R Madhavan Son Vedaant on his Routine: आर. माधवन हा त्याच्या भूमिकांमुळे सातत्याने चर्चेत असतो. त्याने त्याच्या कारकि‍र्दीत सकारात्मक भूमिकांबरोबरच नकारात्मक भूमिकाही साकारल्या आहेत. नुकताच तो ‘धुरंधर २’मधील त्याच्या भूमिकेमुळे चर्चेत होता. चित्रपटसृष्टीतील कारकि‍र्दीबरोबरच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील सतत चर्चेत असतो. त्याचे कुटुंब कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.

आर. माधवनचा मुलगा वेदांत हा जलतरणपटू (Swimmer) आहे. तो सध्या त्याच्या शिक्षणासाठी दुबईत आहे. तसेच त्याचे पोहण्याचे ट्रेनिंगसुद्धा सुरू आहे. ऑलिंपिकमध्ये पदक मिळविणे हे त्याचे ध्येय आहे. गेल्या वर्षी दिलेल्या मुलाखतीत वेदांतने त्याच्या भविष्यातील स्वप्नांबद्दल वक्तव्य केले होते.

“मी जवळजवळ साडेचारच्या दरम्यान…”

रुहान मथरेजा वेदांतने गेल्या वर्षी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्याने त्याची दिनचर्या काय होती, याबद्दलही वक्तव्य केले होते. तो म्हणालेला, “मी जवळजवळ साडेचारच्या दरम्यान उठतो. पावणेपाचला मी पूलमध्ये जातो. ५ ते ७ च्या दरम्यान मी पोहतो. त्यानंतर थोडे स्ट्रेचिंग करतो आणि घरी येतो. जर मला शाळा असेल, तर मी शाळेत जातो. शाळेतून आल्यानंतर मी नाश्ता करतो. त्यानंतर जवळपास साडेसातच्या दरम्यान मी पोहण्यासाठी जातो. रात्री साडेनऊपर्यंत मी पोहतो. घरी आल्यानंतर जेवतो व झोपतो आणि हे चक्र असेच सुरू असते.”

शिस्तप्रिय दिनचर्येबद्दल वेदांत म्हणालेला, “हे सर्व धावपळीचे असते; पण त्याग महत्त्वाचा आहे. तुम्हाला काही गोष्टी सोडाव्या लागतात. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर विश्वास ठेवावा लागतो. तुमचे जे मानसिक द्वंद असते, ते महत्त्वाचे असते. माझ्या कोचनी मला सांगितले होते की, कायम वर्तमानात राहा. परिणांमाची काळजी करू नका. आताच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा. आताच्या क्षणात जगा.”

भारत सोडून दुबईत राहण्याबद्दल वेदांत म्हणालेला, “आम्ही दुबईला स्थलांतर केलं, ते सुरळीतपणे झालं. पोहण्याबाबत काहीच अडचण आली नाही. कारण- मी जिथे सराव करतो, तिथे खूप भारतीय आहेत. पण, पोहणं, शाळा आणि सामाजिक आयुष्य यामध्ये समतोल साधण्याबाबत दोन्हीकडे वेगळेपण आहे, थोडंसं धक्कादायक आहे. मी माझ्या भारतातील आरामदायी आयुष्याच्या, माझ्या मित्रांचा त्याग केला. स्वत:वर काम करण्यासाठी मी कम्फर्ट झोनच्या झोनमधून बाहेर आलो. माझं मुख्य ध्येय हे ऑलम्पिक मेडल आहे. दुर्दैवानं मी या वर्षी पात्र ठरू शकलो नाही. त्यामुळे मला स्वत:वर अजून काम करावं लागेल.”

पालकांच्या पाठिंब्याबद्दल तो म्हणालेला, “माझे पालक मला खूप पाठिंबा देतात. मी त्याबाबत नशीबवान आहे, असं मला वाटतं. अनेक मुलांना असे पालक मिळत नाहीत, जे त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी पाठिंबा देतात. जर ते माझे पालक नसते, तर मी आता ज्या ठिकाणी आहे, तिथे मी असतो, असं मला वाटत नाही. मी त्याबद्दल कृतज्ञ आहे.”

याआधी जीक्यू (GQ)ला दिलेल्या मुलाखतीत आर. माधवनने मुलाच्या दिनचर्येबद्दल वक्तव्य केले होते. तो म्हणाला होता, “तो सकाळी ४ वाजता उठतो आणि रात्री ८ ला झोपतो. पालक म्हणून आम्हालाही त्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. तो शिस्तप्रिय आयुष्य जगतो. मी थोडा आळशी आहे, माझ्याकडेही त्याच्याप्रमाणे शिस्तबद्धता हवी होती.”

याबरोबरच त्याने वेदांतबरोबरच्या बॉण्डिंबद्दलही वक्तव्य केले होते. दरम्यान, आता आर. माधवन ‘धुरंधर २’नंतर कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.