Rahul Bhatt On Step Sister Alia Bhatt: बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांचे कुटुंब आणि त्यांच्यातील अंतर्गत नाती नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आता महेश भट्ट यांचा मुलगा राहुल भट्ट याने एका मुलाखतीत आपल्या सावत्र बहिणी आलिया भट्ट, शाहीन भट्ट आणि सावत्र आई सोनी राजदान यांच्याबरोबरच्या समीकरणावर उघडपणे भाष्य केलं आहे. आलियाकडे स्टारडम असलं तरी सख्खी बहीण पूजा भट्ट हीच सर्व भावंडांमध्ये सर्वाधिक प्रतिभावान आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची असल्याचे राहुलने स्पष्ट केले. याशिवाय, आलियाचा पती रणबीर कपूर याच्याशी असलेल्या संबंधांवरही राहुल भट्टने खुलासा केला आहे.
सिद्धार्थ कन्ननशी बोलताना राहुल भट्टला त्याचं सावत्र बहिणींशी नातं कसं आहे? असं विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला, “आमचे आदरयुक्त संबंध आहेत. मी त्यांचा आदर करतो, त्यांच्यावर प्रेम करतो. शाहीनने साखरपुडा केलाय, ती सेटल झाली आहे याचा मला आनंद आहे. तर आलियाचंही छान चाललंय. त्या माझ्या लहान बहिणी आहेत, त्या मला सनी बनी म्हणतात.”
सावत्र आई सोनी राजदानबद्दल राहुल म्हणाला की, त्या खूप चांगल्या आहेत. पण त्यांचं नातं फक्त फॉरमॅलिटी आहे. “ते सगळे मला फोन करतात, माझ्याशी बोलतात पण ही फक्त फॉरमॅलिटी आहे,” असं राहुलला वाटतं.
आलियाकडे स्टारडम आहे, ती वेगळी आहे -राहुल भट्ट
सावत्र बहिणींना फक्त सणासुदीलाच भेटत असल्याचं राहुल भट्टने स्पष्ट केलं. “आमच्या वडिलांचा वाढदिवस, नाताळ व दिवाळीत आम्ही भेटतो. मी त्यांच्या आणखी जवळ असतो तर बरं झालं असतं. शाहीन माझा जास्त आदर करते. आलियाकडे स्टारडम आहे, ती वेगळी आहे आणि त्या गोष्टीचा आदर केला पाहिजे. सध्याच्या काळात माझ्या कुटुंबात माझी सख्खी बहीण पूजा हिच्याशी असलेलं नातं माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे,” असं राहुल भट्ट म्हणाला.
आलियापेक्षा पूजा सरस, राहुल भट्टचं मत
राहुलने यापूर्वी बरेचदा पूजा व आलियाची तुलना केली आहे. पूजा आलियापेक्षा जास्त चांगली अभिनेत्री असल्याचं त्याला वाटतं. “पूजा आणि आलिया या दोन वेगवेगळ्या काळातल्या आहेत. आलियाचं काम चांगलंय, तिच्या अभिनयात विविधता दिसून येते. मात्र, पूजाचं व्यक्तिमत्त्व जास्त प्रभावी होतं. अगदी तिच्या कपड्यांच्या स्टाइलपासून ते सर्वच बाबतीत हे जाणवायचं. हे माझं वैयक्तिक मत आहे. जर तुलना करायची झाली, तर सर्व भावंडांमध्ये तीच सर्वात हुशार आणि प्रतिभावान होती,” असं मत राहुल भट्टने मांडलं.
राहुल भट्ट रणबीर कपूरला भेटला आहे का?
आलिया भट्टचा पती रणबीर कपूरला कधी भेटला आहेस का? असं विचारल्यावर राहुल म्हणाला, “मी रणबीरला ५-६ वेळ भेटलोय. मी त्याला सिकंदर खेरच्या पार्टीत भेटलो होतो, तेव्हा रणबीर खूप तरुण होता. तो कूल आहे. इतरांचा आदर करतो. अॅनिमल चित्रपटात शस्त्रे कशी हाताळायची हे त्याने मला विचारलं होतं.”
दरम्यान, महेश भट्ट यांनी १९७० साली लॉरेन ब्राइटशी लग्न केलं होतं. लॉरेनने नंतर किरण नाव स्वीकारलं. त्यांना पूजा भट्ट आणि राहुल भट्ट ही दोन अपत्ये झाली. मात्र, नंतर ते वेगळे झाले आणि महेश यांनी १९८६ मध्ये अभिनेत्री सोनी राजदानशी लग्न केलं. या जोडप्याला शाहीन भट्ट आणि आलिया भट्ट या दोन मुली झाल्या.
