Radhika Apte was asked to do action in innerwear: आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे हिने पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीतील एक वाईट अनुभव सांगितला आहे. एका ॲक्शन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी तिच्याकडे अत्यंत अवाजवी आणि विचित्र मागण्या केल्या होत्या. “तू ब्रा न घालता फक्त शर्ट घालून त्याचे बटण उघडे ठेवून अॅक्शन सीन शकतेस का?” अशी मागणी तिच्याकडे करण्यात आली होती. याला विरोध दर्शवल्यानंतर तिला अंतर्वस्त्रांमध्ये सीन करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न झाला. इतकंच नाही तर कलाकारांच्या संरक्षणासाठी असणाऱ्या इंटीमसी कोऑर्डिनेटर्सनाही या दबावामुळे कामावरून काढून टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं राधिकाने उघड केलंय.

राधिका आपटेचा त्या मागणीबद्दल खुलासा

राधिका म्हणाली, “त्यांनी मला विचारलं, ‘तू ब्रा न घालता फक्त शर्ट घालून बटण उघडे ठेवशील का?’ यावर मी त्यांना थोडं फिजिक्स समजून घ्या, असं सांगितलं. मग ते म्हणाले तू फक्त अंतर्वस्त्रामध्ये हा सीन करशील का? कारण ॲक्शन सीन्स करताना काय होईल हे सर्वांनाच समजतं. तर हो, असा प्रकार खरंच घडला होता.”

चित्रपट साईन करतानाच निर्मात्यांनी सांगायला हवं- राधिका आपटे

ॲक्शन सीन्स करतानाही अभिनेत्रींकडून प्रेक्षकांना आकर्षित करण्याची अपेक्षा कशी केली जाते, यावर राधिकाने तिचं मत मांडलं. “माझे विचार थोडे वेगळे आहेत. जेव्हा मी एखादा चित्रपट साईन करत असते, तेव्हा त्या पात्राबद्दलचा तुमचा दृष्टिकोन मला स्पष्टपणे सांगा, असं माझं म्हणणं असतं. सीनच्या दोन दिवस आधी मला भलतंच काही सांगू नका. जर तुम्ही चित्रपटात एखाद्या पात्राला बहुतांश वेळ कपड्यांशिवाय दाखवण्याचा निर्णय घेतला असेल, तर मला नेमकं काय करायचं आहे हे समजल्यावरच मी ती भूमिका करायची की नाही हे ठरवेन. पण जर तुम्ही सीनच्या दोन दिवस आधी माझ्याशी वाटाघाटी करत असाल आणि तेच कपडे घालण्यासाठी माझ्यावर दबाव आणत असाल, तर ते खूप त्रासदायक आणि मानसिकदृष्ट्या थकवणारं असते. ती चर्चा दोन आठवडे चालूच होती. ते मला विचारायचे, ‘तू हे दाखवशील का? ते सगळं खूपच त्रासदायक आणि निराशाजनक होतं,” असं राधिका आपटे म्हणाली.

इंटीमसी कोऑर्डिनेटर्सना कामावरून काढून टाकतात?

चित्रपटाच्या सेटवर न्यूडिटी किंवा इंटिमेट सीन्ससाठी काही नियम पाळण्यासाठी इंटीमसी कोऑर्डिनेटर्स असतात. पण निर्मात्यांनी अशा मागण्या केल्यावर या कोऑर्डिनेटर्सची काय अवस्था होते, याबद्दल राधिकाने खुलासा केला. “तुम्हाला न्यूडिटी दाखवायची असेल तर ठीक आहे, पण मला सुरुवातीपासूनच स्पष्ट सांगा. ऐनवेळी असे सरप्राइज का द्यायचे? आता आपल्याकडे इंटीमसी कोऑर्डिनेटर्स आहेत ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांनाही निर्मातेच कामावर ठेवतात. जर त्यांनी कलाकारांची बाजू घेतली, तर त्यांना कामावरून काढून टाकताना मी पाहिलंय. हे सगळं सोपं नाही. त्यांच्यामुळे नक्कीच बदल झाला आहे, पण यामुळे आम्ही पूर्णपणे सुरक्षित असतो असं नाही. कारण एकतर त्यांना काढून टाकतात किंवा जे निर्माते म्हणतात ते करावं लागतं. त्यांनी विरोध केला तरी शेवटी काहीच घडत नाही आणि कलाकारावर दबाव येतच राहतो. तुम्हाला तुमच्या आवडीचा इंटीमसी कोऑर्डिनेटर मिळणं शक्य नसतं,” असं राधिका आपटेने सांगितलं.

१० पैकी एका सेटवर येतो असा अनुभव – राधिका आपटे

इंडस्ट्रीत सगळीकडेच घडत नाही, असंही राधिकाने स्पष्ट केलं. “सगळे लोक असे नसतात, १० पैकी फक्त एका सेटवर असा अनुभव येतो. बाकी ९ सेट्सवर मला पूर्ण आदराने आणि खूप चांगल्या प्रकारे वागवलं जातं. पण तरीही तो एक वाईट अनुभव येतोच आणि तुम्ही याबद्दल उघडपणे बोलू शकत नाही ही मुख्य समस्या आहे. मी अजूनही तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव सांगू शकत नाही. घरी गेल्यावर मला वाटतं मी कधी उघडपणे याबद्दल बोलू शकेन? आणि याचं उत्तर मला माहीत नाही,” असं राधिका आपटे म्हणाली.