R Madhavan Education: इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नसतानाही कौशल्य आणि परिश्रमाच्या जोरावर माणूस यशस्वी होऊ शकतो, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अभिनेता आर. माधवन आहे. बालपणी जमशेदपूरमध्ये वाढताना आई आणि वडील दोघेही नोकरी करत असल्याने शेजारी त्यांना कसे अपराधी ठरवायचे आणि मुलांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत टोमणे मारायचे, याबद्दल माधवनने भाष्य केले. आपण अभ्यासात फारसे हुशार नव्हतो आणि इंजिनिअर नसून जेमतेम गुणांनी बी.एससी. झालो होतो, असा खुलासाही त्याने केला. मात्र पालकांच्या नोकरीमुळेच आपल्याला परदेशातील संधी आणि एक्सपोजर मिळाले, ज्यामुळे आपले आयुष्य बदलल्याचे माधवनने स्पष्ट केले.
माधवनचे वडील रंगनाथन एका खासगी कंपनीत काम करायचे, तर आई सरोजा बँकेत नोकरी करायच्या. माधवनचा चित्रपटसृष्टीशी दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नव्हता. तरीही तो या क्षेत्रात आला आणि यशस्वी झाला. आर. माधवनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. लहानपणी माधवनच्या शेजाऱ्यांना वाटायचं की माधवन व त्याची बहीण आयुष्यात कधीच यशस्वी होणार नाहीत, कारण म्हणजे त्याचे आई-वडील दोघेही नोकरी करायचे, त्यामुळे त्यांना मुलांची काळजी घ्यायला वेळ मिळत नाही असं लोकांना वाटायचं.
मी इंजिनिअर नाही, आर माधवनचा शिक्षणाबद्दल खुलासा
माधवनने पुढे सांगितलं की, शेजारचे लोक त्याच्या आई-वडिलांना दोघेही नोकरी करत असल्याबद्दल सतत अपराधीपणाची जाणीव करून द्यायचे. मात्र, आई-वडील दोघेही कमवत असल्यानेच त्याला आपली स्वप्ने पूर्ण करता आली. “माझा जन्म जमशेदपूरला झाला. माझे आई-वडील दोघेही नोकरी करायचे आणि आम्ही दोघे भावंडं घरात असायचो, अशा परिस्थितीत आम्ही वाढलो. त्या काळात इंजिनिअर किंवा डॉक्टर होणं हेच चांगलं मानलं जायचं. पण अभ्यासात मी फारसा हुशार नव्हतो. लोकांना वाटतं की मी इंजिनिअर आहे, पण तसं नाही. मी इलेक्ट्रॉनिक्स विषयात जेमतेम पासिंग मार्क्स मिळवून बी.एससी. केलंय,” असं M9 न्यूजला दिलेल्या मुलाखतीत माधवन म्हणाला.
शेजाऱ्यांना वाटायचं की आमचं काहीच भविष्य नाही- आर माधवन
तो पुढे म्हणाला, “माझे आई-वडील दोघेही नोकरी करत असल्यामुळे माझी काळजी घ्यायला किंवा माझा अभ्यास घ्यायला घरी कोणी नसायचं. मी आणि माझी बहीण दिवसभर मैदानावर उनाडक्या करत फिरत असायचो. त्यामुळे आमच्या सोसायटीतील सर्वांना वाटायचं की आमचं काहीच भविष्य नाही आणि आम्ही आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाहीत. मुलांकडे दुर्लक्ष करून दोघेही नोकरी का करत आहेत, यावरून माझ्या आई-वडिलांना सतत अपराधी वाटेल असं शेजारी बोलायचे.”
आई-वडील नोकरी करत होते याचा मला आनंद- आर माधवन
मात्र, माधवनच्या आई-वडिलांनी अशा टीकेकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि ते काम करत राहिले. “लोक त्यांना विचारायचे की तुम्ही मुलांपेक्षा कामाला जास्त महत्त्व कसे देताय? पण मला वाटतं की ते दोघेही नोकरी करत होते म्हणूनच मला सगळ्या सुविधा मिळाल्या. एक्सचेंज स्टुडंट म्हणून माझे परदेश दौरे आणि इतर देशांमधील स्कॉलरशिपचा खर्च माझ्या आई-वडिलांना झेपला, कारण ते दोघेही कमवत होते. या संधींमुळे मी बदललो आणि सोसायटीतील इतर लोकांपेक्षा मला वेगळी ओळख मिळवून दिली. त्यामुळे माझे आई-वडील दोघेही नोकरी करत होते याचा मला खूप आनंद आहे, त्यांनी माझ्यासमोर एक योग्य आदर्श ठेवला,” असं आर. माधवनने नमूद केलं.
आर. माधवनच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास, तो नुकताच ‘जीडीएन’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकला. या चित्रपटात सत्यराज, जयराम, प्रियामणी, दुशारा विजयन आणि विनय राय यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
