ऋषी कपूर खूप कडक स्वभावाचे होते त्यांच्याबरोबर काम करताना अनेकांना त्यांच्या कठोर स्वभावाचा अनुभव आल्याचं अनेक कलाकारांनी मुलाखतींमधून सांगितलं आहे. परंतु, त्यांचा अभिनय, कामाप्रती असलेली शिस्त या सगळ्याचंही अनेक जण कौतुक करतात. अशातच आता मराठमोळा अभिनेता पुष्कर जोगने ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्याने ऋषी कपूर त्याला खूप ओरडले होते मात्र त्यावेळी नाना पाटेकरांनी त्याची कशी मदत केली याबद्दलची आठवण त्याने सांगितली आहे.

पुष्कर जोगने वयाच्या अवघ्या ७व्या वर्षी १९९५ मध्ये आलेल्या ‘हम दोनों’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केलं होतं. या चित्रपटात त्यांने दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. मात्र, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक दिवस पुष्कर जोगसाठी बालकलाकार म्हणून वाईट अनुभव देणारा ठरला.नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पुष्कर जोगने त्या प्रसंगाची आठवण सांगितली. सेटवर ऋषी कपूर त्याला ओरडले होते. त्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी एका लहान मुलावर अशाप्रकारे राग काढल्याबद्दल ऋषी कपूर यांना चांगलंच सुनावलं होतं.

‘अशी’ झालेली पुष्करची ‘हम दोनो’साठी निवड

गलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत पुष्कर जोगने त्या प्रसंगाची आठवण सांगितली. तो म्हणाला, “हो, त्यावेळी ऋषी कपूर सर माझ्यावर ओरडले होते. मी फक्त सात वर्षांचा होतो. मला काहीच माहिती नव्हतं. १००-१५० लोक असलेल्या हिंदी चित्रपटाच्या सेटवर मी पहिल्यांदाच गेलो होतो. नाना पाटेकर सरांनी कोणतीही ऑडिशन न घेता मला या चित्रपटात भूमिका दिली होती. ते फक्त म्हणाले होते, हा पुण्याचा आहे माझा मुलगा आहे, हाच ही भूमिका करणार.”

सेटवरील प्रत्येकजण ऋषी कपूर यांना घाबरायचा,याबद्दल पुष्कर जोग म्हणाला, “मी शूटिंगसाठी सेटवर गेलो. तिथला माझा पहिला दिवस मला अजूनही आठवतो. ऋषी कपूर सर खूप मितभाषी स्वभावाचे होते, ते फारसं कुणाशी बोलत नव्हते आणि त्यांचं एक वेगळंच वलय होतं. सेटवरील प्रत्येकजण त्यांना घाबरायचा. ते अतिशय स्पष्टवक्ते होते. मलाही त्यांची भीती वाटायची, कारण ते दरारा निर्माण करणारे वाटायचे.”

पुष्कर जोगने पुढे सांगितलं की, हा प्रसंग एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान घडला होता. रिहर्सलच्या एका शॉटमध्ये त्याच्याकडून चुकून ऋषी कपूर यांच्या डोक्यावर फुलांच्या पाकळ्या पडल्या. तो म्हणाला, “आम्ही ऋषी सर, कोरिओग्राफर फराह खान आणि पूजा भट्ट यांच्याबरोबर एका गाण्याचं शूटिंग करत होतो. फराह मॅडम नेहमीप्रमाणेच खूप प्रेमळ होत्या. त्यांनी मला आधीच सांगितलं होतं की, नीट कर, नाहीतर ऋषी सरांना राग येईल. त्यावर मी त्यांना सांगितलं की, मी चांगल काम करेन.”

या प्रसंगाची पार्श्वभूमी सांगताना पुष्कर जोगने पुढे सांगितलं की, या सीक्वेन्समध्ये तो एका गॅरेजमध्ये काम करत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. ऋषी कपूर आणि पूजा भट्ट त्यांच्या नव्या कारमधून तिथे येतात. मात्र, पुष्कर जोगच्या हातात दिलेल्या फुलांच्या पाकळ्या चुकून त्याने सगळ्या ऋषी कपूर यांच्या डोक्यावर टाकल्या. पुष्कर म्हणाला, “कशामुळे त्यांना राग आला, हे मला माहीत नाही. पण कट म्हटल्यानंतर ते माझ्यावर रागावले. मी तिथेच रडायला लागलो. ते म्हणाले, सेटवर कोणाला घेऊन आला आहात? हा कोण आहे? याला इथे आणण्याआधी निदान काहीतरी शिकवून तरी आणा.”

तो रडायला लागल्यानंतर दिग्दर्शिका-कोरिओग्राफर फराह खानने त्याची समजूत काढली आणि त्याला व्हॅनमध्ये नेलं. पुष्कर पुढे म्हणाला, “माझी आईसुद्धा सेटवर होती. तीही घाबरली होती. त्यांना वारंवार राग यायचा, पण त्यामागचं कारण मला माहीत नव्हतं. मी ही गोष्ट नाना सरांना सांगितली, कारण माझं त्यांच्याशी खूप जवळचं नातं होतं. त्यांनी माझं सगळं ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की, मी काहीतरी करतो.”

ऋषी कपूर यांच्यावर भडकलेले नाना पाटेकर

दुसऱ्या दिवशी नाना पाटेकर यांचं शूटिंग नव्हतं, मात्र ऋषी कपूर यांना जाब विचारण्यासाठी ते खास सेटवर आले. पुष्कर जोगने सांगितलं, “नाना पाटेकर यांनी ऋषी कपूर सरांना चांगलंच सुनावलं. त्यांनी त्यांना उलट उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही कोणीही असा, पण एखाद्या लहान मुलाशी कसं वागायचं हे तुम्हाला माहीत नाही का? तो सात वर्षांचा मुलगा आहे. टेक आणि रिहर्सल म्हणजे काय, हे त्याला कसं माहीत असेल? तुम्ही त्याच्यावर का ओरडत आहात? ऋषी कपूर सरांसमोर हे सगळं बोलण्याइतकी दयाळू वृत्ती आणि धाडस नाना पाटेकर यांच्यात होती. पण ऋषी कपूर यांच्याबरोबरची ही माझी एक आठवण आहे. तरीही आम्ही सगळे त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो.”