चित्रपटाच्या सेटवर कलाकारांमध्ये चेष्टा-मस्करी होणं ही सामान्य बाब आहे. मात्र, प्रत्येकाला प्रत्येक विनोद आवडेलच असं नाही. अभिनेत्री राधिका आपटेबरोबरही शूटिंगदरम्यान असंच काहीसं घडलं होतं. तिच्या एका सहकलाकाराने तिच्याबरोबर अशी मस्करी केली, जी राधिकाला अजिबात आवडली नाही. त्यामुळे तिने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या कानशिलात लगावली होती.

राधिकाने मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य अशा विविध भाषेतील चित्रपट, सीरिजमध्ये काम केलं आहे. तिने मुख्य नायिका, साहाय्यक भूमिका अशा विविध व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. अभिनेत्रीने नेहमीच चौकटीबाहेरच्या आशयाला पसंती दिल्याचं तिच्या चित्रपटांची यादी पाहिल्यानंतर कळतं. मात्र राधिक फक्त तिच्या व्यावसायिक आयुष्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती अनेकदा तिची मतं, प्रतिक्रिया ठामपणे व्यक्त करत असते. एकदा अभिनेत्रीने तिच्या सहकलाकाराला त्याचं कृत्य न पटल्याने थेट कानशि‍लात लगावल्याचा किस्सा सांगितला होता.

…म्हणून राधिकाने सहकलाकाराला कानशिलात लगावली

एबीपीच्या वृत्तानुसार राधिका आपटेने एका मुलाखतीत तमिळ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेला हा किस्सा सांगितला होता. तिच्या म्हणण्यानुसार, शूटिंग सुरू असताना तिच्या एका सहकलाकाराने तिच्या पायाला गुदगुल्या करायला सुरुवात केली. राधिकासाठी ही मस्करी नव्हती. ती त्या अभिनेत्याला नीट ओळखतही नव्हती. अशा परिस्थितीत त्याची ही कृती तिला अजिबात आवडली नाही आणि तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला चक्क कानाखाली मारली. राधिका आपटे तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी आणि परखडपणे मत मांडण्यासाठी ओळखली जाते. चित्रपटांमध्येही तिने नेहमीच वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. हा किस्साही तिच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या स्वभावाची भाग आहे.

राधिका आपटेचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी पुणे, महाराष्ट्रात झाला. तिने जवळपास आठ वर्षे कथकचं प्रशिक्षण घेतलं आणि याच काळात ती थिएटरशी जोडली गेली. थिएटरमुळे तिला अभिनय समजून घेण्याबरोबरच विविध भूमिका साकारण्याची संधी मिळाली. राधिकाने २००५ मध्ये ‘वाह! लाइफ हो तो ऐसी!’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर तिने हिंदीबरोबर मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केलं. सुरुवातीच्या काळात तिला मोठ्या किंवा प्रमुख भूमिका फारशा मिळाल्या नाहीत, मात्र तिने वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली.

राधिका आपटेचा आज वाढदिवस असून व्यावसायिक आयुष्यात स्थिरावल्यानंतर तिने खासगी आयुष्याकडे लक्ष केंद्रित केलं. सध्या ती तिच्या मुलीच्या संगोपनात व्यग्र आहे.