R Madhavan loyalty secret with wife Sarita Birje : बॉलीवूड आणि साऊथचा लोकप्रिय चॉकलेट बॉय आर. माधवन (R Madhavan) आणि त्याची मराठमोळी पत्नी सरिता बिरजे यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा २७ वा वाढदिवस साजरा केला. गेल्या ३५ वर्षांपासून एकत्र असलेल्या या जोडीने सिनेसृष्टीत एक आदर्श निर्माण केला आहे. ग्लॅमरस अभिनेत्रींसोबत काम करूनही माधवन पत्नीशी नेहमीच एकनिष्ठ राहिला. पत्नीशी एकनिष्ठ राहण्याचं कारण स्वतः माधवननेच सांगितलं होतं.

“माझ्या मते, पत्नीशी एकनिष्ठ राहणं हा आमचा कौटुंबिक गुण आहे. माझे पूर्ण कुटुंब आयुष्यभर जमशेदजी टाटा यांच्याशी इतके एकनिष्ठ होते की, आमच्या घरात देवांच्या फोटोंबरोबर जमशेदजींचा फोटोही हार घालून ठेवलेला असायचा. त्यामुळे प्रामाणिकपणे सांगायचं झाल्यास, मला एकनिष्ठ न राहण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागतील,” असं माधवन म्हणाला.

“मी भीत्रा मद्रासी मध्यमवर्गीय माणूस आहे,” असंही माधवन हसत म्हणाला. “मला सुंदर मुलींबद्दल आकर्षण नक्कीच वाटतं, पण शेवटी त्यांच्याबद्दल विचार करण्यापेक्षा मी घरी जाऊन माझ्या पत्नीला जवळ घेणं पसंत करतो,” असं माधवनने ‘ई-टाइम्स’शी बोलताना सांगितलं.

मणी रत्नम यांनी माधवनला दिलेला मोलाचा सल्ला

माधवनने आपल्या अभिनय करिअरची सुरुवात २००० मध्ये दिग्दर्शक मणी रत्नम यांच्या ‘अलाईपायुते’ या तमिळ रोमँटिक चित्रपटातून केली. यानंतर त्याने मणी रत्नम यांच्या ‘कन्नातील मुत्तमीत्ताल’ (२००२), ‘आयुथा एळुथू’ (२००४) आणि ‘गुरू’ (२००७) या चित्रपटांमध्ये काम केलं. एका मुलाखतीत माधवनने सांगितलं होतं की मणी रत्नम त्याचे ‘लव्ह गुरू’ बनले होते आणि त्यांनी त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी एक मोलाचा सल्ला दिला होता.

Madhavan on why he never cheated on wife Sarita birje
आर माधवन व सरिता बिरजेच्या सुखी संसाराचं गुपित (फोटो- इन्स्टाग्राम)

“मणी रत्नम यांनी मला नात्यांची परीक्षा न घेण्याचा एक सल्ला दिला होता. ते म्हणालेले की, जेव्हा नात्यात सर्वकाही चांगलं चाललं असते, तेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यावर किती प्रेम करते हे पाहण्यासाठी वारंवार तिची परीक्षा घेऊ नका. नातं जसं आहे तसंच राहू द्या. कधीकधी ही परीक्षा घेतल्याने सगळं काही बिघडतं,” अशी आठवण माधवनने सांगितली.

लग्न जाहीर न करण्याचा मिळाला होता सल्ला

माधवनचं लग्न आधी झालं, नंतर तो स्टार बनला. त्यामुळे त्याच्या हितचिंतकांनी त्याला त्याचं लग्न झाल्याची गोष्ट जाहीर न करण्याचा सल्ला दिला होता, पण माधवनने सर्वात आधी हीच गोष्ट सर्वांना सांगितली. “मी माझ्या महिला चाहत्यांची सर्व पत्रे सरितासोबत मिळून उघडायचो. मी कोणत्याही आउटडोअर शूटिंगला तिला सोबत न्यायचो. मी तिच्याशी प्रामाणिक आहे हे तिला दाखवण्यासाठी हे करायचो नाही, तर मला स्वतःचीच परीक्षा घ्यायची नव्हती,” असं माधवनने सांगितलं.

दरम्यान, आर माधवन आणि सरिता यांची भेट कोल्हापूरमध्ये झाली होती. काही वर्षे डेट केल्यावर त्यांनी ६ जून १९९९ रोजी लग्न केलं. त्यांना वेदांत माधवन नावाचा एक मुलगा आहे.