R. Madhavan Love Story: अभिनेता आर. माधवन आणि सरिता बिर्जे यांची प्रेमकथा एखाद्या चित्रपटासारखीच आहे. १९९१ मध्ये कोल्हापूरमधील एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट क्लासमध्ये माधवन सरिताला शिकवत होता. तेव्हा ते केवळ शिक्षक-विद्यार्थिनी होते. सरिताने शिक्षण पूर्ण करून एअर होस्टेस झाल्यावर माधवनला आभार मानण्यासाठी डिनरला बोलावले आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी लग्न केले.
अभिनेता आर माधवन आणि त्याची पत्नी सरिता यांच्या लग्नाला आता २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडीची पहिली भेट १९९१ मध्ये कोल्हापूर येथील एका पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या क्लासमध्ये झाली होती. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत माधवनने त्यांच्या प्रेमाच्या आठवणींना उजाळा दिला होता. माधवन त्या वेळी सरिताचा शिक्षक होता, मात्र ती विद्यार्थिनी असताना त्यांच्यात कोणतेही प्रेमसंबंध नव्हते.
माधवन तेव्हा पब्लिक स्पीकिंग आणि संवाद कौशल्य शिकवायचा. “मी कोल्हापूरमध्ये होतो आणि सरिता माझी विद्यार्थिनी होती. ती तिच्या चुलत बहिणीला भेटण्यासाठी कोल्हापूरला आली होती, ती माझ्या क्लासमध्ये शिकत होती. नंतर तीही तिच्याबरोबर माझ्या क्लासला येऊ लागली आणि तिला माझी शिकवण्याची पद्धत आवडली.”
माधवन पुढे सांगितलं की, सरिता विद्यार्थिनी असेपर्यंत ते एकमेकांना डेट करत नव्हते. सरिताचं तिचे शिक्षण पूर्ण झालं आणि पुढे ती एअर होस्टेस झाली, तेव्हा तिने माधवनला डिनरसाठी बोलावलं. तिला माधवनचे आभार मानायचे होते. माधवन हसत म्हणाला, “आम्ही कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो आणि तेव्हापासून… ती आजही मला ट्रिट देतेय.”
आर. माधवन आणि सरिता यांच्या यशस्वी संसाराचे गुपित
रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये बोलताना आर. माधवनने तो अभिनेता असूनही त्यांचे लग्न इतकी वर्षे कसं टिकलं, यावर भाष्य केलं होतं. तो म्हणाला, “इतर कोणत्याही जोडप्याप्रमाणेच आमच्यातही तितकीच भांडणं होतात. पण आमच्या मनात एकमेकांबद्दल खूप आदर आहे. सरितासाठी मी फक्त एखादा नॅशनल स्टार किंवा अभिनेता नाहीये, जिची पत्नी असल्याबद्दल तिने स्वतःला खूप नशीबवान समजावं. ती तिच्या प्रेमात पडलेल्या व्यक्तीची जोडीदार आहे. मी तिचा खूप आदर करतो. त्यामुळे मी किती नशीबवान आहे याची जाणीव करून देण्याची एकही संधी सोडत नाही.
आर. माधवन आणि सरिता बिर्जे यांचे लग्न
आठ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर, आर. माधवन आणि सरिता बिर्जे यांनी १९९९ मध्ये लग्न केलं. २००५ मध्ये त्यांनी त्यांचा मुलगा वेदांतचं स्वागत केलं. वेदांत आता २१ वर्षांचा झाला आहे. माधवनच्या मुलाला चित्रपटसृष्टीत येण्याची इच्छा नाही. तो उत्तम जलतरणपटू आहे. आणि याच क्षेत्रात आपले करिअर करत आहे. २०१९ मध्ये त्याने ‘एशियन एज ग्रुप स्विमिंग चॅम्पियनशिप’मध्ये भारतासाठी रौप्य पदकही जिंकले होते.
