Paresh Rawal and Akshay Kumar in OMG movie controversy: परेश रावल हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. नुकतीच त्यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अनेकविध विषयांवर त्यांचे मत व्यक्त केले. परेश रावल यांनी सलमान खानबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच, त्याचा स्वभाव खूप चांगला आहे, तो मनमिळाऊ आहे, तो कधीच समोरच्याचं नुकसान होऊ देत नाही; जर झालंच तर दुप्पटीने भरून निघावं यासाठी प्रयत्न करतो असे सांगितले.
याबरोबरच परेश रावल यांनी अक्षय कुमारबद्दलही वक्तव्य केले. ‘ओएमजी २’या सिनेमात परेश रावल व अक्षय कुमार एकत्र दिसले होते. या सिनेमाची कथा त्यांची होती, पण अक्षयने त्यांना श्रेय दिले नाही असे वक्तव्य त्यांनी केले. आता यावर सिनेमाच्या निर्मात्यांनी त्यांचे मत मांडले आहे.
परेश रावल यांच्या वक्तव्यावर निर्माते काय म्हणाले?
निर्माते अश्विन वर्दे यांनी नुकताच पिंकविलाशी संवाद साधला. या मुलाखतीत ते म्हणाले, “परेश रावल यांनी नुकतेच ‘OMG 2’ संदर्भात केलेले आरोप धक्कादायक, खोटे आणि कोणत्याही पुराव्याशिवाय केलेले आहेत, त्यामुळे या चित्रपटाचा प्रवास प्रत्यक्षात कसा सुरू झाला हे सार्वजनिकपणे सांगणं मला आवश्यक वाटते.”
पुढे ते म्हणाले, “ज्येष्ठ अभिनेते पवन मल्होत्रा यांनी लेखक-दिग्दर्शक अमित राय यांचं नाव मला सुचवलं होतं. ‘मुबारकाँ’ चित्रपटादरम्यान माझी त्यांच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला मी आणि अमित राय एका वेगळ्याच चित्रपटाच्या संदर्भात भेटलो. त्यानंतर आमच्यात मैत्री झाली आणि आम्ही अनेकदा मुंबईतील वांद्रे येथील त्यांच्या ऑफिसमध्ये भेटत असू. एकदा त्यांनी मला एका कथानकाची थोडक्यात कल्पना सांगितली. ती कल्पना माझ्या मनात कायम राहिली. पुढे त्याच गोष्टीवर आधारित ‘OMG 2’ची निर्मिती झाली.”
अश्विन वर्दे यांनी असेही सांगितले की, ‘OMG 2’ हा चित्रपट अक्षय कुमारशिवाय बनवण्याचा प्रश्नच नव्हता. कारण या चित्रपटाचे बौद्धिक संपदा हक्क (IP Rights) अक्षय कुमार यांच्याकडे असल्याची मला कल्पना होती.
अश्विन वर्दे म्हणाले, “अमित राय यांनी जेव्हा मला ‘OMG 2’ची कथा ऐकवली तेव्हा माझी पहिली प्रतिक्रिया अशी होती की, ही गोष्ट पूर्णपणे ‘OMG’सारखी वाटते. त्यावर अमित यांनी सांगितलं की, परेश रावल यांनीच त्यांना कथा शक्य तितकी ‘OMG’च्या सारखीच असावी असे सांगितले होते. मात्र, माझ्या मनात एकच प्रश्न होता की, अक्षय कुमारच्या परवानगीशिवाय ओएमजीसारखा चित्रपट कसा बनवता येईल? कारण त्या चित्रपटाचे IP हक्क अक्षय कुमार यांच्याकडे असल्याचं मला माहिती होतं.”
अश्विन यांच्या म्हणण्यानुसार, अमित राय यांनी हाच प्रश्न परेश रावल यांनाही विचारला होता. त्यावर परेश यांनी OMG’चे IP हक्क माझ्याकडे आहेत, काळजी करण्याचं काही कारण नाही असं सांगितल्याचा दावा त्यांनी केला. अमित यांच्या मनात तरीही शंका होती. त्यावर परेश यांनी त्यांना सांगितलं की, ओएमजीचा शंभरावा भाग जरी बनला तरी त्याचं लेखन आणि दिग्दर्शन तूच करशील. त्यांच्या बोलण्यातून ते स्वतःलाच या चित्रपटाचे खरे मालक असल्याचं सुचवत होते, त्यामुळे अमित यांनी पटकथा पूर्ण केली. ती पूर्णपणे त्यांची स्वतःची कथा होती; फक्त त्यामध्ये देवाच्या पात्राऐवजी एका फकिराची व्यक्तिरेखा होती.
अश्विन वर्दे पुढे म्हणाले की, यानंतर मला हळूहळू लक्षात आलं की परेश रावल ‘OMG’सारखाच दुसरा सिनेमा वेगळ्या नावाने बनवण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या मते हे अत्यंत अनैतिक आणि व्यावसायिकतेला न शोभणारं होतं, माझ्यासाठी ते चोरीपेक्षा कमी नव्हतं.
पुढे ते असेही म्हणाले की, परेश रावल यांचा अक्षय कुमारला सिनेमापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. दरम्यान, आता अक्षय कुमार या सगळ्यावर काही प्रतिक्रिया देणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
