आर. माधवनचा मुलगा वेदांत माधवन एक उत्कृष्ट जलतरणपटू आहे. देशासाठी ऑलिम्पिक पदक जिंकण्याचं वेदांतचं स्वप्न आहे. राधिका गुप्ता यांच्याशी संवाद साधताना, माधवनने वेदांतला घडवणाऱ्या पालकत्व तत्त्वांबद्दल मनमोकळेपणाने चर्चा केली. यात त्याने मुलाला कृतज्ञता व आदर शिकवण्यापासून ते त्याला मिळालेल्या सुखाची सवय होऊ न देणं अशा बऱ्याच गोष्टी सांगितल्या.

माधवन स्वतः एका मध्यमवर्गीय कुटुंबातला आहे, पण तो यशस्वी झाला, त्यामुळे तो मुलाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देऊ शकतो. माधवन म्हणाला, “कोणत्याही मुलामध्ये असायलाच हवा असा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे कृतज्ञतेची भावना होय. आम्ही अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो असलो, तरी देवाने दिलेल्या यशामुळे मी वेदांतला हवी असलेली प्रत्येक गोष्ट देऊ शकलो. पण या गोष्टींबरोबर काही आव्हानं देखील येतात असं मला जाणवलं.”

माधवनने मुलाला कृतज्ञता शिकवली

माधवनच्या मते, त्याच्या मुलाला याची जाणीव असायला हवी की जे सुख त्याला आता मिळतंय, ते दुसऱ्याने केलेल्या कष्टाचं फळ आहे. “मला जाणवलं की मला वेदांतला दोन गोष्टी शिकवण्याची गरज होती. पहिली म्हणजे कृतज्ञतेची भावना. त्याला हे ऐशोआरामाचं आयुष्य मिळालं आहे, त्यासाठी कोणीतरी दुसऱ्याने प्रचंड मेहनत केली आहे.”

वेदांतला पैशाचं महत्त्व कळावं, यासाठी माधवन त्याला रोजच्या जगण्यातील साधी उदाहरणं द्यायचा. “कधीकधी मी त्याला आमच्या घरी स्वयंपाक करणाऱ्याचा पगार सांगायचो आणि म्हणायचो, ‘तुला गिफ्टमध्ये मिळालेल्या या खेळण्याची किंमत किती आहे माहीत आहे का? या माणसाला त्या स्वयंपाकघरात राहून या खेळण्याचा एक भाग खरेदी करण्यासाठीही पूर्ण एक वर्ष काम करावे लागेल.’ या गोष्टीचा वेदांतच्या मनावर मोठा परिणाम झाला,” असं माधवनने सांगितलं. माधवनच्या या शिकवणीमुळे वेदांतने त्या वस्तू सहज मिळाल्यात हे गृहित धरणं सोडलं.

माधवनने मुलाला आदर शिकवला, कारण…

कृतज्ञतेबरोबरच आपल्या मुलाने प्रत्येकाच्या कामाचा सामाजिक स्तर न बघता आदर करावा, असं माधवनला वाटत होतं. “दुसरी गोष्ट मी वेदांतकडून आवर्जून करून घेतली ती म्हणजे, त्याने प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. मग ते लिफ्टमन असो, सुरक्षा रक्षक, ड्रायव्हर्स किंवा कामावर येणाऱ्या मावशी असोत. मी त्याला सांगितलं होतं की त्यांना अरे-तुरे न करता ‘दीदी’ आणि ‘भैय्या’ म्हणून आदराने हाक मारायची,” असं माधवन म्हणाला.

“हा केवळ चांगल्या शिस्तीचा भाग नाही, तर ही परिस्थितीची जाणीव असण्याची गोष्ट आहे. माझ्या मुलाला तो कुठे आहे, कोणाशी बोलतोय याची जाणीव असावी आणि ज्यांच्याकडे जास्त पैसे नाहीत अशा लोकांनाही त्याने आदर द्यावा, अशी माझी इच्छा होती,” असं माधवनने नमूद केलं. “जर वॉचमनने येऊन मला सांगितलं की, ‘तुमचा मुलगा खूप नम्र आहे, तो मला नेहमी नमस्कार करतो,’ तेव्हा मला वाटायचं की मी त्याला चांगले संस्कार दिलेत,” असं माधवनने अभिमानाने सांगितलं.

दरम्यान, आर माधवन व सरिता बिर्जे यांनी १९९९ साली लग्न केलं होतं. त्यांचा मुलगा वेदांतचा जन्म २००५ साली झाला. वेदांत २१ वर्षांचा असून आई-वडिलांबरोबर दुबईत राहतो. वेदांतला जलतरणपटू म्हणून करिअर करण्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी माधवन कुटुंबासह करोनाकाळात दुबईत स्थायिक झाला.