अभिनेता राघव जुयाल नुकताच त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये पार्टी संपल्यानंतर शहनाज गिलला चाहत्यांनी आणि पापाराझींनी घेरलं असताना राघव तिच्या संरक्षणासाठी पुढे आला आणि तिला तिथून घेऊन गेला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं. सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटानंतर राघव आणि शहनाज यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राघवने या व्हायरल व्हिडीओबद्दल भाष्य केलं. शहनाजच्या संरक्षणासाठी पुढे येणं, त्याच कर्तव्य होतं आणि हे खूप स्वाभाविक आहे, असं तो म्हणाला. त्याने यावेळी शहनाजच काय तिच्याजागी दुसरी कोणतीही महिला किंवा व्यक्ती असली असती तरी त्याने हेच केलं असतं आणि असेच संस्कार त्याला त्याच्या पालकांनी दिले आहेत असं सांगितलं आहे.

मी शेवटच्या श्वासापर्यंत रक्षण करेन – राघव जुयाल

पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला, “माझ्या आई-वडिलांनी मला एक जबाबदार व्यक्ती म्हणून घडवलं आहे. त्या ठिकाणी तू असतीस किंवा कोणतीही दुसरी महिला असती आणि काही पुरुषांनी तिला अशा प्रकारे घेरलं असतं, तर गरज पडली तर त्यांच्याशी दोन हात करण्याची शिकवण मला मिळाली आहे. मी तिथे फक्त उभा राहून तमाशा पाहू शकत नाही. माझे मित्र, कुटुंबीय आणि माझ्याबरोबर असलेल्या कोणत्याही महिलेचं, मित्रांचं मी शेवटच्या श्वासापर्यंत सरंक्षण करेन. ती शहनाज असो, तू असो किंवा इतर कोणतीही महिला, हा माझा स्वभाव आहे.”

पुढे पुरुषत्वाविषयी बोलताना तो म्हणाला, “जसं पवित्र स्त्रीशक्ती असते, तसंच पवित्र पुरुषत्वही असतं. या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल असणं गरजेचं आहे. नृत्य, माझी कला आणि माझा स्वभाव स्त्रीशक्तीचे पैलू दाखवतात, पण जेव्हा परिस्थिती तशी असते, तेव्हा महिलांचा सन्मान करणे, त्यांचं संरक्षण करणे, बहिणी आणि मित्रांच्या पाठीशी उभं राहणे, हे माझ्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार पुढे येतात.”

पुढे राघव जुयाल म्हणाला, “अशा परिस्थितीत मी माझ्या सार्वजनिक प्रतिमेचा कधीच विचार करत नाही. कोणत्याही महिलेला त्रास होत असेल, तर मी फक्त उभा राहून पाहू शकत नाही. ती कोण आहे, याने मला काही फरक पडत नाही. अशा वेळी परिस्थिती कशी हाताळायची, हे मला माहीत आहे आणि पुढे येण्याबाबत माझ्या मनात कोणताही संकोच नसतो. त्या क्षणी मी माझी स्टार इमेज किंवा लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, याचा विचार करत नाही.”

दरम्यान, शहनाज गिलनेही नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत राघव जुयालबरोबरच्या डेटिंगच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य करण्यास नकार देत राघव तिचा खूप चांगला मित्र असल्याचं सांगितलं. तसेच, चाहत्यांना त्याच्या आगामी ‘भाई तेरा स्टार है’ या चित्रपटाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.