R Madhavan Organic Farming: अभिनेता आर. माधवनची आवड फक्त चित्रपटांपुरती मर्यादित नसून सेंद्रिय शेती हा त्याच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग बनला आहे. मुंबईतील घराच्या टेरेसवर रोजच्या गरजेचा तब्बल ७० टक्के सेंद्रिय भाजीपाला पिकवण्यापासून ते तामिळनाडूतील पालनी येथील पडीक आणि ओसाड जमिनीचा कायापालट करत तिथे गोड नारळांची बाग फुलवण्यापर्यंतचा माधवनचा प्रवास थक्क करणारा आहे.
२०१७ मध्ये ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एका मुलाखतीत माधवनने सेंद्रिय शेतीकडे वळण्यामागची भूमिका स्पष्ट केली होती. आजकालच्या अन्नधान्यातील घटत चाललेली पोषक मूल्ये आणि जेनेटिक मॉडिफिकेशन याबद्दल त्याला काळजी वाटत होती. यावर अभ्यास केल्यानंतर त्यांनी स्वतः बागकामाचा प्रयोग सुरू केला.
एका चित्रपटाच्या कथेवर काम करत असताना माधवनचा बराच वेळ घरात जात होता. याच काळात त्याने सेंद्रिय शेतीविषयी वाचन केलं. “माझ्या टेरेस गार्डनमुळे माझ्या घरातील रोजच्या गरजेचा तब्बल ७० टक्के मोसमी भाजीपाला मिळतो,” असं म्हणत त्याने आनंद व्यक्त केला होता. माधवन गच्चीवर भेंडी, वांगी, ब्रोकली, टोमॅटो आणि काकडी यांसारख्या विविध भाज्या पिकवायचा.
टेरेस गार्डनसाठी माधवनने दिलेल्या ७ महत्त्वाच्या टिप्स:
- नेहमी चांगल्या दर्जाची सेंद्रिय माती वापरा.
- सेंद्रिय बियाण्यांची निवड अत्यंत काळजीपूर्वक करा.
- शक्यतो स्थानिक बियाण्यांचा शोध घ्या आणि त्यांचा वापर करा.
- रोपांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळेल याची खात्री करा.
- झाडांच्या आसपास मोकळी हवा खेळती राहील अशी व्यवस्था करा.
- रोपांना गरजेपेक्षा जास्त पाणी देणे टाळा.
- लहान आणि नाजूक रोपांचे नुकसानापासून संरक्षण करा.

माधवन आणि त्याच्या भावाने पडीक जमिनीवर फुलवलेली नारळाची बाग
गच्चीवरील शेतीचा प्रयोग करण्यापूर्वीच माधवन यांनी आपले भाऊ सुबायोगन यांच्या साथीने तामिळनाडूतील पलानीजवळ एका ओसाड आणि पडीक जमिनीचा कायापालट केला होता. आधुनिक, सेंद्रिय आणि पारंपारिक देशी पद्धतींचा सुरेख मेळ घालत त्यांनी तिथे नारळाची सुंदर बाग फुलवली.
माधवनने २०२० मध्ये सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट शेअर केली होती. “अखेर तामिळनाडूतील पालनी येथील नारळ लागवडीचा प्रकल्प पूर्ण झाला. एखादा सिद्धांत प्रत्यक्षात उतरताना पाहणं खूप समाधानकारक असतं. या जमिनीच्या नवीन स्थानिक मालकांचं अभिनंदन आणि त्यांना खूप प्रेम. आम्हाला जसं समाधान मिळालं, तसंच त्यांनाही मिळो. ही पवित्र जागा सोडताना थोडं वाईट वाटतंय. पालनीतील सर्वांचे आभार. हा एक विलक्षण प्रकल्प होता. यात आम्ही ओसाड जमिनीवर अत्यंत गोड आणि सुगंधी, शुद्ध बुटक्या प्रजातीचे नारळ पिकवले,” असं आर माधवनने लिहिलं होतं.
कष्ट सार्थकी लागले – माधवन
‘मुंबई मिरर’ला दिलेल्या मुलाखतीत माधवनने आपला अनुभव सांगितला होता. “ती ओसाड जमीन पुन्हा जिवंत झालेली पाहणं आणि तिथून अपेक्षित उत्पन्न मिळणं, हा अनुभव थक्क करणारा होता. जमिनीसाठी योग्य खत तयार करण्यापासून ते विहिरीत योग्य प्रकारचे मासे सोडण्यापर्यंत, या प्रवासातील प्रत्येक गोष्ट शिकणं अनमोल होतं. यासाठी घेतलेले कष्ट सार्थकी लागले,” असं आर माधवन म्हणाला होता.
एएनआयशी बोलताना माधवनने हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव असल्याचं म्हटलं होतं. “हा आमच्या आयुष्यातील अत्यंत समाधानकारक अनुभव ठरला आहे. जमिनीचा पोत सुधारून ती पुन्हा सुपीक झालेली पाहणं खूपच भारी होतं,” असं त्याने म्हटलं होतं.
माधवन नुकताच दिग्दर्शक कृष्णकुमार राजकुमार यांच्या ‘जीडीएन’ या बायोपिकमध्ये झळकला होता. यात सत्यराज, जयराम, प्रियमाणी आणि दुषारा विजयन हे कलाकारही होते.
