Raj Nidimoru ex wife Shhyamali De Post : अभिनेत्री समांथा रूथ प्रभूने १ डिसेंबर रोजी दिग्दर्शक राज निदिमोरूशी लग्न केलं. तमिळनाडू येथील कोइम्बतूरमधील ईशा योग सेंटरमध्ये खासगी सोहळ्यात मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत राज व समांथा यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नानंतर राज निदिमोरूची एक्स पत्नी श्यामली डे हिने केलेली पोस्टची चर्चेत आली आहे.
श्यामली डे हिने गुरुवारी इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये काही पोस्ट केल्या. त्यात ज्या लोकांनी तिला सदिच्छा पाठवल्यात त्यांचे तिने आभार मानले. श्यामलीच्या ज्योतिष गुरूंना चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले आहे, त्यामुळे खूप अस्वस्थ असल्याचं श्यामलीने म्हटलं आहे.
“सर्वांचे सदिच्छा, प्रेमळ शब्द आणि सर्व आशीर्वादांसाठी आभार. मी रात्रभर जागी होते, या कुशीवरून त्या कुशीवर विचार करत होते. स्वतःशीच वाद घालत होते. मला जाणवलं की माझ्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या गोष्टी न स्वीकारणं हे कृतघ्न आणि मूर्खपणाचं ठरेल. मी गेल्या अनेक वर्षांपासून ट्विन हार्ट्सवर ध्यानाचा सराव करत आहे. ध्यान करण्यात पृथ्वीला आणि सर्व लोकांना शांती, प्रेम, क्षमा, आशा, प्रकाश, आनंद, प्रेम, दया, सद्भावना आणि काहीतरी चांगलं करण्याची इच्छा या गोष्टींचा समावेश आहे,” असं श्यामली डे हिने लिहिलं.
“एका मित्राने आठवण करून दिली की आता मला जे सर्वांकडून प्रेम मिळतंय ती एक ऊर्जा आहे. माझी कोणतीच टीम नाही, पीआर नाही, स्टाफ नाही किंवा कोणीची माझं इन्स्टाग्राम पेज सांभाळत नाही. मी स्वतःच सर्वांना उत्तर देतेय आणि सर्व गोष्टी करते,” असं श्यामली डे हिने नमूद केलं.
पाहा पोस्ट

“माझ्या ज्योतिष गुरूंना ९ नोव्हेंबर रोजी चौथ्या टप्प्यातील कर्करोगाचे निदान झाले. त्यांचा कर्करोग दुर्दैवाने मेंदूसह शरीराच्या अनेक भागांमध्ये पसरला आहे. त्यामुळे मी सध्या कुठे लक्ष द्यायला हवं, ते तुम्ही समजून घ्याल, अशी मला खात्री आहे. पण एक नम्र विनंती आहे- कृपया इथे (सोशल मीडियावर) सगळं चांगलं राहूद्या. धन्यवाद… धन्यवाद… धन्यवाद… प्रत्येक व्यक्तीला चांगले आरोग्य, आनंद, समृद्धी आणि आध्यात्मिकतेचे आशीर्वाद मिळो,” असं श्यामली डे म्हणाली.
श्यामली डे ही राज निदिमोरूची पहिली बायको आहे. राज व श्यामली यांचं लग्न २०१५ मध्ये झालं होतं. दोघेही २०२२ मध्ये वेगळे झाले, अशी माहिती समोर येत आहे. आता राज निदिमोरूने समांथा रूथ प्रभूशी दुसरं लग्न केलं आहे.
