R Madhavan Dhurandhar Propaganda : मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणून आर. माधवननं त्याची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यानं मोठा चाहतावर्ग कमावला आहे. ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळख मिळवलेल्या माधवनला नुकतंच पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अनेक वर्षं आपल्या प्रभावी अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या माधवननं ‘धुरंधर’ चित्रपटातही महत्त्वाची भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं असलं तरी ‘धुरंधर’ चित्रपट हा प्रोपगंडा असल्याची टीका केली जाते. या टीकेवर आता आर. माधवननं प्रतिक्रिया दिली आहे.
‘गलाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवननं सिनेविश्वातील त्याचे अनुभव शेअर केले आहेत. यावेळी त्यानं जबरदस्त हिट ठरलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाबाबत भूमिका मांडली. अनेकदा सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्यांना सरकारला पाठिंबा देणारा बोलले जात असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना आर. माधवननं ट्रोलिंग आणि टीका याबाबत त्यांची भूमिका मांडली आहे.
काय म्हणाला आर.माधवन?
आर. माधवन म्हणाला, “जे पण लोक कमेंट करीत असतात, त्यातील पैसे घेऊन कोण बोलतंय आणि खऱ्या प्रतिक्रिया कोण देतंय हे तर लगेच लक्षात येतं. प्रत्येक व्यक्ती ज्या संस्कारांत वाढते, त्यानुसार विचार करत असते. माझ्यावरही लहानपणापासून देशावर प्रेम करावं, असे संस्कार झाले आहेत. मी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाविरोधात किंवा त्यांच्या नेत्यांविरोधात काहीही पोस्ट केलेली नाही. एखाद्या व्यक्तीनं चांगलं काम केलं असेल, तर मी त्याचं कौतुक केलं आहे.
पुढे तो म्हणाला, “एखादी व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान म्हणून निवडून आली असेल, तर तिला पाठिंबा देणं हे माझं कर्तव्य आहे, असं मला वाटतं. मी सोशल मीडियावरील कमेंट्स वाचतो; पण त्याचा माझ्यावर किंवा माझ्या निर्णयांवर कोणताही परिणाम होत नाही. जर यामुळे कुणी मला चुकीचं ठरवत असेल, तर मला त्यांच्या हेतूबद्दलच प्रश्न पडतो.”
कोणतंही राजकीय विधान करीत नाही – आर माधवन
आर. माधवनची भूमिका असलेल्या ‘धुरंधर’ चित्रपटावरही अनेकदा टीका केली जाते. हा चित्रपट ‘प्रोपगंडा’ आणि ‘सरकारचे समर्थन करणारा’ असल्याची टीका सोशल मीडियावर केली जाते. याआधी ‘रॉकेट्री : द नांबी इफेक्ट’ चित्रपटात माजी इस्रो शास्त्रज्ञ नांबी नारायणन यांना प्रार्थना करताना दाखवल्यामुळेही आर. माधवनवर टीका झाली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना माधवननं आपण कोणतंही राजकीय विधान करीत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं. तसेच सोशल मीडियावरील या टीकेचा काही अर्थ लागत नसल्यानं याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं.
…तर त्यात चुकीचं काय आहे?
आर. माधवन म्हणाला, “धुरंधर हा चित्रपट पाकिस्तानच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. त्या चित्रपटात जे काही चांगलं किंवा वाईट घडतं, त्याचा भारतावर कसा परिणाम होतो, हे दाखवण्यात आलं आहे. मग त्यात प्रोपगंडा कुठे आहे, हे मला समजत नाही. नांबी नारायणन यांच्यावर आधारित चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर त्यांच्या आयुष्याची कथा प्रामाणिकपणे मांडायची असेल, तर ते प्रत्यक्षात जसे होते, तसेच दाखवावं लागेल. जर ते मंदिरात जात असतील, तर मी ते दाखवणारच आणि जी. डी. नायडू नास्तिक असतील, तर त्यांच्या व्यक्तिरेखेलाही तसंच दाखवावं लागेल. मी त्यांना प्रार्थना करायला लावत नाही, तर ते जसे होते, तसं सादर करतो. अभिनेता म्हणून तेच माझं काम आहे. आणि वैयक्तिक मत म्हणून सांगायचं झालं, तर मला भारतातील चांगल्या गोष्टी अधोरेखित करायच्या आहेत. तर त्यात चुकीचं काय आहे?”
दरम्यान, आर. माधवन याचा लवकरच ‘जीडीएन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक कृष्णकुमार रामकुमार यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट ७ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामध्ये आर. माधवनसह सत्यराज, प्रियमणी, जयराम, दुशारा विजयन, विनय राय व योगी बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘भारतातील एडिसन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जी. डी. नायडू यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर आधारित ही कथा असून, त्यांचे योगदान पडद्यावर मांडण्यात येणार आहे.
