Pushkar Jog Talk About Marathi Industry : ‘‘जबरदस्त’ चित्रपटामुळे अभिनेता पुष्कर जोग घराघरात लोकप्रिय झाला. आजवर त्याने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘बिग बॉस मराठी‘ या शोमुळे पुष्करला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. पुष्कर त्याच्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यामुळे कायमच चर्चेत राहत असतो. सोशल मीडियावरील पोस्ट किंवा मुलाखतींमधून तो त्याची स्पष्ट भूमिका व्यक्त करीत असतो.

पुष्करने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत इंडस्ट्रीतील काही लोकांना मी नापसंत असल्याचं सांगितलं. मुक्काम पोस्ट मनोरंजन या यूट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यानं असं म्हटलं, “बिग बॉस मराठीच्या आधी मला अनेक जण बोलले की, मी माझ्या वडिलांमुळेच इथपर्यंत आलो आहे. पण आपण बोलणाऱ्यांचं तोंड धरू शकत नाही. मी जोगसरांचा मुलगा आहे, या गोष्टीचा कधी गर्व किंवा माज केला नाही.”

पुढे पुष्कर म्हणाला, “मी तेव्हा प्रत्येकाशी आपुलकीनं बोलायचो. मी लोकांशी कायमच नम्रपणे बोललो आहे. पण मला वाटत नाही की, मी त्यांना आवडतो. मला आता त्याचं काही वाटत नाही. मी नेहमी खरं बोलतो. मी अजिबातच फिल्मी माणूस नाही. खरं बोलतो आणि त्यामुळे काही दिग्गज दिग्दर्शकांना मी तेव्हाही आवडत नव्हतो आणि आजही आवडत नाही. पण, त्यांनी हे मान्य केलं आहे की, पुष्कर जोग अजूनही सक्रिय आहे आणि हेच माझं त्यांना उत्तर आहे.”

पुष्कर जोग इन्स्टाग्राम पोस्ट

त्यानंतर पुष्कर म्हणाला, “तुम्हाला मी आवडत नाही, ठीक आहे. हे असं होतं. माझे बाबा गेल्यानंतर पाच वर्षं मी घरी बसून होतो आणि डोक्यावर पाच कोटींचं कर्ज होतं. तेव्हा मला आयुष्य म्हणजे काय हे कळलं; वडील नाही. त्यात डोक्यावर पाच कोटींचं कर्ज. अभिनेता ण व्हायचं होतं आणि कर्जसुद्धा फेडायचं होतं. पण, पाच वर्षांत मी ते कर्ज फेडलं.”

पुढे त्यानं सांगितलं, “पाच वर्षे मी इंडस्ट्रीच्या बाहेर होतो; पण तेव्हा कोणीच विचारलं नाही. निर्माते, दिग्दर्शक किंवा मीडियापैकी कोणीही विचारलं नाही. काही लोकांना याचा आनंद झाला की, हा तर गेला. लोकांना वाटलं की, मी संपलो. पण, माझ्या बाबांनी मला जाताना कधीही हार न मानण्याचा मंत्र सांगितला होता. मी आरशात बघून स्वत:ला म्हणायचो की, मी कधीही हार मानणार नाही. मी इथे फक्त जिंकायला आलो आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यानंतर पुष्कर म्हणाला, “तेव्हाच मी निर्णय केला की, मी काहीही करेन आणि या इंडस्ट्रीत पुन्हा येईन. त्यानंतर कर्ज फेडलं. मी एक ट्रॅव्हल शो केला. ज्यातून पैसे मिळाले आणि लगेच मला बिग बॉसची ऑफर आली. पण मी तेव्हा त्यांना आधी नाही म्हणालो होतो. कारण माझी मुलगी तेव्हा खूप लहान होती; पण नंतर मी तो शो केला.”