Raj Kapoor Mandakini Controversy: हिंदी सिनेसृष्टीचे ‘शोमन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर आपल्या हटके चित्रपटांसाठी नेहमीच चर्चेत राहिले. मात्र, १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील मंदाकिनीच्या पारदर्शक पांढऱ्या साडीतील धबधब्याखालील सीन आणि स्तनपानाच्या दृश्यांनी वादाचे मोठा वाद झाला होता. आपली मुलगी रितू नंदा यांच्या ‘राज कपूर: द वन अँड ओन्ली शोमन’ या पुस्तकात त्यांनी स्त्री शरीराबद्दलच्या आकर्षणावर थेट भाष्य केले होते. “मी नग्नतेचा पुजारी आहे,” असं म्हणत त्यांनी लहानपणी आईसोबत एकत्र अंघोळ करण्यापासून ते चित्रपटांतील कामुक दृश्यांपर्यंत अत्यंत धक्कादायक खुलासे केले होते.

“मी नग्नतेचा पुजारी आहे. मला वाटतं की याची सुरुवात माझ्या आईसोबतच्या जवळीकीतून झाली. ती तरुण, सुंदर आणि पठाणी चेहरा-मोहरा असलेली स्त्री होती. आम्ही अनेकदा एकत्र अंघोळ करायचो आणि तिला नग्न पाहिल्याने माझ्या मनावर त्याचा कामुक प्रभाव पडला असावा. उर्दूमध्ये ‘मुकद्दस उरयान’ (पवित्र नग्नता) हा एक अतिशय सुंदर शब्दप्रयोग आहे. म्हणूनच माझ्या चित्रपटांमध्ये अंघोळीची दृश्ये वारंवार येतात.”

राज कपूर यांनी त्यांची मुलगी रितू नंदा यांच्या ‘राज कपूर: द वन अँड ओन्ली शोमन’ या पुस्तकात स्त्री शरीराबद्दलचे आपले आकर्षण अशा शब्दांत मांडले होते. जर तुम्ही राज कपूर यांचा शेवटचा चित्रपट ‘राम तेरी गंगा मैली’ (१९८५) पाहिला असेल, तर त्यांचे हेच विचार तुम्हाला त्यात दिसतील. आजच्या तरुण पिढीकडून राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’, ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि ‘प्रेम रोग’ या चित्रपटांचं समर्थन करणं शक्यच नाही. खरं तर ज्या पिढीने हे चित्रपट चित्रपटगृहात पाहिले, ती पिढीही यांना कलेचा उत्तम नमुना म्हणून स्वीकारू शकली नव्हती. ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटात राज कपूर यांचा लहान मुलगा राजीव कपूर आणि नवोदित अभिनेत्री मंदाकिनी मुख्य भूमिकेत होते. इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भात वृत्त दिलंय.

‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटाची कथा

‘राम तेरी गंगा मैली’ ही गंगोत्री या डोंगराळ भागात राहणाऱ्या ‘गंगा’ नावाच्या मुलीची कथा होती. ही भूमिका मंदाकिनीने साकारली होती. ती कोलकात्याहून आलेल्या ‘नरेन’ नावाच्या तरुणाला भेटते आणि त्याच्या प्रेमात पडते. ते लग्न करतात, ती गरोदर राहते आणि तो परत येण्याचं वचन देऊन शहरात निघून जातो. आजच्या काळात ही कथा ऐकल्यास कोणीही म्हणेल की, त्या पुरुषाने एका निष्पाप, साध्या मुलीचा गैरफायदा घेतला. चित्रपट पाहतानाही हेच जाणवतं. पुढे गंगा आपल्या तान्ह्या मुलाला घेऊन उत्तराखंडहून कोलकात्याला निघते आणि तिला वाटेत भेटणारे सगळेच दुष्ट, स्वार्थी आणि संधीसाधू निघतात. राज कपूर यांना गंगेला प्रत्येक वळणावर अडचणीत ढकलण्यात एक प्रकारचे विकृत समाधान मिळत होते की काय, असा प्रश्न हा सिनेमा पाहताना पडतो. त्यांनी तिला स्वतःचे निर्णय घेण्याचे कोणतेही स्वातंत्र्य दिले नाही.

मंदाकिनी त्यावेळी नवोदित अभिनेत्री होती. अभिनयही फार चांगला करत नव्हती, तसंच काहीसं राजीव कपूर यांचंही काम होतं. आपल्या मुलाच्या अभिनयावर टीका होऊ नये म्हणून राज कपूर यांनी मंदाकिनीला चित्रपटात घेतलं, असंच वाटत राहतं. पण हा चित्रपट फक्त कलाकारांच्या अभिनयावर अवलंबून नव्हता. कारण राज कपूर यांचे सर्व लक्ष ‘सत्यम शिवम सुंदरम’प्रमाणेच नायिकेला कामुक पद्धतीने पडद्यावर दाखवण्यावर होते. त्यांनी मंदाकिनीला फक्त एका पारदर्शक पांढऱ्या साडीत दाखवून सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने ज्या प्रकारचे कपडे घातले होते, त्यावर आजच्या काळात इन्स्टाग्रामने थेट बंदी घातली असती.

काही दशकांनंतर, मंदाकिनीला या दृश्याबद्दल विचारण्यात आलं होतं. तेव्हा याबद्दल कोणताही पश्चात्ताप नसल्याचं तिने मिड-डेशी बोलताना म्हटलं होतं. फक्त धबधब्याखालचाच सीन नाही, तर जेव्हा गंगा तिच्या बाळाला स्तनपान करते, तेव्हा कॅमेरा कुठे ठेवायचा यावरही राज कपूर यांचा आग्रह असायचा. ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे, पण दिग्दर्शकाने ज्या प्रकारे ते मांडलं, त्यात इतर पुरुष तिच्याकडे विचित्र नजरेने पाहत आहेत, हे दिसतं. यातून दिग्दर्शक स्वतःही त्याच मानसिकतेचा असल्याचं जाणवतं.

‘राम तेरी गंगा मैली’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात तुफान गर्दी झाली होती. गर्दी होईल याची खात्री राज कपूर आणि त्यांच्या टीमला होतीच. पण ज्या पद्धतीने त्यांनी मंदाकिनीला पडद्यावर दाखवलं, त्यावर प्रचंड टीका झाली. “तथाकथित नग्नता आणि कमी कपडे परिधान केलेल्या गंगावर प्रचंड टीका झाली असली, तरी गंगा नदीच्या पवित्रतेवरील विश्वासानेच गंगेच्या निष्पापपणावरील विश्वास टिकवून ठेवला. याच विश्वासाने चित्रपटाला सावरले आणि सर्व टीकेनंतरही गंगा वाहतच राहिली,” असं राज कपूर टीकेला उत्तर देताना म्हणाले होते. याचा उल्लेख रितू नंदाच्या पुस्तकात आहे.