Rahul Roy Career Success and Failure: बॉलीवूडमध्ये एका रात्रीत स्टार होणारे अनेक अभिनेते आले, पण राहुल रॉय याची गोष्ट काही वेगळीच आहे. १९९० मध्ये महेश भट्ट यांच्या ‘आशिकी’ चित्रपटाने त्याला यशाच्या अशा शिखरावर नेले, जिथे पोहोचण्याचे स्वप्न प्रत्येक अभिनेता पाहतो. राहुल रॉयची क्रेझ इतकी होती की, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांत त्याने चक्क ४७ चित्रपट साइन करण्याचा विक्रम केला होता. मात्र, ज्या वेगाने तो वर गेला, त्याच वेगाने त्याचा करिअरचा आलेख खालीही आला. सलग २५ चित्रपट फ्लॉप होण्याचा धक्कादायक टप्पा त्याच्या आयुष्यात आला आणि तो प्रसिद्धीच्या झोतातून अचानक गायब झाला.

बॉलीवूड अभिनेता राहुल रॉय सध्या त्याच्या व्हायरल रील्समुळे चर्चेत आहे. खरं तर एकेकाळी त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं, पण काही काळानंतर तो प्रसिद्धीपासून दूर गेला. १९९० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. मात्र, त्यानंतर त्याचे चित्रपट फार चालले नाही. २००७ मध्ये ‘बिग बॉस’ च्या पहिल्या सीझनचा विजेता ठरल्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला होता, पण काही काळाने तो पुन्हा अचानक गायब झाला.

राहुल रॉयने ‘आशिकी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. महेश भट्ट यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवलं आणि तो तरुणींच्या गळ्यातील ताईत झाला. अनु अग्रवालबरोबरची त्याची जोडी सुपरहिट ठरली होती. या दोन्ही कलाकारांनी पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

११ दिवसांत साइन केले होते ४७ चित्रपट

९० च्या दशकात आपल्या पहिल्याच चित्रपटातून ‘रोमान्सचा बादशाह’ बनलेला राहुल रॉय इतका लोकप्रिय झाला होता की, त्याने अवघ्या ११ दिवसांत ४७ चित्रपट साइन केले होते. पण दुर्दैवाने एक दिवस असाही आला, जेव्हा सिनेसृष्टीसह प्रेक्षकांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली आणि त्याला काम मिळेनासं झालं.

राहुल रॉयने २१ निर्मात्यांचे पैसे परत केले

‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या एका मुलाखतीत राहुल रॉयने आपल्या करिअरमधील चढ-उतारांबद्दल सांगितलं होतं. “‘आशिकी’ चित्रपट सहा महिने हाऊसफुल्ल चालला, पण सुरुवातीला मला त्याचा काहीच फायदा झाला नाही. मी वैतागून महेश भट्ट यांच्याकडे गेलो, तेव्हा ते म्हणाले की लोक अजूनही तुला पडद्यावर बघतायत. ६ महिन्यांनंतर माझ्याकडे चित्रपटांच्या ऑफर्सचा पाऊस पडू लागला. मी अवघ्या ११ दिवसांत ४७ चित्रपट साइन केले. मी दिवसाला तीन-तीन चित्रपटांचे शूटिंग करायचो. पण नंतर माझ्या लक्षात आलं की, मी खूप चित्रपट साइन केले आहेत आणि ते एकाच वेळी पूर्ण करणे अशक्य आहे. त्यानंतर मी २१ निर्मात्यांचे पैसे परत केले होते,” असं राहुल रॉय म्हणाला होता.

सलग २५ चित्रपट झाले फ्लॉप

‘आशिकी’च्या तुफान यशानंतर राहुल रॉयने ‘गजब तमाशा’, ‘सपने साजन के’, ‘फिर तेरी कहानी याद आई’, ‘गेम’, ‘गुमराह’, ‘मझधार’, ‘नसीब’ आणि ‘अचानक’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केले. मात्र, यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर जादू दाखवू शकला नाही. त्याचे सलग २५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळले. एकापाठोपाठ एक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे राहुल रॉय हळूहळू सिनेसृष्टीपासून दूर गेला.

करिअर संपू नये, यासाठी राहुल रॉयने खूप प्रयत्न केले. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर तो टीव्हीकडे वळला आणि अनेक मालिका केल्या. २००७ साली तो बिग बॉसचा विजेता ठरला होता. पण ही ट्रॉफी जिंकूनही राहुल रॉयला करिअरमध्ये त्याचा फारसा फायदा झाला नाही. २०२० मध्ये राहुल रॉय लडाखमध्ये ‘LAC-Live The Battle’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला. खराब हवामानामुळे त्याची प्रकृती खालावली होती, त्यामुळे उपचारासाठी त्याला श्रीनगरहून एअरलिफ्ट करून मुंबईला आणण्यात आलं होतं. या कठीण काळात त्यांची बहीण प्रियांका रॉय आणि तिच्या पतीने त्याची काळजी घेतली. तेव्हा राहुल रॉयचे रुग्णालयाचे बिल सलमान खानने भरले होते, असं त्याच्या बहिणीने सांगितलं होतं.