Raghav Juyal girlfriend: डान्सर आणि अभिनेता राघव जुयाल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेमध्ये आला आहे. तो सध्या कोणाला डेट करतोय याची चाहत्यांना मोठी उत्सुकता आहे. त्याचे काही अभिनेत्री व डान्सरसह राघवचे नाव जोडले गेले होते. मात्र, आता त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे. राघव जुयाल याने इन्फ्लुएन्सर व अभिनेत्री निहारिका एनएमसह काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव करत ते एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला; तर काहींनी हा त्यांचा आगामी प्रोजेक्टचा भाग असू शकतो, असा अंदाज व्यक्त केला.
सोशल मीडियावर राघव जुयाल व निहारिका एनएम यांनी कोलॅब्रेशनमध्ये पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवरील या फोटोंमध्ये निहारिकाने लाल रंगाचा स्वेटशर्ट परिधान केला असून राघवने ग्रे रंगाचे जॅकेट घातले आहे. एका फोटोमध्ये राघव निहारिकाला मागून मिठी मारताना दिसत असून दोघेही हसताना आणि लाजताना दिसत आहेत. एकमेकांना जवळ घेऊन काढलेले हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी फोटोसह केवळ स्टार आणि रेड हार्ट इमोजी असे छोटेसे कॅप्शन दिले आहे, त्यामुळे ते एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. या फोटोंमुळे सोशल मीडियावर त्यांच्या नात्याबद्दल चर्चांना उधाण आले आहे.
राघव जुयाल व निहारिका एनएमचा फोटो व्हायरल
राघव जुयाल व निहारिका एनएमच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. अगदी काही सेलिब्रिटींनीही यावर कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त केले आहे. लोकप्रिय रॅपर-गायक रफ्तार याने ‘खूप मस्त माझ्या लाडक्या’ अशा आशयाची पोस्ट केली आहे, तर कंटेंट क्रिएटर आशीष चंचलानी याने नजर लागू नये अशा इमोजीने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. नेटकऱ्यांनी या पोस्टवर भरभरून प्रेम व्यक्त केले आहे.
राघव जुयालच्या रोमँटिक फोटोवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स
एका चाहत्याने कमेंट करत लिहिले, “अरे यार… मला अजूनही यावर विश्वास बसत नाहीये. माझे हृदय जोरात धडधडतंय हात थरथरत आहेत आणि आनंदाश्रूंनी मी हसत आहे. राघव जुयालला रोमँटिक अंदाजात पाहणे ही माझी खूप दिवसांची इच्छा होती.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, ” ही केवळ चित्रपटाच्या प्रमोशनची गोष्ट नसावी अशी आशा आहे. तुम्ही दोघे एकत्र खूप छान दिसत आहात.” तर आणखी एका चाहत्याने, “हे खरंच अनपेक्षित आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. एका नेटकऱ्यांने लिहिले, “मला राघवला प्रेमात पाहायचे होते आणि आता ते खरे होताना दिसत आहे. तुम्हा दोघांसाठी खूप आनंद झाला आहे. तुम्ही कायम एकमेकांसोबत आणि प्रेमात राहा.”
राघव जुयाल व निहारिकाचा ‘भाई तेरा स्टार है’ चित्रपट चर्चेत
राघव जुयाल आणि निहारिका एनएम हे लवकरच एका प्रोजेक्टमध्ये एकत्र दिसणार आहेत. विवेक बी. अग्रवाल दिग्दर्शित ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटात ते एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत, त्यामुळे हे त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन असण्याची दाट शक्यता आहे. ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटात संजय कपूर, निक्की वालिया, विवान भटेना आणि बरखा सिंग यांच्याही मुख्य भूमिका असणार आहेत. यापूर्वी राघव हा शहनाज गिलला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या; मात्र त्यांनी या नात्याला कधीही दुजोरा दिला नाही.
