R Madhavan Apology Video : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ हा चित्रपट १९ मार्चपासून चित्रपटगृहात धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने जागतिक स्तरावर ९०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे. मात्र, चित्रपटातील एका सीनमुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
चित्रपटातील एका सीनमध्ये गुरु गोबिंद सिंगजी यांच्या दशम ग्रंथातील काही ओळी म्हणताना अभिनेता आर. माधवन सिगारेट ओढत असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादावर आता अभिनेत्याने व्हिडीओ शेअर करत आपली बाजू मांडली आहे.
आर. माधवनने दिले स्पष्टीकरण
आर. माधवन म्हणतो, “नमस्कार, मी आर. माधवन सगळ्यात आधी ‘धुरंधर’च्या संपूर्ण टीमतर्फे तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही आमच्या चित्रपटावर खूप प्रेम करत आहात. अलीकडे आम्हाला समजलंय की, काही लोक चित्रपटातील एका सीनमुळे दुखावले गेले आहेत. त्या सीनमध्ये गुरू गोबिंद सिंगजी यांच्या दशम ग्रंथातील काही ओळी म्हणताना मी सिगारेट ओढत असल्याचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत; पण मी तुम्हाला खात्रीने सांगतोय की, तसे काहीच झालेले नाही.”
पुढे तो म्हणाला, “आदित्य धर यांनी मला आधीच सांगितलं होतं की, त्या ओळी म्हणण्यापूर्वी खूप आधी सिगारेट विझवायची. त्यामुळे तोंडातून धूर बाहेर पडताना दिसणार नाही, स्क्रीनवर कुठेही धूर दिसणार नाही आणि माझ्या हातातही सिगारेट दिसणार नाही. कारण- हा विषय अतिशय पवित्र आहे.”
पुढे माधवनने स्पष्ट केलं, “मी खरोखरच त्या सीनच्या आधीच सिगारेट विझवली होती. तुम्ही तो सीन नीट पाहिलात, तर माझ्या तोंडातून धूर निघताना दिसणार नाही किंवा फ्रेममध्ये कुठेही तुम्हाला धूर दिसणार नाही. पूर्ण सीन संपेपर्यंत धूर दिसत नाहीय. आम्ही कुणाच्याही भावना दुखावू इच्छित नाही. आम्ही शीख समाजाचा खूप आदर करतो आणि नेहमीच त्यांच्याबरोबर आहोत. सर्वांना माहीतच असेल की, प्रत्येक चित्रपटाच्या रिलीजपूर्वी मी स्वतः सुवर्ण मंदिरात जातो.”
शेवटी आर. माधवन म्हणाला, “चित्रपटात अजय सन्याल हे पात्र सिगारेट ओढणारे आहे; पण त्या ओळी सुरू होण्यापूर्वीच मी सिगारेट विझवून टाकली होती. परंतु, तरीसुद्धा कुणी नकळत दुखावलं गेलं असेल, तर मी त्या सर्वांची मनापासून माफी मागतो. कृपया गैरसमज करून घेऊ नका आणि ‘धुरंधर’ पाहत राहा.”
आर. माधवनने शेअर केलेला व्हिडीओ
नेमका वाद काय आहे?
‘धुरंधर २’ चित्रपटातील याच सीनमुळे शीख समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. दी इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या प्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि ‘शीख इन महाराष्ट्र’ या संघटनेचे अध्यक्ष गुरज्योत सिंग कीर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
