Radhika Apte Net Worth Struggle Story: मराठमोळी अशी एक अभिनेत्री जिने बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेविश्वामध्ये आपल्या दमदार अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली. तिच्या प्रभावी आणि जिवंत अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. सिनेमा, नाटक व ओटीटी अशा सर्वच माध्यमांमध्ये दमदार ओळख निर्माण करणारी राधिका आपटे एकेकाळी फक्त आठ हजार रुपये कमावत होती. आता कोट्यवधींची मालकीण असलेल्या राधिकाचा हा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.
मूळच्या मराठी कुटुंबातील राधिका आपटेचा जन्म तमिळनाडूमध्ये झाला आहे. पण, पुढे तिने पुण्यामध्ये तिचे शिक्षण घेतले. फर्ग्युसन कॉलेजमधून तिने अर्थशास्त्र आणि गणितात पदवी घेतली; पण तिला सुरुवातीपासून कला व नृत्याची आवड होती. प्रख्यात कथ्थक नृत्यांगना रोहिणी भाटे यांच्याकडून राधिकाने कथ्थकचे प्रशिक्षण घेतले; पण याच काळात तिला रंगमंचही खुणावू लागला. राधिकाला अभिनयामध्ये आवड निर्माण झाली आणि ती नाटकांमध्ये काम करू लागली.
राधिका आपटे कमावत होती फक्त ८ हजार
नाटकांमध्ये काम करताना राधिकाचा अभिनयाचा पाया भक्कम झाला. नाटकांमधून ती एक अभिनेत्री म्हणून जास्त खुलू लागली. मात्र, सुरुवातीच्या काळात या कामातून मिळणारे पैसे फारच कमी होते. राधिकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या काळात ती महिन्याला केवळ आठ ते दहा हजार रुपये कमवत होती. पुढे तिने हिंदी सिनेविश्वात पाऊल ठेवले आणि आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
राधिका आपटेने ‘वाह लाइफ हो तो ऐसी’ या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. त्यामध्ये तिने शाहिद कपूरच्या बहिणीची भूमिका साकारली होती. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमामध्ये राधिकाची भूमिका अगदीच छोटी होती. त्यानंतरही तिचे स्ट्रगल सुरूच राहिले. तिला एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊससाठी काम करण्याची संधी मिळाली होती; पण तिचे वजन फक्त चार किलो जास्त असल्यामुळे तिला सिनेमातून काढून टाकण्यात आले होते. या प्रकारामुळे राधिकाला खूप मोठा धक्का बसला होता, अगदी ती डिप्रेशनमध्येसुद्धा गेली होती.
रजनीकांत यांच्याबरोबर केले स्क्रीन शेअर
पण, त्यानंतर भाषेच्या कोणत्याही मर्यादांची फिकीर न करता राधिका आपटेने सिनेविश्वामध्ये जबरदस्त भूमिका केल्या. तिने सुरुवातीला बंगाली, दाक्षिणात्य सिनेविश्वात काम केले. ‘लेजेंड’ (2014), ‘लायन’ (2015) यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या चित्रपटात तिने सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. त्याचबरोबर ‘बदलापुर’, ‘मांझी- द माउंटेन मॅन’, ‘हंटरर’, ‘अंधाधुन’ व ‘पॅडमॅन’ यांसारख्या बॉलीवूड सिनेमांतील भूमिकांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर ‘लय भारी’, ‘पोस्टकार्ड’ या मराठी सिनेमामध्येही राधिका आपटे झळकली होती.
राधिका आपटे आहे कोट्यवधींची मालकीण
सिनेविश्वामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवलेली राधिका आपटे ही कोट्यवधींची मालकीण आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार, राधिका ही जवळपास ६६ कोटी रुपयांच्या (अंदाजे १.६ अब्ज डॉलर्स) मालमत्तेची मालकीण आहे. ती एका सिनेमासाठी जवळपास चार कोटींचे मानधन घेते. राधिका आपटेकडे फोक्सवॅगन टिगुआन, ऑडी ए४ व बीएमडब्ल्यू एक्स२ यांसारख्या लक्झरी गाड्या आहेत. तसेच मुंबई व लंडनमध्ये राधिकाची आलिशान घरे आहेत.
