२०१२ मध्ये आलेल्या ‘डान्स इंडिया डान्स’च्या तिसऱ्या सीझनमधून नावारुपाला आलेला डान्सर म्हणजे राघव जुयाल. आपल्या हटके डान्स स्टाइलने त्याने परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांनाही आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. या शोदरम्यान त्याची स्लो मोशन डान्स स्टाइल चांगलीच लोकप्रिय झाली. डान्सर असण्याबरोबरच राघव अभिनेता म्हणूनही या इंडस्ट्रीत आपलं नशीब आजमावत आहे.

अशातच आता त्याच्याबद्दलची एक बातमी समोर येत आहे, ती म्हणजे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राघवचा अपघात झाला आहे. रात्री उशिरा शूटिंग दरम्यान ही दुर्घटना घडली असून यात राघवच्या पायाला दुखापत झाली आहे. चिंताजनक बाब म्हणजे यापूर्वी राघवच्या पायाची शस्त्रक्रिया झाली होती, त्याच पायाला आता पुन्हा दुखापत झाली असल्याचे वृत्त आहे.

‘बॉलीवूड हंगामा’च्या वृत्तानुसार, स्टंट करत असताना राघवला दुखापत झाली. यामुळे त्याला वेदना होत होत्या; पण तरीही त्याने शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यानंतर त्याच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. वेदना कमी करण्यासाठी डॉक्टरांना औषधे लिहून दिले असल्याचं सूत्राने सांगितले आहे.

वृत्तानुसार, इंडस्ट्रीतील एका व्यक्तीने राघवबद्दल सांगितले की, “त्याच्यासाठी हे काही नवीन नाही. त्याने ‘किल’मध्ये आपले सर्वस्व पणाला लावले होते आणि स्वतःला एक अ‍ॅक्शन स्टार म्हणून प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे असे अपघात त्याच्यासाठी नवीन नाही. यातून तो बाहेर येईल. दरम्यान, ‘किंग’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला ही दुखापत झाली आहे.

शाहरुख खान आणि त्याची लेक सुहाना खान यांच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटामध्ये एक स्टंट करताना राघवच्या पायाला ही दुखापत झाली. पिंकव्हिलानुसार, ‘किंग’ चित्रपटात राघवची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. राघवसह अभिषेक बच्चन, अभय वर्मा, दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, अर्शद वारसी आणि अनिल कपूरसारखी मोठी नावंदेखील या चित्रपटाचा भाग आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपुर्वी शाहरुखचे डोळ्यांवर गॉगल आणि हातावर टॅटू असलेले काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचा हा लूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता. हा खास लूक त्याने ‘किंग’ चित्रपटातील भूमिकेसाठी केल्याचंही म्हटलं गेलं. दरम्यान, २०२६ मध्ये ‘किंग’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.