Dhurandhar Peak Detailing by Aditya Dhar : आदित्य धर यांच्या ‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर २’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश कमावलं. चित्रपटाची गोष्ट, रणवीर सिंहचा अभिनय आणि जबरदस्त गाणी, यामुळे ‘धुरंधर’ चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. यामध्ये आणखी एका गोष्टीची जोरदार चर्चा रंगली, ती म्हणजे आदित्य धर यांचे ‘पिक डिटेलिंग’; दोन्ही चित्रपटांमध्ये अगदी बारकाईने केलेले काम प्रेक्षकांच्या लक्षात आले. सोशल मीडियावर यांचे अनेक मीम्स आणि पोस्ट तयार करण्यात आले होते. यानंतर आता आदित्य धर यांनी सिनेमातील या लहान लहान गोष्टींसाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे अभिनेता आर. माधवनने सांगितले आहे.

‘धुरंधर’ चित्रपटामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या आर. माधवनने ‘गुल्टे डॉट कॉम’ (Glute. com) ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याचे अनुभव शेअर केले आहेत. यावेळी त्याने ‘धुरंधर’ चित्रपटाच्या बारीक गोष्टींसाठी निर्मात्यांनी अतिरिक्त १० कोटी रुपये खर्च केल्याचे सांगितले आहे. तसेच संपूर्ण आठ तासांच्या या प्रोजेक्टमध्ये खूप मेहनत घेतल्याचे आणि सिनेमातील सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवल्याचे आर माधवनने सांगितले आहे.

‘धुरंधर’ सिनेमाबद्दल काय म्हणाला आर. माधवन?

‘धुरंधर’च्या यशाबद्दल बोलताना आर. माधवनने चित्रपटातील बारकाईवर मेहनत घेतल्याचे सांगत विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “आठ तासांचा इतका मोठा प्रोजेक्ट करताना त्यामध्ये प्रत्येक बारीक गोष्टीवर लक्ष द्यायचं असेल तर खूप वेळ लागतो आणि एवढी मेहनत घेऊनही या गोष्टी प्रेक्षकांच्या लक्षात येतीलच असं नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कुणीतरी मला सांगितलं होतं की, सिनेमामध्ये या पीक डिटेलिंगसाठी खास मेहनत घेण्यात आली आहे. सिनेमातील या पीक डिटेलिंगसाठी १० कोटी रुपये जास्त खर्च केले आहेत. हे ऐकताच मी त्यांना म्हणालो, ‘तुम्ही काय वेडे आहात का? हे सगळं कोण पाहणार आहे? कुणाच्या लक्षातसुद्धा येणार नाही.”

पुढे तो म्हणाला, “पण जेव्हा तुमचा उद्देश योग्य असतो आणि तुम्ही एखादी गोष्ट मांडता, तेव्हा लोकांना ती समजते आणि त्यांच्यापर्यंत पोहोचते; कारण प्रेक्षक खूप हुशार असतात. ‘धुरंधर’च्या यशाने तर मला हादरवून टाकलं असं मी म्हणणार नाही, कारण खूप दिवसांपासून मी मेहनत घेत होतो. ती मेहनत योग्य दिशेने आणि पद्धतीने घेतोय का हे मला बघायचं होतं आणि सिनेमाच्या जबदरस्त यशाने मला माझं उत्तर दिलं. मी योग्य दिशेने जातोय हे लक्षात आलं. यामुळे माझा विश्वास खूप वाढला. आपल्या चित्रपट निर्मात्यांनी आता प्रेक्षकांच्या विचारांशी जुळवून घ्यायला हवं, ही सर्वांत मोठी गोष्ट माझ्या धुरंधरमुळे लक्षात आली.”

‘पीक डिटेलिंग बाय आदित्य धर’चा सोशल मीडियावर ट्रेंड

‘धुरंधर’ चित्रपटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर ‘पीक डिटेलिंग बाय आदित्य धर’ हे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेंडमध्ये आले होते. अनेकांनी यावरून व्हिडीओ शेअर करत सिनेमामध्ये बारकाईने केलेल्या कामाचे कौतुक केले होते. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या बारकाईने केलेल्या कामाचं कौतुक करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. सिनेमातील बारकावे यावर मेहनत घेतल्याचे आणि त्यासाठी १० कोटी रुपये खर्च केल्याचे आर. माधवनने सांगितले आहे.