Raj Kundra Valentine Day Gift Shilpa Shetty IPL : बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्रा याने आयपीएल आणि राजस्थान रॉयल्स टीम खरेदी करण्याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. २००९ मध्ये त्याने शिल्पा शेट्टीला ‘व्हॅलेंटाइन डे गिफ्ट’ म्हणून तब्बल ८१.९ कोटी रुपयांना राजस्थान रॉयल्सची ११.७ टक्के हिस्सेदारी खरेदी करून दिली होती. आता राज कुंद्राने आयपीएलमधील नफा, सट्टेबाजीचे आरोप आणि दोन वर्षांच्या बंदीवर उघडपणे भाष्य केले.
२००९ मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएलचा पहिला सीझन जिंकल्यानंतर टीममध्ये हिस्सेदारी खरेदी केली होती, असं SMTV या यूट्यूब चॅनेलशी बोलताना राज कुंद्राने सांगितलं. “मी ती एका व्हॅलेंटाइन डे गिफ्टसारखी खरेदी केली होती,” असं राज कुंद्रा म्हणाला. त्या वेळी राजचा भारतात कोणताही बिझनेस नव्हता आणि भारतात स्वतःचा बिझनेस सुरू करण्यासाठी त्याला ही टीम खरेदी करायची होती.
तेव्हा ७०० कोटींची व्हॅल्यू आता १६,००० कोटी
“मला वाटलं की शिल्पाची ब्रँड व्हॅल्यू चांगली आहे आणि मी पैसे गुंतवतोय. मी तेव्हा टीमचा एक मोठा हिस्सा खरेदी केला, पण ती केस अजूनही सुरू आहे. तेव्हा राजस्थान रॉयल्सची व्हॅल्यू ७०० कोटी रुपये होती आणि आज तिची व्हॅल्यू १६,००० कोटी रुपये आहे. माझी यात ११.७ टक्के हिस्सेदारी होती,” असं राज कुंद्राने स्पष्ट केलं. “त्या काळात आयपीएलमध्ये एकाच चेकद्वारे केलेली सर्वात मोठी गुंतवणूक होती. आयपीएल पुढे खूप मोठी स्पर्धा होईल, यावर विश्वास ठेवणारा मी पहिला माणूस होतो,” असा दावाही राज कुंद्राने केला.

प्रत्येक टीम वर्षाला २०० ते ५०० कोटी रुपयांचा नफा कमावते – राज कुंद्रा
आयपीएलमधील टीम्स कसा नफा कमावतात याबद्दल राज कुंद्राने सांगितलं. पहिल्या ५-६ वर्षांत टीम्सना फारसा नफा झाला नाही. सुरुवातीला ना नफा-ना तोटा अशी परिस्थिती होती किंवा थोडे पैसे खिशातून टाकावे लागत होते. पण आता नफ्याचं गणित बदललं आहे. आता ७०% कमाई टीव्ही आणि ब्रॉडकास्टिंगच्या हक्कांमधून येते. १० ते १५% कमाई जर्सीवरील स्पॉन्सर्सशिपमधून येते आणि तिकिटांच्या विक्रीतून १० ते १५% कमाई होते. अशा रितीने सध्याच्या काळात आयपीएलची प्रत्येक टीम दरवर्षी २०० ते ५०० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावते.
सट्टेबाजीच्या आरोपांवर राज कुंद्राचे स्पष्टीकरण
राज कुंद्रा ५-६ वर्षे राजस्थान रॉयल्सबरोबर होता, त्यानंतर त्याच्यावर सट्टेबाजीचा आरोप झाला. स्वतःचा बचाव करत राज म्हणाला, “आमच्यावर सट्टेबाजीचा आरोप झाला. सट्टेबाजीची परवानगी नाही. त्यानंतर टीमवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. काही खेळाडूंवर फिक्सिंगसाठी तर मालक म्हणून आमच्यावर सट्टेबाजीसाठी बंदी घालण्यात आली. पण ती सट्टेबाजी काय होती? जसे तुम्ही आणि मी एकत्र बसलो आहोत आणि सहज म्हणतो, ‘शर्यत लावायची का? ५०० रुपयांची शर्यत?’ असा तो संवाद होता. अधिकाऱ्यांच्या मते एवढंही चालणार नाही. या कारणासाठी आमच्यावर बंदी घातली गेली? हे प्रकरण अजूनही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.”
आयपीएलमध्ये सट्टेबाजी चालते का?
राजस्थान रॉयल्सच्या इतर मालकांपैकी सर्व दोष फक्त आपल्यावरच टाकण्यात आला, असं राज कुंद्राने म्हटलं. “फक्त माझ्यावरच आरोप झाले. मला टीम वाचवायची होती, त्यामुळे मी ते सहन केलं.” आयपीएलमध्ये सट्टेबाजी चालते का, असं विचारल्यावर राज म्हणाला, “सट्टेबाजी चालते. यासाठी एक समांतर बाजारपेठ आहे. ज्याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर सट्टेबाजी कायदेशीर आहे, तिथे लोक आयपीएलवर पैज लावतात. भारतातही असा अंडरग्राउंड बाजार आहे. पण खेळाडू किंवा संघात असा कोणताही गैरप्रकार घडत नाही.”
