Huma Qureshi and Rachit Singh relationship : अभिनेत्री हुमा कुरेशी आणि अभिनेता रचित सिंह मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या वृत्तामुळे चर्चेत आहेत. हुमाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका खास पोस्टनंतर दोघे या वर्षाअखेरीस लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व अफवांवर खुद्द रचित सिंहने मौन सोडले असून लग्न करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एका मुलाखतीत बोलताना रचितने म्हटलं की, सतत येणाऱ्या फोनमुळे आता थेट आईचा नंबर देऊन टाकावा असा विचार मी करत आहे.
लग्नाच्या चर्चांवर रचित सिंह म्हणाला…
‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत रचित म्हणाला, “माहीत नाही कोण आणि कुठे माझं लग्न लावून देत आहे. मी विचार करतोय की आता थेट माझ्या आईचा नंबर देऊन टाकावा. प्रत्येक जण मला फोन करून याचबद्दल विचारत आहे. पण सध्या तरी माझं लग्न होणार नाहीये.”
रचितने हुमाबरोबरच्या नात्याबद्दल थेट बोलणं टाळलं. पण हुमा आणि रचित अनेकदा कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावतात. इतकंच नाही तर ते सोशल मीडियावर एकमेकांसाठी पोस्ट करतात. दोघांनी ‘बेबी डू डाय डू’ चित्रपटात एकत्र काम केलंय. या चित्रपटाच्या निमित्ताने हुमाने रचितचा प्रवास सांगणारी पोस्ट केली होती.
रचितबद्दल हुमा कुरेशीने केलेली पोस्ट
“मी जेव्हा रचितला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मला फक्त त्याची प्रतिभाच नाही, तर त्याचा संयम खूप भावला. बनारससारख्या छोट्या शहरातून आलेला हा मुलगा, दरवर्षी हजारो लोकांना मुंबईत घेऊन येणारे तेच स्वप्न डोळ्यात घेऊन इथे आला होता. पण फरक इतकाच होता की, जेव्हा त्याला एका रात्रीत यश मिळालं नाही, तेव्हा तो खचला नाही किंवा त्याने हार मानली नाही. तो इथेच थांबला, त्याने मेहनत केली, तो शिकला आणि स्वतःमध्ये सुधारणा करत गेला.”
हुमा पुढे म्हणाली, “गेल्या एका दशकाहून अधिक काळ त्याने इतर कलाकारांना त्यांच्या अभिनयाची खरी बाजू शोधण्यात मदत केली. त्याने अशा कलाकारांना मार्गदर्शन केलं आणि प्रशिक्षण दिलं जे पुढे जाऊन मोठे स्टार्स बनले. तो कॅमेऱ्याच्या मागे, वर्कशॉप्समध्ये राहून इतरांना स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करत होता आणि त्याची वेळ यायची शांतपणे वाट पाहत होता. मला त्याची हीच गोष्ट सर्वात जास्त आवडते. आपलीही वेळ येईल, यावरचा त्याचा विश्वास त्याने कधीच कमी होऊ दिला नाही.”
“कोणताही शॉर्टकट नाही, कोणताही मोठेपणा नाही. फक्त कष्ट, सातत्य आणि आपल्या कलेवर असलेला विश्वास. आणि आता अखेर त्याची वेळ आलीये, तो लाइमलाइटमध्ये आलंय, पण हे एका रात्रीत मिळालेलं यश नाही. तर, जेव्हा कोणी पाहत नव्हतं तेव्हा वर्षानुवर्षे घेतलेल्या मेहनतीचे हे फळ आहे. त्यामुळे रचित…तू कठीण टप्पा पार केला आहेस. आता… हा रंगमंच तुझा आहे ‘सिद्धू’,” असं म्हणत तिने पोस्टचा शेवट केला.
हुमा कुरेशीच्या पोस्टवर रचितची भावुक प्रतिक्रिया
रचितने लिहिलं, “माझं ‘हार्ड-लाँचिंग’ केल्याबद्दल थँक्यू, हुमी. हाहाहा. हे वाचल्यानंतर मला जाणवलं की, खरंच मला या क्षेत्रात आता बराच काळ झाला आहे. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद. ज्या दिवसांत माझा स्वतःवरचा विश्वास डळमळीत होतो, अशा दिवसांतही माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल थँक्यू.”
रचित पुढे म्हणाला, “हुमी, हीच गोष्ट तुला इतरांपेक्षा वेगळी बनवते. बऱ्याच लोकांच्या नजरेतून सुटणाऱ्या गोष्टी तू अचूक हेरतेस आणि त्या शब्दांत मांडण्याची तुझी पद्धत अप्रतिम आहे. मला नेहमीच योग्य शब्द शोधण्यासाठी धडपडावं लागतं, पण तुला मात्र नेमकं काय बोलायचंय हे नेहमीच माहीत असतं. सेटवर आणि सेटच्या बाहेरही तुझ्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. आणि हा एकत्र सुरू केलेला प्रवास माझ्यामध्ये अनेक सुंदर बदल घडवून आणणारा ठरला आहे, त्यासाठी थँक्यू, ‘बेबी करमरकर’.”
