अभिनेता रणवीर शौरी व पूजा भट्ट २००२ मध्ये लिव्ह इनमध्ये राहत होते. तेव्हा त्यांच्यात वाद झाला होता. वाद एवढा मोठा होता की प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं होतं. या वादात पूजाचा भाऊ राहुल भट्टने मध्यस्थी केली होती. इतकंच नाही तर त्याने रणवीर शौरीला मारहाण केली होती. त्यानंतर राहुलला अटकही झाली होती. आता त्या घटनेला दोन दशकांहून जास्त काळ लोटल्यानंतर राहुलने त्याबद्दल भाष्य केलं आहे. आपण गरजेपेक्षा जास्त रिअॅक्ट केलं आणि रणवीरला मारल्याचा पश्चात्ताप असल्याचं राहुलने म्हटलंय.

सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत राहुल भट्ट म्हणाला, “रणवीर शोरी आणि पूजा भट्ट यांच्यात भांडण झालं. भांडणानंतर बहुतेक रणवीरने तिला मारलं होतं. मग मी मध्यस्थी केली. पण मी जास्तच रिअॅक्ट झालो होतो. मी त्याच्या गाडीची काच फोडली आणि त्याची एक बरगडीही मोडली होती. कायदा हातात घेऊन मी चुकीचं केलं होतं. त्याची किंमतही मला मोजावी लागली. मला अटक झाली आणि माझ्यावर गुन्हे दाखल झाले.”

राहुल भट्टला आता होतो पश्चात्ताप

राहुल भट्ट पुढे म्हणाला, “मला या गोष्टीचा खूप पश्चात्ताप आहे. मी तसं करायला नको होतं. त्या काळी मी म्हणायचो की मी असं पुन्हा करेन. पण रणवीर शौरीच्या बाबतीत मी तसं करायला नको होतं. तो खूप समजूतदार निघाला. कोर्टातील केस आपापसात मिटवण्यासाठी त्याने स्वतः पुढाकार घेतला. ‘जे झालं ते विसरून जाऊया,’ असं तो म्हणाला होता. असं सहसा कोणी करत नाही. लोक अशा परिस्थितीचा फायदा घेऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, पण त्याने तसं केलं नाही. त्याने केस मागे घेतली. ज्या पद्धतीने त्याने सगळं हाताळलं, मला त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटतो. त्याच्या जागी दुसरं कोणी असतं तर असा समजूतदारपणा दाखवला नसता.”

यापूर्वी बोलताना मात्र राहुलने म्हटलं की होतं की कोणी त्याच्या बहिणीबरोबर असं वागलं तर तो सोडणार नाही. मी चांगल्यांशी चांगलं वागतो आणि वाईटांशी वाईट वागतो. मी रणवीरला मारलं आणि पुन्हा मारेन. मला कोणाची भीती वाटत नाही. कोणी माझ्या बहिणीला मारलं तर कोणीही मला अडवू शकणार नाही. त्या व्यक्तीला फक्त देवच माझ्यापासून वाचवू शकतो, असंही तो म्हणाला होता.

दरम्यान, या प्रकरणानंतर रणवीर काही काळासाठी परदेशात निघून गेला होता. त्यानंतर काही वर्षांनी त्याने कोंकणा सेन शर्माशी लग्न केलं, पण त्यांचा घटस्फोट झाला. दुसरीकडे पूजा भट्टनेही मनीष मखिजाशी लग्न केलं होतं, पण तेही वेगळे झाले.