Rahul Roy Brain Stroke Health Update Aashiqui Actor: ९० च्या दशकामध्ये आलेल्या ‘आशिकी’ सिनेमातील अभिनेत्याचा हॅण्डसम लूक आणि व्यक्तिमत्त्व पाहून तरुणी घायाळ झाल्या होत्या. त्यानं तरुणीच्या मनावर राज्य केलं आणि बॉक्स ऑफिस गाजवलं होतं. तो अभिनेता म्हणजे राहुल रॉय. एकेकाळी यशाच्या शिखरावर असलेल्या राहुल रॉयला २०२० मध्ये ब्रेन स्ट्रोक आला होता. आता राहुल रॉयनं आजारपणानंतरच्या प्रवासाबद्दल सांगितलं आहे.
‘फ्री प्रेस जर्नल’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल रॉयने ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर आयुष्यामध्ये झालेला बदल सांगितला. त्यानंतर त्यानं धूम्रपान पूर्णपणे सोडलं असून, आता तो व्हिगन झाल्याचं राहुल रॉयनं सांगितलं आहे. आता तो दररोज जवळपास आठ प्रकारची औषधं घेत असला तरी पूर्वीपेक्षा आता त्याची प्रकृती चांगली असल्याचं राहुलनं सांगितलं आहे.
कारगिलमध्ये शूटिंग करताना राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक
राहुल लवकरच ‘सुपर बादशाह’ या सिनेमामध्ये झळकणार आहे. त्याबाबत तो म्हणाला, “२०२० मध्ये कारगिलमध्ये शूटिंग करीत असताना मला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यामुळे मला बोलताना त्रास होत होता. त्यामुळे मला डायलॉग म्हणताना त्रास होत होता. पण, या काळात मला दिग्दर्शक करणवीरनं खूप मदत केली आणि साथ दिली.”
ब्रेन स्ट्रोकनंतर आलेल्या अनुभवांबद्दल पुढे तो म्हणाला, “ब्रेन स्ट्रोक आल्यानंतर यापुढे मी चालू शकेन किंवा बोलू शकेन का, असं मला वाटत होतं. मी आधी खूप धूम्रपान करायचो आणि मांसाहार करत होतो. पण, आता मी व्हिगन झालोय आणि जैन पद्धतीचं जेवण करतो. आता मी कांदा व लसूण खात नाही आणि दूधही घेत नाही. मी दररोज आठ औषधं घेतो; पण आता आधीपेक्षा परिस्थिती खूप चांगली आहे.”
मला काही मदत करायची असेल, तर काम द्या – राहुल रॉय
सोशल मीडियावर अनेकदा राहुलची सध्याची परिस्थिती याबद्दल बोललं जातं. त्यावर तो म्हणाला, “माझी काही कायदेशीर प्रकरणं सुरू आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला काम करीत राहण्याची गरज आहे. मला काही मदत करायची असेल, तर मला काम द्या. कारण- मला शेवटच्या श्वासापर्यंत काम करायचं आहे. कामामुळं माझं मन चांगलं राहत, कधी कधी त्रास होतो; पण मी हे सोडणार नाही. मी मेहनत करून पैसे कमावतोय, निदान दुसऱ्या कोणाची खिल्ली तरी उडवत नाही.”
‘आशिकी’ सिनेमातून राहुल रॉयला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर त्यानं ‘जुनून’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘गुमराह’ व ‘प्यार का साया’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं. तो हिंदी बिग बॉसच्या पहिल्या पर्वाचा विजेता झाला होता. नोव्हेंबर २०२० मध्ये कारगिलमध्ये ‘एलएसी – लाइव्ह द बॅटल’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान राहुलला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याच्या बोलण्यावर परिणाम झाला.
