अभिनेता आर. माधवन आणि त्यांची पत्नी सरिता बिर्जे यांचा मुलगा वेदांत २१ वर्षांचा आहे. वेदांत जलतरणपटू आहे. स्विमिंगमध्येच करिअर करायचं हा निर्णय त्याने लहान असतानाच केला होता. करोनाच्या साथीत भारतातील स्विमिंग पूल बंद झाल्यामुळे त्याचा सराव थांबू नये, म्हणून माधवनचे कुटुंब दुबईला स्थायिक झाले. एका जुन्या मुलाखतीत, वेदांतने नवीन देशात जुळवून घेताना आलेले अनुभव आणि त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आई-वडिलांनी दिलेली खंबीर साथ याबद्दल सांगितलं होतं.

“माझे आई-वडील मला खूप पाठिंबा देतात आणि या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो. खूप कमी मुलांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडून असा पाठिंबा मिळतो. मला तो पाठिंबा आणि आनंद मिळाला, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान मानतो,” असं रुहान मथ्रेजाशी बोलताना वेदांत म्हणाला.

आई-वडिलांच्या पाठिंब्याविना हा प्रवास सोपा नसता- वेदांत माधवन

तो पुढे म्हणाला, “जर माझे आई-वडील नसते, तर मला नाही वाटत की मी आज या टप्प्यावर किंवा याच्या जवळपास तरी पोहोचू शकलो असतो. म्हणूनच मी मनापासून त्यांचे आभार मानतो. पोहत असताना एक संपूर्ण टीम तुमची काळजी घेत असते आणि तुमचे आई-वडील सुद्धा त्याच टीमचा एक महत्त्वाचा भाग असतात. जर त्यांचा पाठिंबा नसेल, तर हा प्रवास इतका सोपा आणि चांगला होऊच शकत नाही,” असं वेदांत माधवनने सांगितलं.

कसा असतो वेदांत माधवनचा दिनक्रम?

जलतरणपटू असल्याने वेदांतचा दिनक्रम खूप कडक असतो. “माझा दिवस पहाटे ४:३० वाजता सुरू होतो. ४:४५ पर्यंत मी पूलवर पोहोचतो आणि ५ ते ७ असे दोन तास पोहण्याचा सराव करतो. त्यानंतर स्ट्रेचिंग करून घरी परत येतो. शाळा असेल तर शाळेत जातो. शाळेतून आल्यावर थोडं खातो, आराम करतो आणि पुन्हा पोहायला जातो. रात्री ७:३० ते ९:३० या वेळेत मी पुन्हा सराव करतो. जर जिम असेल, तर शाळा आणि संध्याकाळचा सराव यांच्या मधल्या वेळेत मी जिम करतो. यानंतर रात्रीचं जेवण पटापट उरकून मी झोपायला जातो, जेणेकरून सकाळी लवकर उठू शकेन,” असं वेदांत माधवन म्हणाला.

“दुबईला जाणं माझ्यासाठी धक्का होता” – वेदांत माधवन

दुबईला स्थायिक होण्याच्या निर्णयाबद्दल वेदांतने भावना व्यक्त केल्या. वैयक्तिकरित्या त्याच्यासाठी हा बदल खूप सोपा होता, पण एका गोष्टीचा मात्र त्याला त्रास झाला. “तिथे स्थायिक होण्याचा प्रवास खूप सोपा होता. आम्ही आमचं सगळे सामान आणि हव्या त्या गोष्टी व्यवस्थित आणू शकलो. सगळं खूप व्यवस्थित झालं. पोहण्याच्या बाबतीतही मला कोणतीच अडचण आली नाही, कारण तिथे बहुतांश लोक भारतीयच होते. पण, सरावाचा ताळमेळ राखत तिथल्या शाळेशी आणि सोशल लाईफशी जुळवून घेणं थोडं जड गेलं. तो माझ्यासाठी एक धक्का होता. मी आयुष्यभर भारतात राहिलो आहे, त्यामुळे या नवीन वातावरणाशी जुळवून घ्यायला मला थोडा वेळ लागला,” असं वेदांत भारतातून दुबईत आल्यानंतरच्या जीवनाबद्दल म्हणाला.

माझ्यासाठी दुबईला येण्याचा निर्णय खूप चांगला होता – वेदांत माधवन

वेदांत पुढे म्हणाला, “या गोष्टी सोडल्या तर बाकी माझ्या दृष्टीने दुबईला येण्याचा निर्णय खूप चांगला होता, कारण तेव्हा करोनाची परिस्थिती गंभीर होती. इथे आल्यामुळेच मी डेन्मार्क मधील स्पर्धेत भाग घेऊ शकलो. भारतात माझे मित्र होते आणि वातावरण सवयीचं झालं होतं, पण मी ते सगळं सोडलं आणि मग माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून एका पूर्णपणे नवीन देशात आलो, जेणेकरून मला आवडणारी गोष्ट मी इथे करू शकेन.”

अभिनेता आर माधवन व मराठमोळी सरिता बिर्जे यांनी ८ वर्षांच्या डेटिंगनंतर १९९९ साली लग्न केलं होतं. लग्नानंतर ६ वर्षांनी २००५ मध्ये त्यांचा मुलगा वेदांतचा जन्म झाला. वेदांत त्यांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या करिअरसाठी सरिता व माधवन यांनी भारत सोडून दुबईला स्थायिक व्हायचा निर्णय घेतला. वेदांत माधवनने आतापर्यंत जलतरणपटू म्हणून अनेक मेडल्स जिंकले आहेत.