राधिका आपटेने नुकतंच तिच्या एका चित्रपटातील इंटिमेट सीन लीक झाल्यानंतर आलेल्या अनुभवाबद्दल सांगितलं. या घटनेनंतर तिला खूप असुरक्षित वाटत होतं, असं तिने म्हटलं. या घटनेनंतर तब्बल चार दिवस ती घराबाहेरही पडू शकली नव्हती, असं तिने सांगितलं आहे.

सध्या ‘लस्ट स्टोरीज ३’ या सीरिजमध्ये दिसणाऱ्या राधिका आपटेने इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान कलाकारांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो, याबद्दल बोलताना या घटनेची आठवण सांगितली. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, तिने केलेला एक इंटिमेट सीन लीक झाल्यानंतर ती चार दिवस घराबाहेर पडू शकली नव्हती.

माझ्या वॉचमननेही ते पाहिलं होतं – राधिका

राधिका म्हणाली, “आम्ही इंटिमेट सीन साकारताना सहजता असण्याबद्दल बोलत होतो. पण मी केलेला एक सीन लीक झाल्यानंतर मी अक्षरशः चार दिवस घराबाहेर पडू शकले नाही. कारण ही गोष्ट खूप लवकर तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकते. तुमच्या घराची बेल वाजू शकते आणि तुम्हाला त्याचा राग आलेली एखादी व्यक्ती तुमच्या घराबाहेर उभी असू शकते. त्यामुळे हे इतकं सोपं नाही. परिस्थिती खूप गुंतागुंतीची असते.” ती पुढे म्हणाली, “माझ्या स्टायलिस्टने मला सांगितलं होतं की, तिचा ड्रायव्हर तो क्लिप पाहणं थांबवत नव्हता. तो तिला सतत विचारत होता, तू तिच्या घरी जाणार आहेस? माझ्या वॉचमननेही ती क्लिप पाहिली होती. अशा गोष्टी घडू लागल्या आणि त्याचा सामना करणं खूप कठीण झालं.”

मी खूप घाबरले होते, कारण त्यावेळी मी एकटी राहत होते – राधिका

आपल्या सुरक्षेबद्दल चिंता वाटू लागल्यानंतर राधिका आपटेने तिच्या टीममधील काही सदस्यांची मदत घेतली. तिला कोणाकडून धोका जाणवला तर त्यांनी आपलं संरक्षण करावं, याबाबत राधिकाने त्यांच्याशी स्पष्टपणे चर्चा केली. राधिका म्हणाली, “शेवटी मी माझ्या ड्रायव्हरला आणि स्पॉट दादाला फोन केला आणि त्यांना सांगितलं, एक क्लिप लीक झाली आहे. तुम्ही ती पाहिली आहे का? जर पाहिली नसेल, तर मी तुम्हाला ती पाठवते. ती पाहा. तुम्हाला त्यात काही अडचण नसेल, तर तुम्हाला माझं संरक्षण करावं लागेल. अन्यथा माझ्याबरोबर काम करू नका. हा तुमचा पगार, तुम्ही जाऊ शकता. पण त्या दोघांनीही मला सांगितलं, आम्ही तुमची काळजी घेऊ. त्यावेळी मी एका अपार्टमेंटमध्ये एकटी राहत असल्यामुळे खूप घाबरले होते. त्यामुळे अशा परिस्थितीत गोष्टी खूप गुंतागुंतीच्या होऊ शकतात,” असंही तिने सांगितलं.