Mahesh Bhatt son Rahul Bhatt Untold Story: महेश भट्ट यांना ४ अपत्ये आहेत. पहिली पत्नी किरणपासून पूजा व राहुल, तर दुसरी पत्नी सोनी राजदानपासून आलिया भट्ट व शाहीन. महेश भट्ट यांना मुलगा आहे हे फार लोकांना माहीत नाही, इतके त्यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. एकदा राहुल भट्टने स्वतःचा ‘अनौरस मूल’ असा उल्लेख करत वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या होत्या.

राहुल भट्टचा जन्म १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला झाला. तेव्हा महेश भट्ट आणि त्यांच्या पहिल्या पत्नी किरण यांचं लग्न शेवटच्या टप्प्यात होतं. आपल्या मुस्लीम आईचा वारसा पुढे चालवण्यासाठी महेश यांना त्याचं नाव ‘मोहम्मद भट्ट’ ठेवायचं होतं, पण आई व पत्नीने समजूत काढल्यावर त्यांनी धर्मनिरपेक्ष नाव ठेवलं. राहुलने मोठं झाल्यावर एस. हुसेन झैदी यांच्या ‘हेडली अँड आय’ या पुस्तकात स्वतःची ओळख अनौरस मूल अशी करून दिली. आई-वडील कायदेशीररित्या विवाहित होते, पण तरीही महेश भट्ट यांनी कधीच वडिलांच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या नाहीत, त्यामुळे आपण अनौरस मूल असल्यासारखं वाटतं, असं राहुलने म्हटलं होतं.

वडिलांनी कायम दुर्लक्ष केलं, राहुल भट्टचं मत

राहुलला वाटतं की लहानपणापासूनच त्याच्याकडे वडिलांनी दुर्लक्ष केलं. आई किरणबरोबर वडिलांनी केलेल्या गैरवर्तनासाठी राहुल त्यांच्या अनैतिक संबंधांना जबाबदार धरायचा. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर डेव्हिड हेडलीशी नाव जोडलं गेलं, तो राहुलच्या आयुष्यातील अत्यंत कठीण टप्पा होता. त्या काळातही तो वडिलांशी संपर्क साधायला संकोचत होता. “तुझ्या आणि माझ्या आयुष्यात एक गोष्ट सारखी आहे-वडिलांशिवायचं बालपण,” असं महेश यांनी राहुलला त्याच पुस्तकात म्हटलं होतं.

mahesh-bhatt-and-son-rahul-bhatt-relationship-controversy
राहुल भट्ट (फोटो – इन्स्टाग्राम)

वडिलांबद्दल काय म्हणाले होते महेश भट्ट?

महेश भट्ट यांचा जन्म चित्रपट निर्माते नानाभाई भट्ट आणि त्यांची गर्लफ्रेंड शिरीन मोहम्मद अली (एक शिया मुस्लीम महिला) यांच्या पोटी झाला. त्यांच्या आई-वडिलांचे लग्न झाले नव्हते. त्यामुळे लहानपणी महेश यांनी आपल्या वडिलांना घरात जास्त वेळ पाहिलंच नव्हतं. “माझे वडील आमच्याबरोबर राहत नव्हते. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा आपले शूजसुद्धा काढायचे नाहीत, कारण ते जास्त वेळ थांबणारच नसायचे,” असं त्यांनी एकदा ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं होतं. नानाभाईंचे त्यांच्या पत्नी हेमलताबरोबर दुसरं कुटुंब होतं. त्यांनी महेश आणि त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाचा खर्च केला आणि घरासाठी काही पैसेही दिले, तरीही आपल्या आईला लोकांसमोर पत्नीचा दर्जा न दिल्याबद्दल महेश यांच्या मनात वडिलांबद्दल राग होता.

rahul bhatt sister pooja bhatt
राहुल भट्ट व त्याची बहीण पूजा भट्ट (फोटो- इन्स्टाग्राम)

महेश भट्ट यांना बाबाची भूमिका काय असते हेच माहीत नव्हतं

२०१८ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना महेश भट्ट यांनी सांगितलं होतं की, मोठे होत असताना त्यांना बाप म्हणजे नक्की काय असतो हे कधी समजलंच नाही, कारण त्यांनी ते अनुभवलंच नव्हतं. “माझ्याकडे माझ्या वडिलांच्या अशा कोणत्याही आठवणी नाहीत आणि म्हणूनच बाबाची भूमिका काय असावी याची मला काहीच कल्पना नव्हती,” असं त्यांनी सांगितलं होतं. आणि कुठेतरी याच गोष्टीचा परिणाम त्यांच्या पहिल्या पत्नी किरणपासून झालेली मुलं पूजा व राहुल यांच्या संगोपनावर झाला.

राहुल ३ वर्षांचा असताना महेश भट्ट किरणपासून वेगळे झाले. हुसेन झैदी यांच्या पुस्तकात राहुलने स्वतः सांगितलं की त्याचा वडिलांशी फारसा संबंधच आला नाही. जसे नानाभाई महेश यांच्यासाठी होते, तोच अनुभव राहुलला वडिलांचा आला. महेश भट्ट आठवड्यातून एकदाच यायचे. नंतरच्या काळात महेश भट्ट यांच्या करिअरला वेग आला आणि त्यांचं येणं खूपच कमी झालं.

rahul bhatt with father mahesh bhatt
राहुल व पूजा वडील महेश भट्टबरोबर

महेश यांच्या आई-वडिलांचं कायदेशीर लग्न झालं नव्हतं, पण त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण राहुलच्या बाबतीत असं नव्हतं. त्याच्या जन्माच्या खूप आधीच त्याच्या आई-वडिलांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. राहुल महेश यांचे परवीन बाबीबरोबर असलेल्या संबंधांच्या गोष्टी ऐकतच मोठा झाला. त्यांचं दारूचं व्यसनही राहुलने पाहिलं होतं.

मी त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत होतो, त्यांनीही… – राहुल भट्ट

महेश भट्ट यांच्याप्रमाणेच राहुल भट्टही आपल्या आईलाच आपला आदर्श मानत मोठा झाला आणि वडिलांपासून दुरावत गेला. महेश किरण आणि त्यांच्या मुलांना आर्थिक मदत करायचे, पण ते कधीच त्यांच्याबरोबर नसायचे. त्यामुळे बाप-लेकामध्ये अंतर वाढलं आणि राहुल मोठा होता गेला, तसं ते अंतर वाढत गेलं. वडील कधीच सोबत नसतात, यावर राहुलचा विश्वास बसला. “एका मुलाने आपल्या वडिलांवर जसं प्रेम करायला हवं, तसे मी त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न करत होतो. कमीत कमी त्यांनीही तसा प्रयत्न करायला हवा होता,” असं राहुल म्हणाला होता.