Nargis Dutt & Sunil Dutt Love Story : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे अनेकदा त्यांच्या ऑफस्क्रीन आणि ऑनस्क्रीन केमिस्ट्रीमुळे चर्चेत राहिले. यापैकी एक जोडी म्हणजे दिवंगत अभिनेते राज कपूर आणि नर्गिस दत्त. नर्गिस या १९५० च्या दशकातील बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होत्या. असं म्हटलं जातं की नर्गिस यांनी तब्बल ९ वर्षे राज कपूर यांची वाट पाहिली, पण त्यांनी कधीच त्यांच्या पत्नीला सोडलं नाही. शेवटी नर्गिस यांनी त्यांच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
माध्यमांच्या वृत्तानुसार नर्गिस यांचा जन्म १९२९ मध्ये रावळपिंडी येथे फातिमा रशीद या नावाने झाला. त्यांचे वडील संगीतकार होते आणि त्यांनीच त्यांना ‘नर्गिस’ हे नाव दिलं, ज्याचा अर्थ ‘नरगिस (फूल)’ असा होतो. फक्त ६ वर्षांच्या असतानाच त्यांनी चित्रपटांत काम करण्यास सुरुवात केली. २० व्या वर्षी त्या बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री बनल्या. त्या नव्या स्वतंत्र भारताचा चेहरा बनल्या होत्या.
नर्गिस व राज कपूर यांची पहिली भेट
नर्गिस आणि राज कपूर यांची भेट १९४८ साली ‘अंदाज’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्या वेळेस नर्गिस आधीच मोठ्या स्टार होत्या, तर राज कपूर महत्त्वाकांक्षी, आकर्षक आणि विवाहित होते. पुढील नऊ वर्षे दोघेही पडद्यावर आणि खऱ्या आयुष्यात एकत्र होते. पण शेवटी नर्गिस यांना समजलं की राज कपूर कधीच त्यांच्या पत्नीला सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांनी हे नातं संपवलं आणि त्यांना न सांगता एक नवीन चित्रपट साइन केला. हा चित्रपट होता ‘मदर इंडिया’ हे समजताच राज कपूर खूप नाराज झाले असं म्हटलं जातं.
नर्गिस व सुनील दत्त यांची प्रेमकहाणी
न्यूज १८च्या वृत्तानुसार ‘मदर इंडिया’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर आग लागली आणि त्या अडचणीत सापडल्या. त्यावेळी सहकलाकार सुनील दत्त यांनी त्यांना वाचवलं. परंतु, पुढे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नर्गिस यांनी फिल्म इंडस्ट्री सोडली, तीन मुलांना वाढवलं आणि नंतर त्या राज्यसभा सदस्यही बनल्या.
नर्गिस आणि सुनील दत्त यांनी ११ मार्च १९५८ गुपचूप लग्न केल्याचं म्हटलं जातं. त्यावेळी ते पडद्यावर आई–मुलाच्या भूमिकेत काम करत होते, त्यामुळे ही बातमी बाहेर आली असती तर चित्रपटावर परिणाम झाला असता. म्हणून त्यांनी जवळपास एक वर्ष ही गोष्ट लपवून ठेवल्याचं म्हटलं जातं, पण जेव्हा ही बातमी बाहेर आली, तेव्हा बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. राज कपूर यांना मोठा धक्का बसला. त्यांच्या पत्नी कृष्णा कपूर आणि लेखिका मधु जैन यांच्या मते, ते रोज दारू पिऊन घरी यायचे आणि बाथटबमध्ये बसून रडायचे. स्वत:ला सिगारेटचे चटकेसुद्धा द्यायचे.
लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडली
सुनील दत्त यांच्याबरोबर नर्गिस यांनी आयुष्यात आधी मिळालं नव्हतं ते सगळं उभं केलं. तीन मुलं, स्वतःची प्रॉडक्शन कंपनी आणि समाजासाठी काम करण्याची संधी. त्यांनी जवळपास पूर्णपणे चित्रपटात काम करणं सोडलं होतं आणि स्टारडमपेक्षा कुटुंबाला प्राधान्य दिलं. त्यांना ओळखणाऱ्या लोकांच्या मते, त्या आयुष्यात पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने समाधानी होत्या. पण १९८० मध्ये त्यांची प्रकृती अचानक बिघडली. तपासणीत त्यांना कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं.
मुलाचा पहिला चित्रपट रिलीज होण्याआधीच झालं निधन
नर्गिस व सुनील दत्त यांचा मुलगा संजय दत्त त्याच्या पहिल्या ‘रॉकी’ या चित्रपटातून ७ मे १९८१ रोजी पदार्पण करणार होता. नरगीस यांनी वचन दिलं होतं की काहीही झालं तरी त्या प्रीमियरला उपस्थित राहतील, जरी स्ट्रेचरवरून यावं लागलं तरी. पण, चित्रपट रिलीज होण्याच्या चार दिवस आधीच त्यांचं निधन झालं.
