R Madhavan Shares IAS Pratap Murugan Story: आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता आर. माधवन सोशल मीडियावर कायम समाजातील खऱ्या नायकांच्या प्रेरणादायी गोष्टी शेअर करत असतो. नुकतीच त्याने तमिळनाडूतील आयएएस अधिकारी प्रताप मुरुगन यांची एक थक्क करणारी आणि अत्यंत प्रेरणादायी गोष्ट सर्वांबरोबर शेअर केली आहे. तिरुवल्लूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना मुरुगन यांनी १,२०० हून अधिक पडक्या व दुर्लक्षित बोअरवेल्सचा वापर करून ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची अनोखी प्रणाली उभारली. या उपक्रमामुळे पावसाचे पाणी जमिनीत जिरून भूगर्भातील पाण्याची पातळी ५ ते १० फुटांनी वाढली, विहिरींना पुन्हा पाणी आले आणि अनेक स्थानिक शेतकऱ्यांना दुष्काळातून मोठा दिलासा मिळाला.
IAS अधिकारी प्रताप मुरुगन यांचा जन्म विरुधुनगर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी असल्याने पाणी साठवण्याचे आणि जपून वापरण्याचे महत्त्व त्यांना लहानपणापासूनच माहीत होते. ‘द बेटर इंडिया’च्या वृत्तानुसार, त्यांच्या घरात प्रत्येक जण पाणी अतिशय मोजून-मापून वापरत असे. लहानपणापासून पाणी टंचाई पाहत आलेल्या प्रताप यांनी समाजाची सेवा करण्याचं स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं. ते सायकलवरून प्रवास करत शाळेत जायचे, पुढे जाऊन ते अथक परिश्रमानंतर आयएएस झाले.
कोरड्या पडलेल्या बोअरवेल्स पाहून सुचली भन्नाट कल्पना
तमिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना, प्रताप मुरुगन यांना लक्षात आलं की अनेक गावांमध्ये बोअरवेल्स कोरड्या पडत आहेत. शेतकरी पाण्यासाठी अधिक खोल खोदकाम करत होते, पण त्याचा काहीच फायदा होत नव्हता. दुसरीकडे, प्रत्येक पावसाळ्यात हजारो लिटर पावसाचे पाणी जमिनीत जिरण्याऐवजी नाल्यांमधून आणि ओढ्यांमधून वाहून जात होते. तिथूनच मुरुगन यांना एक भन्नाट कल्पना सुचली.
पावसाचं पाणी बोअरवेल्समध्ये वळवलं
प्रताप मुरुगन यांना जाणवलं की, संपूर्ण तिरुवल्लूर जिल्ह्यात हजारो बोअरवेल्स कोरड्या पडल्यानंतर एकतर त्या बंद करण्यात आल्या होत्या किंवा तशाच दुर्लक्षित पडून होत्या. या पडक्या बोअरवेल्सचा वापर करून पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडण्याचा प्लॅन प्रताप यांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने १,२०० हून अधिक पडक्या बोअरवेल्सना ‘ग्राऊंडवॉटर रिचार्ज’ यंत्रणेशी जोडलं आणि त्यांचं रेनवॉटर हार्वेस्टिंग युनिट्समध्ये रूपांतर केलं.
पावसाचं पाणी नाल्यांतून वाहून जाऊ न देता, ते रिकाम्या पडलेल्या बोअरवेल्समध्ये वळवण्यात आलं. यामुळे पाणी जमिनीच्या आत खोलवर जाऊन भूगर्भातील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. हा उपक्रम इतका साधा होता की त्यासाठी कोणत्याही मोठ्या, महागड्या मशिनरी किंवा धरण प्रकल्पांवर अवलंबून राहावं लागलं नाही. प्रशासनाने स्थानिक लोकांच्या मदतीने पायाभूत सुविधांचा वापर करत यशस्वीपणे हा उपक्रम राबवला.
आर. माधवनचा आगामी चित्रपट
आर. माधवन अलिकडेच आदित्य धरच्या ‘धुरंधर २’ या ब्लॉकबस्टर ॲक्शन चित्रपटात झळकला. आता लवकरच तो ‘G.D.N.’ या बायोपिकमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि उद्योगपती गोपालस्वामी दोराईस्वामी नायडू यांच्या आयुष्यावर आधारित आहे. कृष्णकुमार रामकुमार दिग्दर्शित हा बहुप्रतिक्षित चित्रपट ७ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
