R Madhavan Birthday Sarita Birje Shares Unseen Video: अभिनेता आर. माधवन आणि त्याची पत्नी सरिता बिरजे गेल्या काही वर्षांपासून मुलगा वेदांतच्या जलतरण प्रशिक्षणासाठी दुबईत स्थायिक झाले आहेत. सोमवारी, १ जून रोजी माधवनने त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिरजे हिने सोशल मीडियावर पतीसाठी एक अत्यंत रोमँटिक आणि भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून चाहत्यांना माधवनच्या दुबईतील वैयक्तिक आयुष्याची, त्यांच्या डिनर डेट्सची आणि कौटुंबिक क्षणांची एक अनोखी झलक पाहायला मिळाली.
माधवनच्या कामाचा व्याप प्रचंड आहे. तसेच तो चित्रपटसृष्टीत सक्रिय आहे, त्यामुळे तो त्याच्या शूटिंगच्या निमित्ताने जास्त वेळ भारतातच घालवतो. माधवन एक उत्तम पती, वडील आणि अभिनेता-दिग्दर्शक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या चोख पार पाडतोय. कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी तो आपल्या वेळेचं नियोजन अतिशय काळजीपूर्वक करतो.
माधवन सण-उत्सव कुटुंबाबरोबर साजरे करतो. इतकंच नाही तर नवीन वर्ष असो वा वाढदिवस तो नेहमी कुटुंबाबरोबर असतो. सोमवारी, १ जून रोजी माधवनचा ५६ वा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिरजे हिने सोशल मीडियावर एक सुंदर व्हिडीओ शेअर केला. माधवनच्या दुबईतील आयुष्यातील अनेक न पाहिलेल्या क्षणांची झलक या व्हिडीओत पाहायला मिळाली.
या व्हिडीओच्या सुरुवातीला सरिता आणि वेदांत हे माधवनबरोबर डिनरचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यानंतर, या कपलचे दुबईत एकमेकांचा हात धरून फिरतानाचे अनेक सुंदर आणि रोमँटिक क्षण या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात. या व्हिडीओसाठी सरिताने दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांच्या ‘मिन्नाले’ (२००१) या चित्रपटातील माधवनचं अत्यंत लोकप्रिय ‘वसिगरा’ हे गाणं वापरलंय. व्हिडीओमध्ये पुढे माधवन आणि सरिता वेगवेगळ्या डिनर डेट्सचा आनंद घेताना दिसत आहेत. एका क्लिपमध्ये, माधवन दुबईच्या रस्त्यांवर बाईक चालवण्याचा आनंद घेत असून, कॅमेऱ्याकडे पाहून हसताना दिसतोय.
पाहा आर माधवनचा व्हिडीओ
दुसऱ्या एका क्लिपमध्ये, माधवन आपल्या अपार्टमेंटमध्ये जमिनीवर पडून आपल्या पाळीव श्वानाबरोबर आराम करताना दिसतोय. गोल्फ खेळण्याचा आनंद घेण्यापासून ते आपल्या आईसह संपूर्ण कुटुंबाबरोबर दर्जेदार वेळ घालवण्यापर्यंत, सरिताने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये माधवन यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर क्षण पाहायला मिळतात.
सरिता बिरजेची माधवनसाठी खास पोस्ट
“माझ्या अप्रतिम पती आणि एका उत्तम बाबाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दररोज आपल्या कुटुंबाला जे प्रेम, मार्गदर्शन आणि पाठिंबा देता, त्यासाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. तुमचे अफाट कष्ट, जिद्द आणि यशाबद्दल आम्हा दोघांनाही तुमचा प्रचंड अभिमान वाटतो. आम्हाला तुमचा खंबीरपणा, प्रेमळ स्वभाव आणि कामाप्रती असलेली निष्ठा खूप आवडते. तुम्ही आमच्या आयुष्यात आहात यासाठी आम्ही नशीबवान आहोत. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आनंद, प्रेम आणि तुम्हाला हव्या असलेल्या सर्व सुखांनी भरलेलं असो,” असं सरिताने कॅप्शनमध्ये लिहिलंय.
दरम्यान, माधवन आणि सरिता यांची पहिली भेट १९९० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली होती. सरिता कोल्हापूरमध्ये माधवनच्या ‘पब्लिक स्पीकिंग’ आणि ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’च्या क्लासला आली होती. तिला एअर होस्टेस व्हायचं होतं. तिचं स्वप्न पूर्ण झाल्यावर तिने माधवनचे आभार मानण्यासाठी डिनरला नेलं होतं. तिथून या दोघांच्या नात्याची सुरुवात झाली आणि ८ वर्षे डेट केल्यावर १९९९ साली त्यांनी लग्न केलं.
