आशिकी या चित्रपटातून अभिनेता राहुल रॉयला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली होती. अभिनेत्याच्या चाहतावर्ग मोठा आहे. आता मात्र अभिनेता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

अभिनेत्याचे सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओमध्ये अभिनेता खराब रस्त्यावर सूटकेस हातात घेऊन चालताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर त्याचे काही रील्स व्हायरल झाले, ज्यात तो विविध कंटेंट क्रिएटर्सबरोबर कोलॅबरेशन करताना दिसला. त्यामुळे त्याच्याबद्दल अनेक चर्चा झाल्या. अनेकांनी त्याला ट्रोलदेखील केले. असं काय झालं होतं की, तुला हे करावं लागलं? अशाही कमेंट्स अनेकांनी केल्या.

“जर माझ्या साधेपणाची किंवा अचडणींची खिल्ली उडवत असाल, तर…”

नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर राहुल रॉयने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहिले, “मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर बाबींचे पैसे भरायचे आहेत. मला जेव्हा ब्रेन स्ट्रोक झाला नव्हता, तेव्हापासून हे पैसे भरायचे आहेत. तुम्ही जर माझ्या साधेपणाची किंवा अचडणींची खिल्ली उडवत असाल, तर हे माझ्यापेक्षा कमी आणि तुम्ही माणूस म्हणून कसे आहात, त्याबद्दल जास्त कळते. जर तुम्हाला खरंच माझी काळजी असेल, तर मला काहीतरी चांगलं आणि योग्य काम मिळवून देण्यास मदत करा. त्यातून मी माझे पैसे भरू शकेन. मी कमीत कमी कष्ट करून पैसे कमवत आहे; इतरांची खिल्ली उडवून कमवत नाही.”

अभिनेत्याने असेही लिहिले, “जेव्हापासून मला ब्रेन स्ट्रोक येऊन गेला आहे, तेव्हापासून मी काम करणे मला महत्त्वाचे वाटते. मी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत मला काम करीत राहण्याची इच्छा आहे. त्यामुळे माझा मेंदू काम करेल. तुमच्या खिल्ली उडवण्यामुळे मला दु:ख होऊ शकते; पण तुम्ही मला थांबवू शकत नाही.”

या पोस्टनंतर अभिनेत्याने आणखी एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये त्याने तो त्याची बहीण व मेव्हण्याबरोबर राहत असल्याचे लिहिले.

“मी जगातला सर्वांत…”

राहुल रॉयने लिहिले, “मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल, प्रेमासाठी खूप धन्यवाद! हा मेसेज ट्रोलर्स, फेक व्हिडीओ बनवणाऱ्यांसाठी आणि माझा तिरस्कार करणाऱ्यांसाठी आहे. मी सुरक्षित आहे. माझी बहीण हरी माँ प्रियांका आणि मेव्हणा रोमिर सेन उत्तम पद्धतीनं काळजी घेत आहेत. मी माझ्या बहिणीच्या घरी राहतो. मढ आयलंडमध्ये आमचे एक सुंदर घर आहे आणि ती माझ्यावर खूप प्रेम करते. मी जगातला सर्वांत भाग्यवान भाऊ आहे. माझा जुळा भाऊ रोहित रॉय कॅनडामध्ये राहतो. दुर्दैवानं रोहितच्या कामाच्या ताणामुळे मी त्याला जवळपास नऊ वर्षं भेटू शकलो नाही. माझ्याकडे कपडे आहेत, पायांत घालण्यासाठी बूट आहेत, भूक भागवण्यासाठी अन्न आहे. माझ्याकडे कार आहे. मी काही रस्त्यावर पडलेला बेवारस नाही.”

पुढे अभिनेत्याने लिहिले, “सध्या माझ्याबद्दल जे खोटे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हारयल होत आहेत, ते खरे नाहीत. माझी बहीण हरी माँ आणि माझे मेव्हणे रोमीर सेन यांनी मला सर्व काही दिले आहे. त्यांना त्रास देऊन मनस्ताप देऊ नका. तेच माझा आधार आहेत. माझी अडचण ही आहे की, मला साधे कपडे घालायला आणि साधेपणाने जगायला आवडते. मी माझ्याबरोबर बॉडीगार्ड ठेवत नाही ही माझी स्वत:ची निवड आहे. मी कधी कधी ऑटोने प्रवास करतो, ते सोईचे असते. ती माझी वैयक्तिक निवड आहे. मी त्या रील्स सहजच बनवल्या होत्या. ते माझ्यासाठी काम होते, आर्थिक मदत नव्हती. मी नेहमी विचार करतो की, काम हे काम आहे. ते काम करण्याचा निर्णय माझा होता. मी चांगल्या कामासाठी खूप वेळ वाट पाहिली; पण ते मिळाले नाही. मी स्वस्थ बसून माझा वेळ वाया घालवू शकत नाही.”

शेवटी त्याने असेही लिहिले, “जर कोणी असे व्हिडीओ शेअर करत असेल की, ते मला मदत करत आहेत किंवा माझ्यासाठी कोणी आर्थिक मदत मागत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका. त्याबरोबरच मी कोणत्याही न्यूज चॅनेल किंवा कोणत्याही पॉडकास्टला मुलाखत दिलेली नाही. सकारात्मक राहा. जर मला चांगला चित्रपट मिळाला, तर तुम्ही मला पुन्हा एकदा चित्रपटात पाहू शकाल. तोपर्यंत मी जे काम करत आहे, त्यामध्ये मला पाहा. मी जिवंत आहे.”