महेश भट्ट यांना त्यांची पहिली पत्नी किरण भट्टपासून मुलगा आहे. राहुल भट्ट त्याचं नाव आहे. राहुल ३ वर्षांचा असताना महेश यांनी किरणला घटस्फोट दिला. राहुल मोठा असताना वडील त्याच्याबरोबर नव्हते. त्यामुळे त्याच्या मनात त्यांच्याबद्दल कायम राग होता. जसजसा तो मोठा होत गेला, त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं. पण आता राहुलने खुलासा केला की त्याचे वडील त्याला आर्थिक मदत करतात.

वडिलांबरोबरच्या नात्याला ‘तुटलेलं नातं’ म्हणत राहुल म्हणाला, “मला स्वतःचा बाप स्वतःच व्हावं लागलं. माझे वडील होते, पण ते सोबत नव्हते. त्यांनाच ठाऊक असलेल्या काही कारणांमुळे ते माझ्या बाबतीत थोडे उदासीन राहिले. मी माझ्या वडिलांवर प्रेम करतो, त्यांचा आदर करतो, पण मी माझ्या वडिलांसारखा नाही. आमचं नातं तुटलंय.”

माझ्या घराचा खर्च वडील भागवतात – राहुल भट्ट

महेश भट्ट यांनी पहिली पत्नी किरण भट्टला घटस्फोट दिला असला तरी ते आजही तिचा खर्च उचलतात, असं राहुल भट्टने सांगितलं. राहुल व त्याच्या आईची ते काळजी घेतात व आर्थिक मदत करतात, असा खुलासा त्याने केला. राहुल म्हणाला, “माझी आई दुःखी असायची. ती घरातच असायची. घरात खूप नकारात्मकता असायची. कोणालाच कशात रस नव्हता, आपापसात संवाद नव्हता. सर्व काही विखुरलेलं होतं. पण माझे वडील चांगले माणूस आहेत. मी त्यांचा आदर करतो. ते माझ्या आईची काळजी घेतात, या गोष्टीचाही मी आदर करतो. जेव्हा आम्हाला आर्थिक अडचण येते, तेव्हा ते मदतीला धावून येतात. त्या अर्थाने मी आलिशान आयुष्य जगू शकतो. मी घराचा कमावता पुरुष नाही, माझे वडीलच माझं घर चालवतात.”

महेश भट्ट राहुलबरोबरच्या नात्याबद्दल काय म्हणाले होते?

२०१८ मध्ये ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत महेश भट्ट यांनी मुलगा राहुलसोबतच्या नात्यावर भाष्य केलं होतं. “त्याच्या मनात एक जखम होती. तो तीन वर्षांचा असताना मी घर सोडलं होतं आणि दुसऱ्या स्त्रीसाठी मी कुटुंबाला वाऱ्यावर सोडलं, असं त्याला वाटलं. ही त्याची तक्रार मी फेटाळू शकत नव्हतो, कारण ते खरं होतं,” असं ते म्हणाले होते.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीशी मैत्री असल्याचा आरोप राहुलवर झाला होता, तेव्हा महेश भट्ट यांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला होता आणि यामुळे ते दोघे जवळ आले. “त्या संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंब एकत्र आले. राहुलला वाटायचं की मी त्यांच्याबरोबर नाही, पण मी त्यांना सोडलं नव्हतं. हळूहळू आमचं नातं सुधारलं. त्याचा माझ्यावर असलेला राग दूर करून मी त्याला घडवलं. आज तो एक फिटनेस ट्रेनर आहे. पण स्वतःसाठी त्याने कधीही माझ्या नावाचा किंवा ओळखीचा वापर केला नाही. तो पूर्णपणे स्वबळावर उभा राहिला आणि मला त्याचा अभिमान आहे,” असं महेश भट्ट म्हणाले होते.