R Madhavan Son Vedaant Madhavan swimming career : आर.माधवन आता फक्त उत्कृष्ट अभिनेता-दिग्दर्शक म्हणूनच नाही, तर मुलगा वेदांत माधवनचा बाबा म्हणूनही ओळखला जातो. वेदांतने फ्रीस्टाईल स्विमिंगमध्ये जगभरात अनेक पदके जिंकली आहेत. आर. माधवन अनेकदा सार्वजनिकरित्या मुलाच्या यशाचा आनंद साजरा करताना दिसतो. तसंच, वेदांतच्या ट्रेनिंग आणि तयारीबद्दलही तो चाहत्यांबरोबर माहिती शेअर करत असतो.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या एका मुलाखतीत माधवनने पालकत्वाच्या पद्धतीबद्दलही खुलासा केला होता. मुलाच्या स्विमिंग करिअरला योग्य पाठिंबा मिळावा यासाठी त्याने आणि पत्नी सरीता बिर्जे यांनी कोरोना काळातील लॉकडाऊनदरम्यान दुबईला स्थलांतर केल्याचंही त्याने सांगितलं होतं. आर. माधवनने २०२५ मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं होतं.
लेकाबद्दल काय म्हणाला आर.माधवन?
आर.माधवन म्हणाला, “तो निर्णय योग्य वेळी घेणं खूप गरजेचं होतं. वेदांत किशोरवयात शारीरिक वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यातून जात होता. त्या काळात त्याला पोहण्यासाठी स्विमिंग पूल मिळाला नसता, तर त्याच्या आंतरराष्ट्रीय स्विमिंग करिअरचा शेवट झाला असता.” त्या काळात मुंबईसह संपूर्ण देशातील स्विमिंग पूल कोविड-१९ मुळे बंद करण्यात आले होते, अशी आठवण आर.माधवनने सांगितली. इतर अनेक देशांमध्ये खेळाडूंच्या सरावावर परिणाम होऊ नये म्हणून सरकारांनी सार्वजनिक स्विमिंग पूल पुन्हा सुरू केले होते. मात्र भारतात तशी परिस्थिती नसल्यामुळे तो आणि पत्नी सरीता बिर्जे खूप चिंतेत आणि त्रासात होते, असंही त्याने नमूद केलं.
आर.माधवन म्हणाला, “जर्मनी, फ्रान्स आणि चीनसारख्या देशांनी स्विमिंग पूल पुन्हा सुरू केले होते आणि ते कोविडमुक्त झोन म्हणून सुरक्षित ठेवले होते. विद्यार्थ्यांना काही महिने तिथे राहून सराव करण्यास सांगितलं जात होतं. त्या काळात काही खेळाडूंनी तर जागतिक विक्रमही मोडले. वेदांतसाठी ही संधी गमावणं परवडणारं नव्हतं.” अभिनेत्याने पुढे सांगितलं की, दुबईमध्ये कडक नियम आणि देखरेखीखाली पुन्हा ट्रेनिंग क्लासेस सुरू झाल्याचं समजताच त्याने तिथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. आर.माधवनने सांगितलं की, पत्नी सरीता बिर्जे आधी वेदांतबरोबर दुबईला गेली होती आणि काही दिवसांनी तोही तिथे पोहोचला. हा निर्णय योग्य ठरला, कारण त्यानंतर वेदांतने उत्कृष्ट कामगिरी केली, असं माधवनने सागितलं आहे. त्या काळात भारतीय स्विमिंग टीमही दुबईत सराव करत होती, असं त्यांने नमूद केलं.
वडील म्हणून काही गोष्टी करता आल्या नाही – आर.माधवन
पालक म्हणून स्वतःला किती गुण द्याल, असं विचारल्यावर माधवनने प्रामाणिकपणे स्वतःला १० पैकी ६ गुण दिले. तो म्हणाला, “माझ्या कामामुळे वडील म्हणून काही गोष्टी मला करता येत नाहीत. माझी पत्नी माझ्यापेक्षा मुलाबरोबर अधिक वेळ घालवणारी आणि जबाबदारी सांभाळणारी पालक आहे. मी जास्त करून मार्गदर्शन आणि समजावून सांगण्याचं काम करतो… वेदांतला काय करायला हवं हे सांगतो.” आर.माधवनने पुढे सांगितलं, “वेदांत भविष्यात आणखी मोठं यश मिळवेल की नाही, याची मला चिंता नाही. पण त्याला इतकं समजायला हवं की ही प्रसिद्धी कायम राहणार नाही. हा फक्त आयुष्यातला एक टप्पा आहे, हे त्याने स्वीकारायला हवं. त्यानंतर स्वतःच्या मेहनतीने पुढे यश आणि सन्मान मिळवत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला हवी.” तो पुढे म्हणाला, “पण त्याच वेळी आम्ही थोडं चिंतेतही असतो. एवढ्या लहान वयात वेदांतला खूप लोकप्रियता मिळाली आहे.”
दरम्यान, आर.माधवनचा मुलगा वेदांत माधवनबद्दल बोलायचं झालं तर त्याने ४८ व्या ज्युनिअर नॅशनल अॅक्वॅटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चार सुवर्ण आणि तीन रौप्यपदके जिंकली होती. याशिवाय, गेल्या वर्षी मलेशियन ओपन स्पर्धेतही त्याने भारतासाठी पाच सुवर्णपदके पटकावली होती.
