R Madhavan on quit acting: आर. माधवन हा भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. नुकताच तो धुरंधर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. तसेच, शैतान, विक्रम वेधा, केसरी २ या त्याच्या अलीकडील चित्रपटांतील भूमिकांचीदेखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. या चित्रपटांतील त्याचा अभिनय आधीपेक्षा वेगळा असल्याचे म्हणले गेले.
एका मुलाखतीत आर. माधवनने त्याच्या सादरीकरणामध्ये आधीपेक्षा बदल का आणि कसा झाला, याबद्दल वक्तव्य केले आहे. अभिनेत्याने खुलासा केला की त्याने चार वर्षे अभिनयातून ब्रेक घेतला होता.
आर. माधवनने २०११ ला अभिनयातून ब्रेक घेतला होता. २०१६ ला त्याने साला खडूस या चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर त्याने आधीपेक्षा वेगळ्या भूमिका निवडण्यास प्राधान्य दिले.
अभिनेत्याने नुकतीच अनफिल्टर्ड एंटरटेन्मेंटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तो ब्रेक घेण्याबद्दल म्हणाला, “विक्रम वेधा हा चित्रपट मला एका ब्रेकनंतर मिळाला. ‘साला खडूस’च्या आधी मी अभिनयातून थोडा ब्रेक घेतला होता. कारण- मी करत असलेल्या कामाच्या स्वरूपामुळे खूपच निराश झालो होतो.”
“मला खूप राग आला…”
पुढे तो म्हणाला, “मी एका तमीळ गाण्याचे स्वित्झर्लंडमध्ये शूटिंग करत होतो. त्यावेळी मी केशरी रंगाचा शर्ट आणि हिरव्या रंगाची पँट घातली होती. आम्ही रस्त्याच्या मधोमध होतो. जवळच एक तेथील शेतकरी बसला होता. तो आमच्याकडे अत्यंत तुच्छतेने पाहत होता. त्याच्या हातात चहाचा कप होता, आम्ही काय करत आहोत, याबद्दल तो विचार करत होता. मी मनात विचार केला की, तू चेन्नईमध्ये ये, तुला दाखवतो मी कोण आहे.”
आर. माधवन पुढे म्हणाला, “मला खूप राग आला होता; पण तो प्रसंग माझ्या लक्षात राहिला. मी त्यावर विचार करत होतो. मला जाणीव झाली की, मी अक्षरशः इतरांच्या तालावर नाचत होतो. मी एक वक्ता आहे, मला बंदूक कशी हाताळायची हे माहीत आहे, रिमोट विमानं उडवता येतात, घोडेस्वारी करता येते. मी इतक्या गोष्टी करू शकतो; पण माझ्या चित्रपटांमध्ये यापैकी काहीच मी दाखवत नव्हतो. मी फक्त प्रेक्षकांना भुरळ घालण्याचाच प्रयत्न करत होतो, ज्यामुळे मी सुपरस्टार होईन, असं मला वाटत होतं; पण नंतर मला मी किती मोठी चूक करत होतो, याची जाणीव झाली.
“देश कुठल्या दिशेनं चालला…”
“मी जे पात्र साकारत होतो, तीदेखील तशीच होती. याच काळात माझ्या पत्नीनं मला विचारलं की, तुला काय झालं आहे, तू कामावर जातोस, तेव्हाही तुला घरी लवकर परतावं असं वाटत असतं. त्यानंतर माझ्या मनातील गुंता हळूहळू कमी झाला.”
अभिनयातून ब्रेक घेण्याविषयी आर. माधवन म्हणाला, “मी ब्रेक घेतला. देश कुठल्या दिशेनं चालला आहे, हे मला समजून घ्यायचं होतं. मी जाहिरातीतही काम करणं थांबवलं. दाढी वाढवली, चेन्नईसह भारतातील इतर ठिकाणी खूप प्रवास केला. मी रिक्षाचालकांशी बोललो. त्यांच्यासाठी नेमकं काय महत्त्वाचं आहे, त्यांना खरं तर कोणत्या गोष्टी त्रास देतात, त्यांचा खरा खर्च काय आहे, अशा अनेक गोष्टींबाबत बोललो. कदाचित या चार वर्षांत मिळालेली ही समज आणि अनुभवाचा आज मला फायदा होत आहे.”
अभिनेता असेही म्हणाला की, जेव्हा मी पुन्हा काम करण्याचा विचार सुरू केला, तेव्हा मी नवीन दिग्दर्शक शोधायला सुरू केले. कारण- ज्यांच्याबरोबर मी काम करत होतो, ते पुरोगामी पद्धतीनं विचार करत नव्हते.
दरम्यान, आर. माधवनची महत्त्वाची भूमिका असलेला ‘धुरंधर २’ मार्च २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

