अभिनेता आर.माधवनने आतापर्यंत अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आतापर्यंत त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे, पण आता अभिनेत्याला मानाच्या पुरस्कारांपैकी एक मानल्या जाणाऱ्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. ही त्याच्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट असून अभिनेत्याचं यासाठी अनेक जण कौतुक करत आहेत. अशातच आता त्याच्या पत्नीनेही खास पोस्ट शेअर केली आहे.

आर.माधवनला त्याच्या कामाची पोचपावती म्हणून आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असतील पण, त्याला नुकत्याच मिळालेल्या पद्मश्री पुरस्काराचं महत्त्व आणि आनंद खूप मोठा असतो. अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला होता. आता अशातच त्याची पत्नी सरिता बिरजेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

आर.माधवनच्या पत्नीने केलं कौतुक

सरिता बिरजे यांनी या संदर्भातील आर.माधवन आणि कुटुंबाबरोबरचे काही खास फोटो पोस्ट करत त्याचं कौतुक केलं आहे. सरिता बिरजे या पोस्टमधून म्हणाल्या, “पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन. तुझं काम, तुझा छंद आणि कलेप्रती असलेली आवड यामुळे तू अनेकांची मनं जिंकली आहे. मला तुझा आज आणि कायम खूप अभिमान आहे.”

सरिता बिरजे यांनी शेअर केलेल्या या पोस्टखाली शिल्पा शेट्टी, अनुपम खेर, भाग्यश्री पटवर्धन, सुनील ग्रोवर अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. आर.माधवननेसुद्धा पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत मोठी कॅप्शन दिली आहे. यामधून अभिनेत्याने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टमधून त्याने भारत सरकारचे आभार मानले आहेत. यावेळी त्याने महाराष्ट्र सरकारने त्याचं या पुरस्कारासाठी नाव सुचवून त्याच्या कामावर विश्वास दाखवल्याने आभार व्यक्त केले आहेत. आर,माधवनच्या या पोस्टखाली बॉलीवूडमधील प्रिती झिंटा, प्रियांका चोप्रा अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत कौतुक केलं आहे. तर त्याच्या चाहत्यांनीही यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, आर. माधवनने ‘रेहना है तेरे दिल मेै’, ‘३ इडियट्स’, ‘रॉक्रेट्री’, ‘शैतान’ यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांमधील दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हिंदी, तमिळसह विविध भाषांतील चित्रपटसृष्टीत त्याने यशस्वी कारकीर्द घडवली असून, देशातील सर्वाधिक अष्टपैलू आणि आदरणीय अभिनेत्यांपैकी एक म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे. अलीकडेच तो ‘धुरंधर’ या चित्रपटात झळकला होता.