आर. माधवन गेल्या अनेक दशकांपासून मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. पण अनेकांना माहीत नसेल या क्षेत्रात काम करायला सुरुवात करण्यापूर्वी त्याला कॅनडामध्ये राहण्याची संधी मिळालेली. याबद्दल त्याने स्वत: सांगितलं होतं. मात्र परदेशात राहत असताना तेथील खाद्य संस्कृतीबरोबर जुळवून घेणं त्याला कठीण गेल्याचं म्हणत त्याने एक प्रसंगही सांगितला.

आर.माधवनने सांगितलं की तो ज्या कुटुंबाबरोबर राहत होता ते गायीच्या मांसाचा व्यवसाय करायचे आणि तो शाकाहारी असल्याने त्याच्यासाठी ते खूप कठीण गेलं. २०२३मध्ये ‘इंडियन स्कूल ऑफ बिझनेस’च्या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या एका मुलाखतीत आर. माधवनने हा अनुभव त्याच्या जडणघडणीच्या काळासाठी खूप महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. कॅनडातील स्टेटलर येथे राहिल्याची आठवण सांगताना तो म्हणाला, “रोटरीच्या माध्यमातून मला एक्स्चेंज स्टुडंट म्हणून कॅनडाला जाण्याची संधी मिळाली. मी स्टेटलर नावाच्या ठिकाणी गेलो. तो भाग म्हणजे एकदम वाइल्ड वेस्टसारखा होता. तिथे काऊबॉय संस्कृती होती आणि मी त्या लोकांबरोबर राहत होतो. मी कट्टर शाकाहारी आहे, पण ज्या कुटुंबांत मी राहत होतो, ते उदरनिर्वाहासाठी गायीचं मांस विकण्याचं काम करायचे. त्यामुळे माझ्यासाठी तो सगळा अधर्म होता”.

आर.माधवनला परदेशातील मुलांबरोबर जुळवून घेणं कठीण गेलं

त्यानंतर माधवनने स्टेटलरमधील त्याच्या स्थानिक शाळेच्या बास्केटबॉल टीममध्ये असताना आलेल्या एका अनुभवाचा उल्लेख केला. त्याच्या मते, त्या काळातील हा सर्वात मोठा अधर्म होता. इतर मुलांच्या तुलनेत त्याची उंची कमी असतानाही भारतीय मुलाची बास्केटबॉल टीममध्ये निवड होणं ही मोठी कामगिरी मानली जात होती. मात्र, पुढील सामन्यांची मालिका खेळण्यासाठी त्याला जवळच्या दुसऱ्या शहरात सात दिवस जावं लागलं आणि तिथून त्याचा कठीण प्रवास सुरू झाला, असं त्याने सांगितलं.

आर. माधवन म्हणाला, “तिथे असंच असतं. सामना झाल्यानंतर तुम्ही मुलांच्या लॉकर रूममध्ये जाता आणि शॉवर घेता. माझा खरा कठीण प्रवास तिथून सुरू झाला. आजच्या काळापेक्षा तेव्हा पुरुषांसाठीच्या शॉवरमध्ये मध्ये एक खांब असायचा आणि त्याच्या आजूबाजूला सहा शॉवर हेड्स असायचे. सगळी मुलं एकत्र शॉवर घ्यायची. त्यांच्यासाठी हे अगदी सामान्य होतं.” माधवनने पुढे सांगितलं की, त्या शॉवरमध्ये जाण्याची त्याला इतकी भीती आणि संकोच वाटत होता की, सामना खेळण्यापेक्षाही शॉवर घेण्याची चिंता त्याला जास्त होती.

आर.माधवनची इन्स्टाग्राम पोस्ट

त्याने सांगितलं की, तो दाक्षिणात्य कुटुंबातून आला असून त्यांच्या घरी कपड्यांशिवाय फिरणंसुद्धा कधीच सामान्य नव्हतं. त्यामुळे सगळ्या मुलांबरोबर एकत्र शॉवर घेणं त्याच्यासाठी मोठं आव्हान होतं. तो म्हणाला, “मला तिथे कपड्यांशिवाय कसं चालत जायचं, हेच कळत नव्हतं.” आर.माधवनने यामधून परदेशात असताना त्याच्यासाठी या सर्व गोष्टी तेथील सामान्य माणसांप्रमाणे करणं किती कठीण होतं याबद्दल सांगितलं.