R. Madhavan on Son Vedant: आर. माधवन बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. काही दिवसांपूर्वीच तो ‘धुरंधर २’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक होताना दिसले. आता मात्र अभिनेत्याचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.

२०२४ मध्ये आर. माधवने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी त्याने दाक्षिण भारतीय संस्कारांमध्ये नम्रता मध्यवर्ती ठिकाणी असते, असे वक्तव्य केले होते. अभिनेता म्हणालेला, “छोट्या यशांमध्ये ते फार अडकून राहत नाही, ते प्रत्यक्षात जितके श्रीमंत दिसतात त्यापेक्षा खूप श्रीमंत असतात आणि जितके यशस्वी वाटतात त्यापेक्षा खूप अधिक यशस्वी असतात. दिखावा करणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग नाही.”

पुढे तो म्हणालेला, “मी जमशेदपूरमध्ये वाढलो आहे. टाटा लोकही असेच आहेत, ते तर दक्षिण भारतीयही नाहीत. माझ्या मते मध्यमवर्गीय विचारसरणी ही जगण्यासाठी सर्वात उत्तम असते. तुम्हाला जीवनाच्या अस्थिरतेची जाणीव असते आणि आयुष्य तुम्हाला नम्र ठेवतं. तुम्ही आयुष्यात येणाऱ्या बदलांना स्वीकारण्यासाठी तयार असता. मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे.”

बालपण कसं होत, यावर अभिनेता म्हणालेला, “माझं बालपण उत्तम होतं. काही गोष्टींचा त्रासही झाला. माझ्या वडिलांनी मला फार सोयी-सुविधा दिल्या नाहीत. त्यांनी योग्य ठिकाणीच पैसे खर्च केले. मी अभ्यासात फार हुशार नव्हतो. जे खूप अभ्यास करत, त्यांच्याबरोबर माझी कायम तुलना व्हायची. मी खूप खोड्या काढायचो. झाडांवर चढायचो, भटक्या कुत्र्यांशी मैत्री करायचो, त्यामुळे इतर पालकांना वाटत असे मी चांगला मुलगा नाही. आपल्याला सतत कोणीतरी जज करत असेल तर ते त्रासदायक असतं. ताण-तणाव तर कायमच असतो, ते स्वीकारून तुम्हाला आयुष्य जगता आलं पाहिजे.”

“माझ्या मुलावर बनवले जाणारे सगळे मीम्स…”

मुलगा वेदांतबद्दल तो म्हणालेला, “माझ्या मुलावर बनवले जाणारे सगळे मीम्स आम्हाला माहीत आहेत. सरिता आणि मला ते अजिबात आवडत नाहीत. आम्हाला त्याबद्दल खंत वाटते, कारण एका मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करताना लोकांना कधी कधी हे जाणवत नाही की ते इतरांना किती दुखावतात. वेदांतची इंडस्ट्रीतील इतर मुलांशी तुलना केली जाते, हे आम्हा दोघांनाही आवडत नाही. आम्ही या गोष्टींना पाठिंबाही देत नाही आणि मान्यताही देत नाही. वेदांतने जे साध्य केलं आहे, त्याची किंमत मी कमी करणार नाही. सेलिब्रिटीचा मुलगा असणं सोपं नसतं. तो त्याच्या मित्रांपेक्षा जास्त प्रसिद्धी झोतात असतो.”

तो पुढे म्हणाला, “त्याला जी प्रसिद्धी मिळते, त्यासाठी तो पात्र आहे असं त्याने समजणे मूर्खपणाचे आहे. सुदैवाने, माझा मुलगा इतका समजूतदार आहे की त्याला हे सगळं कळतं. सरिता आणि मी त्याला सतत याबद्दल सांगत असतो.”

आजच्या Gen Z पिढीतील मुलाचे पालक असल्याबद्दल अभिनेता म्हणालेला, “त्यांना आमच्यापेक्षा जास्त शहाणपण आहे. त्यांना कोणत्याही गोष्टीची घाई नाही. ते किती साधेपणाने जगतात हे पाहून मला आश्चर्य वाटतं. त्यांना गाडी किंवा घर खरेदी करायचे नाही. यावरूनच त्यांना किती शांतपणे आयुष्य जगायचे आहे हे समजते. आपल्याला लहानपणी जितके शहाणपण होते, त्यापेक्षा माझ्या मुलाला आलेले शहाणपण खूप वेगळे आहे.” आर माधवनचा मुलगा वेदांत हा जलतरणपटू आहे.

दरम्यान, आता धुरंधर २ नंतर अभिनेता कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.