Raj Kapoor meet Pakistani soldiers : आजही बॉलीवूड कलाकारांची लोकप्रियता जगभरात पाहायला मिळते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांवर चाहते लक्ष ठेवून असतात. मात्र, इंटरनेट आणि सोशल मीडियाचा काळ नसतानाही हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांची क्रेझ काही कमी नव्हती. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची प्रचंड गर्दी उसळायची.
७० च्या दशकामध्ये एका बॉलीवूड अभिनेत्याला चक्क पाकिस्तानमधून मिठाई पाठवण्यात आली होती. भारत-पाकिस्तान सीमेवर तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी या अभिनेत्याच्या अभिनयाचे कौतुक करीत त्यांच्यासाठी खास जिलेबी पाठवली होती. कोण होते हे अभिनेते आणि नेमका काय होता हा किस्सा ते जाणून घेऊया…
बॉबी चित्रपटाचे संपूर्ण टीमसह काश्मीरमध्ये शूटिंग
पाकिस्तानमध्येही हिंदी चित्रपट आणि कलाकारांची मोठी लोकप्रियता आहे. ७० च्या दशकामध्ये पाकिस्तानी सैनिकही एका दिग्गज अभिनेत्याचे चाहते होते. पाकिस्तानमधील पेशावर येथे जन्मलेल्या या अभिनेत्यासाठी पाकिस्तानी सैनिकांनी सीमा पार करून खास जिलेबी पाठवली होती. हे अभिनेते होते बॉलीवूडचे ‘शोमॅन’ राज कपूर. १९७३ साली राज कपूर दिग्दर्शित ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातून ऋषी कपूर यांचे सिनेविश्वामध्ये पदार्पण झाले होते. या चित्रपटाचे शूटिंग काश्मीरमध्ये सुरू होते. त्यावेळी राज कपूर हे संपूर्ण टीमसह काश्मीरमध्ये शूटिंग करीत होते. त्यामधून थोडा वेळ काढत त्यांनी सीमेजवळ भारतीय जवानांची भेट घेतली होती. यावेळी राज कपूर यांनी तेथील कमांडरला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. ही बातमी समजताच कमांडरने त्यांचे उत्साहाने स्वागत केले होते.
पाकिस्तानी सैन्यानी पाठवला होता खास पदार्थ
भारत-पाकिस्तान सीमेजवळ अभिनेते राज कपूर आले असल्याचे पाकिस्तानच्या सैन्याच्या लक्षात आले होते. रेडिओच्या माध्यमातून त्यांना याबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच पाकिस्तान सैन्याची अनेक वाहने सीमेवर पोहोचली. त्या काळात पाकिस्तानमध्येही राज कपूर यांची प्रचंड लोकप्रियता होती. त्यांना भेटण्यासाठी आलेल्या पाकिस्तानी सैनिकांनी राज कपूर यांच्यासाठी खास जिलेबी आणि मिठाई आणली होती. सीमेपलीकडून मिळालेल्या या प्रेमाने आणि आदराने राज कपूर भारावून गेले होते. त्यांना दुसऱ्या देशातून मिळालेले हे प्रेम पाहून आनंद झाला होता.
कपूर घराणे मूळचे पेशावरचे
अभिनेते राज कपूर यांचा जन्म आजच्या पाकिस्तानमधील पेशावर येथे झाला होता. त्यांचे कुटुंब मूळचे पेशावरचेच होते. आजही राज कपूर यांचे मूळ घर पेशावरमध्ये आहे. देशाच्या फाळणीपूर्वी कपूर कुटुंब भारतात आले. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते; तर त्यांचे काका त्रिलोक कपूरदेखील चित्रपटांमध्ये काम करत होते. या परंपरेतूनच राज कपूर यांनीही सिनेविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले. राज कपूर यांचे कपूर कुटुंब अजूनही सिनेविश्वामध्ये सक्रिय आहे. रणबीर कपूर आणि कपूर घराण्याची सून आलिया भट्ट हे बॉलीवूडच्या आघाडीच्या कलाकारांपैकी एक आहेत.
