Raaj kumar jaani dialogue meaning : बॉलीवूडमधील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आणि खास शैली असते. काही कलाकार फॅशनमुळे, तर काही दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकतात. मात्र, हिंदी चित्रपटसृष्टीत असा एक अभिनेता होऊन गेला, ज्याची ओळख एका शब्दामुळे निर्माण झाली होती. तो शब्द म्हणजे “जानी…” आणि ते अभिनेते म्हणजे राज कुमार. प्रत्येक डायलॉगची सुरुवात राज कुमार हे जानी… या शब्दाने करत असत. मात्र, हा केवळ शब्द नाही, तर ते त्यांच्या पाळीव श्वानाचे नाव होते.
ते राज कुमार यांच्या श्वानाचे नाव
अभिनय करताना आणि खऱ्या आयुष्यातसुद्धा समोरच्या व्यक्तीला प्रेमाने बोलावताना राज कुमार हे ‘जानी’ या शब्दाचा वापर करत असत. त्यांचा हा शब्द प्रेक्षकांनी इतका डोक्यावर घेतला की, तो शब्दच त्यांची ओळख बनला. दमदार डायलॉगची सुरुवात ही ‘जानी’ शब्दाने होऊ लागली. मात्र, हा केवळ एक लोकप्रिय शब्द नाही, तर ते राज कुमार यांच्या श्वानाचे नाव होते, असा खुलासा चित्रपट निर्माते व दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी केला आहे.
राज कुमार यांचा स्वभाव लहरी
दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी ‘इंडिया टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी राज कुमार यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा राज कुमार यांच्यासह काम करणे आव्हानात्मक होते. राज कुमार यांचा स्वभाव लहरी होता. त्यामुळे त्यांचा मूड बघून काम करावे लागत असल्याचे के. सी. बोकाडिया यांनी सांगितले.
‘पुलिस और मुजरिम’ चित्रपटामध्ये राज कुमार यांनी प्रमुख भूमिका साकारली होती; तर के. सी. बोकाडिया यांनी त्याचे दिग्दर्शन केले होते. यावेळी एकत्र काम करताना आलेले अनुभव बोकाडिया यांनी शेअर केले.
जानी शब्दाचा उल्लेख कोणाचा अपमान करण्यासाठी नाही, तर…
राज कुमार यांच्या जानी या गाजलेल्या शब्दाबद्दलची माहिती के. सी. बोकाडिया यांनी दिली. “जानी हे खरं तर त्यांच्या पाळीव श्वानाचं नाव होतं. ते याच नावानं सर्वांना बोलवायचे; पण ते जानी शब्दाचा उल्लेख कोणाचा अपमान करण्यासाठी नाही, तर प्रेम व आपुलकी दाखवण्यासाठी करायचे. देवाची कृपाच आहे की, त्यांनी मला या नावानं कधी हाक मारली नाही. मला राज कुमार हे ‘बोकडियासाहेब’ म्हणूनच संबोधित करायचे”, अशी आठवण दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी सांगितली.
दिग्दर्शकाने ऑफरपेक्षा अधिक दिले मानधन
१९९२ साली प्रदर्शित झालेल्या ‘पुलिस और मुजरिम’ या चित्रपटात राज कुमार यांना एका रात्रीत चित्रपटात घेतल्याचे के. सी. बोकाडिया यांनी सांगितले. “चित्रपटाचे कथानक ऐकवून मी राज कुमार यांना किती पैसे पाहिजे विचारले. त्यावर त्यांनी मागच्या वेळी किती दिले होते, असे विचारले. त्यावर २१ लाख, असे मी सांगितले. तर राज म्हणाले की, मग यावेळी मला त्यापेक्षा जास्त पाहिजे. मी २३ लाख सांगितले, तर त्यांनी २४ लाखांची मागणी केली. त्यावर राज कुमार यांना मी २५ लाख रुपये देतो, असे म्हणत त्यांच्या ऑफरपेक्षा अधिक पैसे दिले. फक्त चित्रपटाचे शूटिंग उद्यापासून सुरू होणार असल्याचे राज कुमार यांना सांगितले,” असा किस्सा के. सी. बोकाडिया यांनी सांगितला.
एका चित्रपटातील कपडे दुसऱ्या चित्रपटात
दुसऱ्याच दिवशी चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यास राज कुमार यांनी स्पष्ट नकार दिला होता. मात्र, नंतर निर्माता-दिग्दर्शक के. सी. बोकाडिया यांनी त्यांची समजूत काढण्यात यश मिळवले. अखेर ‘हमराज’मधील ‘नीले गगन के तले’ गाण्यातील तोच पिवळा कोट परिधान करून, राज कुमार यांनी मुहूर्ताचा शॉट दिल्याची आठवण के. सी. बोकाडिया यांनी सांगितली.
