर होतो. अगदी त्वचा, केस यावरही या सगळ्याचा वाईट परिणाम होतो. कमी वयात केस गळणे, टक्कल पडणे किंवा पांढरे होणे अशा समस्यांचा अनेकांना सामना करावा लागतो. यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाय करणे महत्त्वाचे आहे.
घनदाट केसांसाठी डॉक्टर मधू चोप्रांनी सांगितला खास उपाय
अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या आरोग्याची, त्यांच्या त्वचेची कशी काळजी घेतात याबद्दल ते वेळोवेळी सांगतात. घरी ते काय उपाय करतात, याबद्दलही सांगतात.
बॉलीवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येतात. त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करतात. त्वचा व केसांसाठी काही उपाय सांगतात. आता नुकतीच त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्या केसांची कशी काळजी घेतात, याबद्दल सांगतात.
त्या म्हणाल्या, “मी दर आठवड्याला माझ्या केसांची कशी काळजी घेते, हे दाखवत आहे. मी आठवड्याला केसांना जे तेल लावते. त्यामध्ये नारळाचे तेल, मेथीचे दाणे, रोझमेरीची एक काडी, थोडे शिजवलेल्या भाताचे पाणी आणि भिजवलेल्या चिया सीड्स घ्यायच्या. त्यामुळे ते मिश्रण जेलीसारखे होण्यास मदत होते. प्रत्येक गोष्ट चमचाभर घ्यायची, ते एकत्र करायचे. तो उत्तम हेअर मास्क तयार होतो. मी तो माझ्या केसांना लावते, एक तास तसाच ठेवते आणि त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घेते. यामुळे माझे केस घनदाट होण्यास मदत होते.”
मधू चोप्रा यांनी याआधी एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्वचा चांगली ठेवण्यासाठी काय उपाय करायचा हे सांगितले होते. मधू चोप्रा म्हणालेल्या, “मी माझ्या त्वचेसाठी साबण किंवा फेसवॉश वापरत नाही. काही वेळा मी स्क्रब वापरते. कारण, जसे तुमचे वय वाढते, त्यावेळी मृत त्वचेच्या पेशी वाढतात. त्यामुळे स्क्रब दररोज करणे, गरजेचे असते. माझ्या चेहऱ्यासाठी मी फक्त स्क्रब वापरते. माझी त्वचा आधीपासूनच चांगली आहे. त्यावर मुरुम, ॲक्ने किंवा पिग्मेंटेशन येत नाही. ते येऊ नयेत म्हणून मी काही उपाय करते. मी जे उटणे वापरते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. हे उटणे माझी मुलगी प्रियांकादेखील वापरते. दोन चमच बेसन, १ चमच दूधाची साय, दही, हळद व थंड दूध हे सर्व एकत्र करायचे.”
त्या म्हणालेल्या, “सर्व एकत्र मिसळा आणि एक मिनिट तसेच ठेवून द्या.हे फेस मास्क म्हणून वापरता येतं हे चेहऱ्यावर लावा. १५–२० मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. ज्यांची त्वचा खूप गोरी आहे त्यांनी हळद खूप कमी प्रमाणात वापरावी. हे उटणे वापरल्यानंतर चेहरा उजळतो”, असे मधू चोप्रा म्हणाल्या.
मधू चोप्रा असेही म्हणाल्या, “या मिश्रणातील हे सगळे घटक त्वचेसाठी फायदेशीर आहेत. माझी त्वचा खूप कोरडी आहे, त्यामुळे मी घरची बनवलेली थोडी साय वापरते. तसेच, मी ताजे दही वापरते. कारण त्यात लॅक्टिक अॅसिड असते. हळदीमुळे सूज, इन्फेक्शन, फोड आणि ॲक्ने येत नाहीत.”
मधू चोप्रा जरी त्यांची त्वचा निरोगी ठेवण्यासाठी हा घरगुती उपाय करत असल्या तरीही प्रत्येकाची त्वचा वेगळी असल्याने त्वचेच्या समस्यांसाठी तज्ज्ञांची मदत घेणे, त्यांच्या सल्ल्यानुसार उपाय करणे महत्त्वाचे ठरते.
