नुकतेच अभिनेता राहुल रॉयचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि सर्वांनाच धक्का बसला. १९९० सालच्या ‘आशिकी’ चित्रपटातून रातोरात सुपरस्टार झालेला हा अभिनेता एका ‘कंटेंट क्रिएटर’सोबत इन्स्टाग्राम रील्समध्ये दिसला. या व्हिडीओंमध्ये राहुल त्याच्या ‘आशिकी’ आणि ‘फिर तेरी कहानी याद आयी’ सारख्या सुपरहिट गाण्यांवर रोमँटिक अभिनय करताना दिसत होता. हे व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी राहुलच्या परिस्थितीबद्दल काळजी व्यक्त केली, तर काहींनी हे व्हिडीओ पाहून त्याची खिल्ली थट्टा उडवली.

“खिल्ली उडवण्याऐवजी काम मिळवून द्या”

राहुल रॉयने बुधवारी इन्स्टाग्रामवर एक भावुक पोस्ट लिहून स्वतःवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिलं. आपल्या साधेपणाची किंवा परिस्थितीची खिल्ली उडवणाऱ्यांना त्याने आरसा दाखवला. राहुलने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांचे पैसे द्यायचे आहेत. हे पैसे मला ‘ब्रेन स्ट्रोक’ येण्यापूर्वीपासूनचे आहेत. जर तुम्ही माझ्या साधेपणाची किंवा संघर्षाची थट्टा करत असाल, तर त्यातून माझा नाही तर तुमचाच वाईटपणा दिसून येतोय. जर तुम्हाला खरंच माझी इतकी काळजी वाटत असेल, तर मला चांगले आणि सन्मानजनक काम शोधून देण्यात मदत करा, जेणेकरून मी हे पैसे परत देऊ शकेन. आणि मी मेहनत करून पैसे कमवतोय, कोणाची थट्टा करून नाही.”

“जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत काम करायचंय”

राहुलने पुढे लिहिलं, “ब्रेन स्ट्रोकनंतर मला अभिनय करणं खूप गरजेचं आहे. जिवंत आहे, तोपर्यंत मला काम करायचंय. कामामुळे माझं मन फ्रेश राहतं. मी आजही काम करतोय, ही भावना मला जबाबदारीची जाणीव करून देते. हो, कधीकधी लोक बोलतात त्याचं वाईट वाटतं, पण त्यामुळे मी कोलमडणार नाही.” राहुल रॉयची ही पोस्ट व्हायरल झाल्यावर त्याला इंडस्ट्रीतील कलाकार मोठ्या प्रमाणात पाठिंबा देत आहेत. फराह खानने “शुभेच्छा राहुल” अशी कमेंट केली, तर अभिनेता मनिष पॉलने “प्रेम आणि आदर, तुम्हाला अधिक ताकद मिळो सर” असं म्हणत त्याला पाठिंबा दिला.

राहुल रॉयच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या विचित्र प्रतिक्रिया

राहुल रॉयचे रील्स व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी विचित्र कमेंट्स केल्या. एका युजरने लिहिलं की, “या रीलसाठी त्याला ड्रग्ज देण्यात आले असावेत,” तर दुसऱ्याने म्हटलं, “कधीकधी आपल्याला वाटतं की हे AI निर्मित असावे, पण कमेंट्स वाचल्यावर समजलं की हे खरं आहे.” एकाने तर खिल्ली उडवत लिहिलं, “राहुल रॉय, जर तू संकटात असशील तर डोळे मिचकव.” काहींनी त्याच्या परिस्थितीवर प्रश्न उपस्थित करत म्हटलं, “त्याला या महिलेला किती पैसे द्यायचे आहे?” तसेच “अशा प्रकारचे व्हिडीओ बनवण्याची वेळ त्याच्यावर का आली?” असे प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी राहुल रॉय मुंबईतील वर्सोवा भागात एका खराब रस्त्यावरून हातात सुटकेस घेऊन चालताना दिसला होता. तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकरी काळजी व्यक्त करत होते. तसेच गेल्या वर्षी बिहारमधील एका लग्नात त्याने ‘आशिकी’च्या गाण्यावर गिटार वाजवत परफॉर्म केले होते.

राहुल रॉयचे फिल्मी करिअर

राहुल रॉयला महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ या पहिल्याच चित्रपटातून मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने ‘फिर तेरी कहानी याद आयी’, ‘जुनून’, ‘गुमराह’ आणि ‘प्यार का साया’ यांसारख्या चित्रपटांत काम केलं, पण त्याला पहिल्या चित्रपटासारखं यश पुन्हा मिळवता आलं नाही. २०२० मध्ये लडाखमध्ये चित्रीकरण करत असताना राहुलला ‘ब्रेन स्ट्रोक’ आला होता. त्यानंतर त्याला उपचारासाठी मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो अलीकडेच ‘आग्रा’ या चित्रपटात झळकला. हा चित्रपट ‘प्राईम व्हिडिओ’वर उपलब्ध आहे.