आर. माधवनने आतापर्यंत अनेक चित्रपटांतून काम करत प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्याच्या अनेक भूमिकांची क्रेझ आजही प्रेक्षकांमध्ये कायम आहे. ‘धुरंधर’पूर्वी आर. माधवनच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या भूमिकांपैकी एक म्हणजे ‘३ इडियट्स’मधील फरहान ही भूमिका. राजकुमार हिरानी दिग्दर्शित आणि आमिर खान अभिनित या चित्रपटात माधवनने इंजिनिअरिंगचं शिक्षण अर्धवट सोडून वन्यजीव छायाचित्रकार होण्याचं स्वप्न पूर्ण करणाऱ्या फरहानची भूमिका साकारली होती.

या भूमिकेमुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, एवढं प्रेम मिळूनही या चित्रपटाचा तमिळ रिमेक ‘ननबन’मध्ये त्याने हीच भूमिका पुन्हा साकारण्यास नकार दिला होता. लेखक चेतन भगतच्या यूट्यूब चॅनलवरील मुलाखतीत आर. माधवनने हा निर्णय का घेतला, याचा खुलासा केला होता. त्याने सांगितलं की, ‘ननबन’ नाकारण्यासाठी त्याने अनेक कारणं दिली होती, कारण तमिळ रिमेकवर त्याचा पूर्ण विश्वास नव्हता.

आर.माधवनने जोसेफ विजयच्या ३ इडियट्सच्या रिमेकला दिलेला नकार

‘ननबन’ का नाकारला, असा प्रश्न विचारल्यानंतर माधवन म्हणाला की, आयुष्यात तो नेहमी एक महत्त्वाचं नियम पाळतो “जे दिसतं त्यापलीकडे पाहा.” हेच सूत्र त्याला अनेकदा योग्य निर्णय घेण्यास मदत करत असल्याचंही त्याने सांगितलं. आर. माधवन म्हणाला, “३ इडियट्स’चा तमिळ रिमेक करण्याच्या दृष्टीने पाहिलं, तर यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्या चित्रपटात होत्या. त्यामुळे तो चित्रपट हिट होणार, हे जवळपास निश्चितच होतं.” त्याने पुढे सांगितलं की, त्या चित्रपटात आताचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय मुख्य भूमिकेत दिसणार होते, त्यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच उत्सुकता होती.

याबाबत पुढे बोलताना अभिनेता म्हणाला, “३ इडियट्स करताना मी त्या भूमिकेला नव्याने समजून घेतलं आणि त्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तमिळ रिमेकमध्ये तीच भूमिका पुन्हा केली असती, तर मी फक्त आधीच केलेल्या गोष्टीची पुनरावृत्ती केली असती. त्यामुळे त्यात काही वेगळं करता आलं नसतं”.

आर.माधवन पुढे म्हणाला, “अभिनय करताना प्रत्येक वेळी एक वेगळाच अनुभव मिळतो. जर मी पुन्हा तीच भूमिका केली असती तर ती तितकी प्रभावी झाली नसती. कारण एक प्रकारचा आत्मविश्वास किंवा निष्काळजीपणा येतो. मी ही भूमिका आधीच केली आहे, त्यामुळे आता कुणाशी स्पर्धा नाही, असा विचार मनात येऊ शकतो. म्हणून ३ इडियट्समधील फरहान या भूमिकेमुळे मिळालेलं नाव खराब झालं असतं आणि लोकांना तेच लक्षात राहिलं असतं.”

आर. माधवन पुढे म्हणाला, “मी ननबनसाठी नकार देताना सांगितलं होतं की, आता माझं वय त्या भूमिकेसाठी योग्य राहिलेलं नाही. ३ इडियट्स करतानाच मी ४० वर्षांचा होतो आणि दिग्दर्शक शंकर यांना चित्रपट पूर्ण करायला बराच वेळ लागतो. त्यामुळे पुन्हा कॉलेजमधील तरुण विद्यार्थ्याची भूमिका साकारणं माझ्यासाठी शक्य होणार नाही, असं मला वाटलं. त्या भूमिकेसाठी ३५ वर्षांच्या आसपासचा अभिनेता योग्य ठरेल, ५० वर्षांच्या जवळ पोहोचलेला अभिनेता नव्हे. हेही एक महत्त्वाचं कारण होतं.”