R Madhavan Luxury Titan watch : अभिनेता आर. माधवनला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सिनेविश्वातील त्याच्या योगदानाची दखल घेत राष्ट्रपतींच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार त्याला प्रदान करण्यात आला. आर. माधवनने या खास क्षणी स्टायलिश पोशाख स्टाईल केला होता. फॉर्मल लूकसह त्याने खास घड्याळ घातले होते. या सन्मानाइतकीच आर. माधवनच्या हातातील महागड्या घड्याळाची चर्चा रंगली आहे. त्याच्या लक्झरी घड्याळाची किंमत ऐकून नेटकरी थक्क झाले आहेत. जगामध्ये केवळ १० लोकांकडे असणाऱ्या या घड्याळ्याने सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.

अभिनेता आर. माधवन, त्याची पत्नी सरिता माधवन आणि मुलगा वेदांत माधवन यांच्यासह या समारंभाला उपस्थित राहिला. यावेळी त्याने साधा, पण अत्यंत आकर्षक फॉर्मल लूक केला होता. या खास क्षणासाठी माधवनने नेव्ही ब्ल्यू रंगाचा ड्रेस खास ट्राऊझर्ससह परिधान केला होता. त्याने चष्मा आणि तपकिरी लेदर-स्ट्रॅप असलेल्या घड्याळासह लूक पूर्ण केला. मात्र, त्याच्या वेशभूषेपेक्षाही त्याच्या हातातील लक्झरी घड्याळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या दुर्मीळ घड्याळाची किंमत तब्बल ४० लाख रुपये असल्याचे समोर आल्याने सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

घड्याळ्याचे केसिंग रोझ ग्लोडचे

अभिनेता आर. माधवनचे हे घड्याळ टायटनच्या लक्झरी नेब्युला सीरिजमधील आहे. या घड्याळाचे ‘नेब्युला जलसा फ्लाईंग टूरबिलॉन’ (Titan Nebula Jalsa Flying Tourbillon) हे खास मॉडेल आहे. याचे बाहेरचे आवरण (केसिंग) हे १८ कॅरेट रोझ गोल्डपासून बनवण्यात आले आहे. पारंपरिक भारतीय कलेचा आणि आधुनिक घड्याळनिर्मितीचा सुंदर संगम यामध्ये पाहायला मिळतो.

काय आहेत आर.माधवनच्या घड्याळ्याची वैशिष्ट्ये?

या घड्याळाचे सर्वांत खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचे डायल हाताने रंगवण्यात आला आहे. जयपूरमधील प्रसिद्ध ‘हवा महाल’ची प्रेरणा घेऊन हे डिझाईन साकारण्यात आले आहे. तसेच राजस्थानच्या पारंपरिक चित्रकलेची झलकही या घड्याळात पाहायला मिळते. त्यामुळे हे घड्याळ केवळ वेळ दाखवणारे साधन नसून एक सुंदर कलाकृती म्हणूनही ओळखले जाते.

आर माधवनचे घड्याळ जगातील फक्त १० जणांकडे

‘टायटन नेब्युला जलसा फ्लाईंग टर्बिलॉन’ हे भारतीय ब्रँडने तयार केलेल्या सर्वांत दुर्मिळ घड्याळांपैकी एक आहे. या घड्याळात ‘फ्लाईंग टर्बिलॉन’ यंत्रणा आहे. घड्याळ तयार करणाऱ्यांसाठी ही एक मोठी कामगिरी मानली जाते. फ्री प्रेस जर्नलच्या रिपोर्टनुसार, जगभरात ही केवळ १० घड्याळे तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे हे एक लक्झरी प्रकारातील घड्याळ असून, ती अत्यंत दुर्मीळ वस्तू ठरली आहे. अभिनेता आर. माधवनने पद्म पुरस्कार स्वीकारताना खास क्षणी हे घड्याळ परिधान केले होते.