निळ्याशार डोळ्यांचा राज कपूर पियानो वाजवत ‘दोस्त दोस्त ना रहा’ हे गाणं म्हणतोय.. त्याच्या मनातले ते भाव त्याला झालेलं प्रेमभंगाचं दुःख फसवलं गेल्याची भावना सगळं आपणही सहन करतो आहोत. ‘संगम’ चित्रपटातलं हे दृश्य तसंच्या तसंच डोळ्यांसमोर येतं. हिंदी सिनेसृष्टीतले ‘शोमन’ असं बिरुद अभिमानाने मिरवणाऱ्या राज कपूर यांच्या आठवणी या आजही मनात तितक्याच ताज्या आहेत. चार्ली चॅप्लिनचा त्यांच्यावर प्रभाव होता. हे ‘आवारा हूँ’ या गाण्यांत दिसून येतं. ‘मेरा जुता है जापानी, ये पतलून इंग्लिस्तानी, सरपे लाल टोपी रुसी फिर भी दिल है हिंदुस्थानी’ हे म्हणणारा राज कपूरही आपल्यापैकीच एक वाटतो. अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते राज कपूर यांनी हिंदी सिनेसृष्टीतला काळ गाजवला आहे. राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूरही नामवंत कलाकार. तर कपूर घराण्याची चौथी पिढी आज सिनेसृष्टीत कार्यरत आहे. याच राज कपूर यांचे अनेक किस्से अनेकदा चर्चिले जातात.

Raj Kapoor
जाणून घ्या राज कपूर यांच्याविषयी माहीत नसलेले खास किस्से.

‘कल, आज और कल’चा किस्सा

राज कपूर यांचे पुत्र आणि अभिनेते रणधीर कपूर यांनी दिग्दर्शित केलेला ‘कल, आज और कल’ हा सिनेमा सगळ्यांच्या आजही स्मरणात आहे. या सिनेमात कपूर घराण्याच्या तीन पिढ्या आहेत. पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर. रणधीर कपूर यांनी सिनेमात कामही केलं आणि दिग्दर्शनही केलं. मात्र आपल्या आजोबांना आणि वडिलांना दिग्दर्शित करणं किती कठीण होतं हा किस्सा रणधीर कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितला. “कल आज और कलची गोष्ट मी ऐकली आहे तो सिनेमा तू दिग्दर्शित करावास असं मला वडिलांनी (राज कपूर) सांगितलं. मी तेव्हा जरा घाबरलो कारण सिनेमाची गोष्ट ऐकली तेव्हा मला वाटलं ही तीन पिढ्यांची गोष्ट आहे, यात आजोबा (पृथ्वीराज कपूर). वडील (राज कपूर ) आणि मी स्वतः आम्ही तिघंही यात असलं पाहिजे. मला राज कपूर म्हणाले मी तुला समुद्रात फेकलंय जर तुला पोहता आलं तर ठीक नाहीतर दिग्दर्शन आणि अभिनय विसरुन जा.” असं राज कपूर यांनी सांगितल्याचं रणधीर कपूर म्हणाले.

anand dighe marathi news,
धर्मवीर- २ चित्रपटातील संवादावरून आनंद दिघे यांचे पुतणे संतापले; म्हणाले, “शिंदे स्वत:ला…”
salman khan
आनंद दिघे यांच्याकडून हिंदुत्वाचे नाही तर संपूर्ण समाजाचे रक्षण- एकनाथ शिंदे
On the occasion of Madhusudan Kalelkar birth centenary announcement of a production organization in his name
कालेलकरांच्या प्रसिद्ध चित्रपटांच्या ‘सिक्वेल’साठी प्रयत्न सुरू; मधुसुदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त त्यांच्या नावाने निर्मिती संस्थेची घोषणा
Artistes of the film Gharat Ganapati visit to Loksatta office
गणपतीच्या निमित्ताने घरातल्यांची गोष्ट ; ‘घरत गणपती’ या चित्रपटातील कलावंतांची ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट
exclusive interview with bai ga movie team in Loksatta Digital Adda
स्त्री इच्छांच्या सन्मानाची गोष्ट
Director Sukathankar, audience,
आता रडकेपणाने मराठी चित्रपटांविषयी चर्चा करणार की… दिग्दर्शक सुकथनकर यांच्या प्रेक्षकांना कानपिचक्या
biopic, Laxman Utekar, Vicky Kaushal,
दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्यावरच चरित्रपट होऊ शकतो – विकी कौशल
What Eknath Shinde Said?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर २’ चित्रपटात दिसणार? पोस्टर लाँचच्या वेळी सचिन पिळगावकरांच्या ‘त्या’ वक्तव्याची चर्चा

अभिनय करुन दाखव हे मला सांगण्यात आलं-रणधीर कपूर

पुढे रणधीर कपूर यांनी सांगितलं, “याच सिनेमाचा पहिला सीन होता ज्यात मंदिर होतं, तिथे आजोबा, वडील आणि मी आम्ही तिघेही पूजा करतो आहोत असा सीन होता. आधी राज कपूर आले. मला विचारलं कसा शॉट घेणार आहेस? मी म्हटलं तुम्ही इथे चालत येता आणि बसता, मला म्हणाले तू अभिनय करुन दाखव. तर मी त्यांना म्हटलं काय माझी गंमत करत आहात का? त्यावर राज कपूर म्हणाले मी तुला शिकवतोय. कारण जेव्हा आम्ही नसू तेव्हा जर तू असा अभिनेत्यावर अवलंबून राहिलास तर तुला लोक अडाणी दिग्दर्शक समजतील. मग मी त्यांना तो सीन करुन दाखवला. त्यानंतर पृथ्वीराज कपूर आले. त्यांनीही मला सीन करुन दाखव सांगितलं. त्यानंतर मी त्यांनाही तो सीन करुन दाखवला आणि तो सीन पूर्ण झाला.” ही आठवण रणधीर कपूर यांनी सांगितली.

रणधीर कपूर यांनी कार घेतली तो किस्सा

“आम्हाला पैशांचं मूल्य आमच्या वडिलांनी (राज कपूर) शिकवलं. मी दिग्दर्शन करायला गेलो तेव्हा मला त्यांनी सांगितलं कारने जायचं नाही. तू बसने फिर. मी बसने लेख टंडन यांच्याकडे जात होतो आणि सहाय्यक दिग्दर्शन शिकत होतो. त्यानंतर मी दिग्दर्शक होऊ शकलो. मी त्यांच्याकडे शिकत होतो तोपर्यंत बसने प्रवास करायचो. त्यानंतर मी राज कपूर यांची कार चालवत होतो. मी अभिनेता झालो आणि पैसे आले तेव्हा मी एका छोट्या कारने जात होतो. एक दिवस एक कफल्लक माणूस आला आणि त्या कारला तो हसला. तुझ्याकडे मोठी कार नाही? असं उपहासाने म्हणाला. मी बबिताला (अभिनेत्री आणि रणधीर कपूर यांची पत्नी) सांगितलं तिच्याकडून पैसे घेतले, निर्मात्यांकडून काही पैसे घेतले. त्यानंतर मी त्या काळातली एक लेटेस्ट कार घेतली. ती कार घेऊन मी वडिलांकडे म्हणजेच राज कपूर यांच्या घरी गेलो, त्यांना सांगितलं मी नवी कार घेतली आहे. ते खूप खुश झाले मला म्हणाले आज खूप आनंद झाला. अशाच प्रकारे प्रगती कर. मला काय वाटलं माहीत नाही, मी त्यांना म्हटलं बाबा तुम्हीही अशी लेटेस्ट कार विकत घ्या. त्यावर त्यांचं उत्तर होतं हे बघ डब्बू (रणधीर कपूर यांचं लाडाचं नाव) मी जर बसने प्रवास केला ना तरीही लोक म्हणतील राज कपूर बसने प्रवास करतोय. मला कार वगैरेची काही गरज नाही, त्याची गरज तुला आहे.” हा किस्साही रणधीर कपूर यांनी सांगितला होता.

‘राम तेरी गंगा मैली’ कसा तयार केला?

“मी आणि राज कपूर एकदा दिल्लीला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तिथे रवींद्र जैन गाणं म्हणत होते. ‘एक राधा एक मीरा’ हे गाणं गात होते. राजसाहेबांना ते गाणं खूप आवडलं. त्यांनी वन्स मोअर दिला. मग त्यांनी जैन यांना विचारलं हे गाणं कुणाचं आहे? तर जैन म्हणाले हे माझं गाणं आहे. त्यावर राज कपूर चटकन म्हणाले हे गाणं मला हवं, रवींद्र जैन यांना ही कल्पना फारच आवडली. त्यानंतर आम्ही घरी आलो, मला दुसऱ्याच दिवशी राज कपूर यांनी सांगितलं तुझ्या घरी काही लोक जेवायला येतील तशी व्यवस्था कर, मी पण येतो आहे. त्यानंतर एक तबला, सारंगी, सतार सगळं काही घेऊन लोक माझ्या घरी आले. गायक रवींद्र जैनही आले. त्यानंतर मैफल सजली, राज कपूर आले. पुन्हा एकदा ते ‘एक राधा एक मीरा’ गाणं म्हटलं. मला राज कपूर म्हणाले तुझ्याकडे चेकबुक आहे? मी म्हटलं आहे. मला म्हणाले जा २५ हजारांचा एक चेक लिहून आण. मी चेक घेऊन आलो आणि रवींद्र जैन यांना तो दिला. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. त्यानंतर दोन दिवस गेले असतील मी राज कपूर यांना ऑफिसमध्ये भेटायला गेलो मला त्यांनी सांगितलं राज कपूर, रवींद्र जैन आणि इतर काही लोक पुण्याला गेले. फार्म हाऊसवर राज कपूर त्या सगळ्यांना घेऊन गेले होते. परत आल्यावर मला म्हणाले, तुला माझा अभिमान वाटेल अशी गोष्ट करुन आलो आहे. मी विचारलं काय? तर म्हणाले राम तेरी गंगा मैली चं म्युझिक, गाणी सगळं तयार करुन आलो आहे. मी त्यांना विचारलं गोष्ट कुठली आहे? त्यांनी मला सांगितलं मी पुढच्या आठवड्यात चाललो आहे परत तुला गोष्ट लिहून देतो. त्या सिनेमातली गाणी आधी तयार झाली आणि मग तो सिनेमा तयार झाला. ” असाही किस्सा रणधीर कपूर यांनी द कपिल शर्मा शोच्या मुलाखतीत सांगितला होता.

राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी सुपरहिट

राज कपूर आणि नर्गिस यांची जोडी रुपेरी पडद्यावर सुपरहिट ठरली होती. या दोघांनी एकाहून एक सरस चित्रपट दिले आहेत. ‘श्री ४२०’, ‘आग’, ‘बरसात’, ‘अंदाज’, ‘आह’, ‘जागते रहो’, ‘चोरी चोरी’ असे एकाहून एक सरस चित्रपट या जोडीने दिले. ‘प्यार हुआ इकरार हुआ है..’ हे त्यांनी एका छत्रीखाली म्हटलेलं गाणं, त्यातली मुंबई ही अनेक प्रेमी युगुलांना छत्रीतलं आणि पावसातलं प्रेम शिकवून गेली. रील लाइफमध्ये एकत्र दिसणाऱ्या नर्गिस यांच्याशी राज कपूर यांचे व्यक्तिगत आयुष्यातही भावबंध जुळले होते. ते दोघंही एकमेकांच्या प्रेमात नऊ वर्षे होते. नर्गिस आणि राज कपूर यांना लग्न करायचं होतं पण तसं घडलं नाही. राज कपूर यांचा विवाह आधीच कृष्णा कपूर यांच्याशी झाला होता. मधु जैन लिखित ‘द कपूर्स’ या पुस्तकात हा सगळा उल्लेख आहे. राज कपूर आणि नर्गिस यांच्या प्रेमसंबंधाबाबत जेव्हा पृथ्वीराज कपूर यांना कळलं तेव्हा ते चांगलेच चिडले होते. त्यांनी या दोघांच्या नात्याला कडाडून विरोध केला. त्यामुळे हे नातं संपुष्टात आलं.

Raj Kapoor and Nargis
राज कपूर आणि नर्गिस या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट ५० आणि ६० च्या दशकांत दिले आहेत. (फोटो-फेसबुक)

मेरा नाम जोकरच्या अपयशामुळे नाराज झाले होते राज कपूर

‘मेरा नाम जोकर’ हा राज कपूर यांच्या आयुष्यातला ड्रीम प्रोजेक्ट होता. पाच वर्ष खूप अभ्यास करुन आणि रशियन कलावंतांना एकत्र आणत त्यांनी हा सिनेमा साकारला होता. मात्र हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही. समीक्षकांनी या सिनेमावर खूप टीका केली. तसंच सिनेमा चार तास आठ मिनिटांचा होता, त्यामुळेही त्याच्या इतक्या मोठ्या लांबीवरही टीका झाली. राज कपूर, सिम्मी गरेवाल, पद्मिनी, मनोज कुमार, धर्मेंद्र, दारा सिंग, राजेंद्र कुमार अशी तगडी स्टार कास्ट असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करु शकला नाही. या सिनेमासाठी राज कपूर यांनी सर्वस्व पणाला लावलं होतं आणि त्यांना खूप तोटा झाला. मात्र नंतर ते सगळं अपयश ‘बॉबी’ सिनेमाने धुऊन काढलं. तसंच ‘मेरा नाम जोकर’चे शो रशियातही करण्यात आले. त्यांनी हा सिनेमा घेऊन टूरही केली होती. आर. के. स्टुडिओज या संस्थेत सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा आज घडीला ठरला आहे.

Raj Kapoor in Mera Naam Joker
राज कपूर यांच्या कारकिर्दीतला हा सिनेमा वेगळा ठरला होता. (फोटो सौजन्य-शेमारो व्हिडीओ)

‘बॉबी’ सिनेमाचं अभूतपूर्व यश

बॉबी या सिनेमात एका तरुण-तरुणीची गोष्ट सांगण्यात आली होती. या दोघांचं एकमेकांकडे आकर्षित होणं, दोघांच्या घरातून विरोध अशा धाटणीची खास लव्हस्टोरी राज कपूर यांनी आणली. त्या सिनेमाने बक्कळ कमाई केली. ऋषी कपूर आणि डिंपल हे दोघं या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. कॉलेजला जाणारा श्रीमंत घरातला मुलगा आणि एका मच्छिमाराची मुलगी अशी जोडी या चित्रपटात दिसली. या चित्रपटाला प्रेक्षकांची अपार पसंती लाभली.

राज कपूर यांचे सिनेमा आणि बोल्ड दृश्यं

राज कपूर यांच्या चित्रपटात बोल्ड दृश्यं असायचीच. राज कपूर स्वतःसाठी ‘मुकद्दस उरियाँ’ हा उर्दू शब्द वापरत असत. ज्याचा अर्थ होतो पवित्र नग्नता. मी नग्नतेचा उपासक आहे असंही ते सांगत असत. ‘संगम’ चित्रपटात ‘बोल राधा बोल संगम होगा के नहीं’ या गाण्यात वैजयंती माला यांना स्विमसूटवर दाखवण्यात आलं आहे. ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमात सिम्मी गरेवाल यांचं कपडे बदलतानाचं दृश्य आहे. ‘बॉबी’ सिनेमात डिंपल बिकीनी आणि त्या काळी बोल्डच वाटतील अशा शॉर्ट ड्रेसमध्येच आहे. ‘सत्यम शिवम सुंदरम’ म्हणणारी झीनत अमान, ‘राम तेरी गंगा मैली’ मधली धबधब्याखाली अंघोळ करणारी मंदाकिनी या उदाहरणांवरुन हे स्पष्ट होतं की त्यांना सिनेमातली नग्नता प्रिय होती. त्यात त्यांना काही गैर वाटत नसे. बोल्डनेस सिनेमांत असला पाहिजे हे त्यांना वाटत असे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटांमध्ये त्या काळात वर्ज्य मानले जाणारे सीन असत.

‘जॉनी वॉकर ब्लॅक लेबल’ व्हिस्कीशी खास नातं

जॉनी वॉकर ब्लॅक लेबल या व्हिस्कीशी त्यांचं खास नातं होतं. लंडनहून आणलेली व्हिस्कीची बाटली कायमच त्यांच्याजवळ असे. मधू जैन यांच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. राज कपूर ब्लॅक लेबल व्हिस्की बड्या पार्ट्यांमध्येही घेऊन जायचे. लंडनहून ती बाटली आणायचे, ते स्वतः प्यायचे किंवा त्यांच्या अगदी खास लोकांना त्यातला एखादा पेग ऑफर करायचे.

‘लेट मी डाय’ हे ठरले त्यांचे अखेरचे शब्द

आपल्या पद्धतीने कलंदर आयुष्य जगणाऱ्या या कलावंताचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेला. १९८८ मध्ये राज कपूर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला तो घेण्यासाठी जेव्हा ते दिल्लीतल्या सिरी फोर्ट ऑडिटोरियम या ठिकाणी पोहचले तेव्हा त्यांना दम्याचा अटॅक आला. राष्ट्रपती वेकंटरमण यांनी त्यांचा गौरव केला आणि तातडीने राज कपूर यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात नेण्यात आलं. स्ट्रेचरवर झोपण्यास त्यांनी नकार दिला. राज कपूर यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरु होते, त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. त्यानंतर त्यांना पाहण्यासाठी कमल हासन रुग्णालयात आले. त्यांच्याशी थोडं बोलल्यावर राज कपूर यांना पुन्हा त्रास होऊ लागला. त्यांना आयसीयूमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची प्रकृती आणखी खालावली. ते डॉक्टरांना म्हणाले मी बरा होईन असं वाटत नाही, लेट मी डाय. हेच त्यांचं अखेरचं वाक्य ठरलं कारण २ जून १९८८ हाच तो दिवस होता ज्यादिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. पत्रकार प्रदीप सरदाना यांनी बीबीसीशी बोलताना हा किस्सा सांगितला होता.

राज कपूर हा शोमन काळाच्या पडद्याआड जाऊन ३६ वर्षे झाली आहेत. तरीही त्यांच्या चित्रपटांची, अभिनयाची, त्यांच्यावर चित्रीत झालेल्या गाण्यांची चर्चा कायमच होत असते. मेरा नाम जोकर या सिनेमात त्यांच्या तोंडी गाणं आहे, “जीना यहाँ, मरना यहाँ इसके सिवा जाना कहां..”, या गाण्यातलं कडवंही अर्थपूर्ण आहे. कल खेल में हम हो ना हो.. “गर्दिश में तारे रहेंगे सदा, भुलोगे तुम, भुलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा..’ सदैव आपलं असण्याची साद घालून हा कलावंत निघून गेला आहे. पण या खास कलाकारच्या आठवणी कधीही न संपणाऱ्या आहेत.