Rahul Dev opens up about the insensitive behavior of paparazzi: अभिनेते मुकुल देव यांचे २०२५ मध्ये निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. आता त्यांचा भाऊ अभिनेता राहुल देव यांनी एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. त्यांचे हे वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. ते नेमकं काय म्हणालेत, हे जाणून घेऊ…

राहुल देव यांनी नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्यांचा लहान भाऊ मुकुल देव यांच्या निधनानंतर मीडियाचे जे वागणे होते, त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केले.

“थोडं जबाबदारीने…”

राहुल देव म्हणाले, “मीडियाने थोडं जबाबदारीने वागलं पाहिजे. मीडियामध्ये माझे चांगले मित्र नाहीत, असं नाही. पण, मुकुलच्या अंत्यविधीप्रसंगी मी अनुभव घेतला. मी कोणालाही बोलावलं नव्हतं. त्या दिवशी मला मॅक्स हॉस्पिटलमधून एका तासात स्मशानभूमीत पोहोचायचं होतं. मी तिथे एकटाच असणार होतो. कारण- आमच्या आई-वडिलांचे निधन झालं होतं.”

पुढे ते म्हणाले, “अनेकदा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक तक्रार करतात की, अंत्यविधीबद्दल सांगितलं नाही. त्यावेळी असंच कोणाच्या तरी सांगण्यावरून मी मुकुलच्या अंत्यविधीबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर डिटेल्स शेअर केल्या; पण त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पापाराझी तिथे पोहोचले आणि ते फोटो, व्हिडीओ काढू लागले. मी माझा भाऊ गमावला आणि ते तिथे फोटो काढण्यासाठी आले होते.”

“जेव्हा पापाराझी मुकुलच्या अंत्यविधीच्या वेळी फोटो काढत होते, त्यावेळी त्यांच्यावर मी रागावलो, त्याची मला लाज वाटत नाही. किंवा मी जेव्हा माझ्या मुलाला विमानतळावर सोडण्यासाठी गेलो होतो, तेव्हा पापाराझी सतत फोटो काढत होते, तेव्हाही त्यांच्यावर रागावताना मला लाज वाटली नाही. तेव्हा जे मला योग्य वाटलं ते मी केलं. उलट, जे असे फोटो काढतात, त्यांना लाज वाटायला हवी. त्यातून त्यांची संवेदनशीलता दिसून येते. मी फक्त एक भाऊ म्हणून माझे कर्तव्य बजावत होतो. माध्यमांनी संवेदनशील असायला हवं; पण ते नाहीत. हेच सत्य आहे”, असे म्हणत राहुल देव यांनी वक्तव्य केले.

मुकुल देव यांनी १९९६ मध्ये ‘मुमकिन’ मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. तसेच त्याच वर्षी त्यांनी सुश्मिता सेनबरोबर ‘दस्तक’ या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मुकुल देव यांनी अनेक मालिकांत काम केले आहे. त्यांनी वेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ते ‘कशिश’, ‘फिर कोई है’, ‘कुमकुम-एक प्यारा सा बंधन’अशा गाजलेल्या मालिकांत मुकुल देव महत्त्वाच्या भूमिकेत दिसले. ‘आर… राजकुमार’, ‘जल’, ‘हिम्मतवाला’, ‘दस्तक’ अशा चित्रपटांत त्यांनी काम केले होते.