R Madhavan was asked to hide his marital status: आर. माधवनने फक्त दाक्षिणात्य सिनेमांत काम केले नाही तर बॉलीवूडमध्येही त्याने वेगळी ओळख निर्माण केली. विशेष म्हणजे, सिनेसृष्टीत पदार्पण करण्याआधी त्याने टेलिव्हिजनवर काम केले होते. तसेच, त्याचे लग्नही झाले होते, तो तमिळही होता, या सगळ्या कारणांमुळे त्याला सिनेसृष्टीत ओळख मिळणार नाही, असे म्हणले जात होते.

आर.माधवनने नुकतीच इंडियन स्कूल ऑफ बिझनेस येथे झालेल्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तो म्हणाला की इंडस्ट्रीतील ठरावीक नियमांनुसारच निर्णय घ्यावेत, असे मला कधीच वाटले नाही.

सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी आर. माधवनने केले आहे टेलिव्हिजनवर काम

चित्रपटांत काम करण्यापूर्वी आर. माधवनने ‘घर जमाई’, ‘सी हॉक्स’ यांसारख्या मालिकांत काम केले होते. तो टीव्हीवर जवळजवळ १८०० भागांमध्ये दिसला होता. तो मोठ्या प्रमाणात टीव्हीवर दिसल्यामुळे सिनेसृष्टीत त्याचा तोटा होईल असे त्याला सांगितले जात होते. तो म्हणाला, “मी फिल्म इंडस्ट्रीत आलो, तेव्हा टीव्हीवर जवळपास १,८०० भागात काम केले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील प्रत्येकजण मला म्हणायचा की तू टीव्हीवर मोठ्या प्रमाणात लोकांना दिसला आहेस. तुला सिनेमांत यश मिळणार नाही. खरं तर मी मुंबईत अभिनेता होण्यासाठी आलोच नव्हतो. मी कधी अभिनयाचं प्रशिक्षणही घेतलं नाही. हे सगळं आपोआप घडत गेलं आणि मालिकांच्या १,८०० भागांत काम केले. पण, त्यानंतर मणि रत्नम यांच्याकडून मला फोन आला आणि अलैपायुथे(Alaipayuthey) या तमिळ सिनेमात काम केले. या सिनेमाला प्रचंड यश मिळाले.”

पुढे अभिनेता म्हणाला, “मी जेव्हा तमिळ सिनेमात काम केलं, तेव्हा मला सांगण्यात आलं की तुला तमिळ इंडस्ट्रीमध्ये स्वीकारलं जाणार नाही. कारण तुझा रंग गोरा आहे, तू उत्तर भारतीयांसारखा दिसतोस. तुला रोमँटिक हिरो म्हणूनही स्वीकारलं जाणार नाही, कारण तुझं लग्न झालं आहे. प्रेक्षकांना लग्न झालेले रोमँटिक हिरो आवडत नाहीत.”

तो असेही म्हणाला, “जेव्हा सिनेमाचे प्रमोशन सुरू होते. त्यावेळी पब्लिसिटी टीमने मला सांगितले की जेव्हा तू पत्रकार परिषदेत जाशील, तेव्हा तुझ्या लग्नाबद्दल बोलू नकोस. आम्हाला माहीत आहे की तू सिनेमा प्रदर्शित होण्याच्या सहा महिने आधी लग्न केले आहेस. मीडियासमोर तुझ्या लग्नाबद्दल बोलून नकोस, त्यामुळे सिनेमा फ्लॉप होईल. मला ते आवडलं नाही. मी मणि रत्नम सरांकडे गेलो आणि त्यांना म्हणालो की ते मला खोटं मला बोलायला सांगत आहेत. ते मला म्हणाले की तुला वाटतं ते तू कर. पत्रकार परिषदेत मला लग्नाबद्दलचाच पहिला प्रश्न विचारला. त्यावेळी मी त्यांना खोटं बोललो नाही. मी त्यांना लग्न झाल्याचे सांगितले. मी इथे रोमँटिक हिरो बनण्यासाठी आलो नाही. माझे लग्न झाले नाही, असे मी म्हणालो तर तो माझ्या पत्नीचा अपमान असेल. ती मुलाखत व्हायरल झाली. लोकांनी मला स्वीकारले.”

आर. माधवन असेही म्हणाला, “जेव्हा मी तमिळ सिनेमांत काम केले, तिथे ओळख निर्माण केली. त्यावेळी मला लोक म्हणू लागले की तू आता तमिळ हिरो आहेस. आता हिंदी सिनेमात तू काम करू शकणार नाहीस. त्यानंतर मी रहना है तेरे दिल में, ३ इडियट्स, गुरू अशा सिनेमांत काम केले. त्यामुळे लोकांनी असे जे समज निर्माण करून ठेवले होते, ते सगळे चुकीचे ठरले.”

दरम्यान, २००१ मध्ये रेहना है तेरे दिल में या चित्रपटातून आर. माधवनने हिंदी सिनेमात पदार्पण केले. त्यानंतर रंग दे बसंती, गुरु आणि ३ इडियट्स यांसारख्या चित्रपटांमधून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केले.